"मातोश्री', "कृष्णकुंज'वर उद्या काढणार मूकमोर्चा
सकाळ वृत्तसेवा
Saturday, September 04, 2010 AT 12:43 AM (IST)
मुंबई - शिवसेना-मनसेच्या दुहीमळे मराठी माणसाचे नुकसान होऊ नये व शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मनोमीलन व्हावे, यासाठी "माझी चळवळ, मी महाराष्ट्राचा' ही चळवळ सुरू करण्यात आली आहे. त्याची निर्णायक लढाई 5 सप्टेंबरला दिसणार आहे. राज आणि उद्धव यांच्या निवासस्थानी जाऊन चळवळीचे कार्यकर्ते भूमिका मांडणार आहेत.
चळवळीचे संस्थापक सतीश वळंजू यांच्यासह शशी सावंत, दीपक भोसले, अरविंद पावसकर, योगेंद्र चेंबूरकर व प्रतीक मंत्री हे रविवारी सकाळी दहाच्या सुमारास शिवाजी पार्क येथील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ एकत्र येतील. पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यकर्ते मूकमोर्चाने राज ठाकरे यांचे निवासस्थान "कृष्णकुंज'च्या दिशेने जाणार आहेत. याची पूर्वकल्पना आजच "कृष्णकुंज' निवासस्थानी निवेदनाद्वारे देण्यात आली. राज ठाकरे यांनी म्हणणे ऐकून घ्यावे, हीच आमची इच्छा असल्याचे श्री. वळंजू यांनी सांगितले.
"कृष्णकुंज'वरून मूकमोर्चा वांद्रे कलानगर येथील "मातोश्री' निवासस्थानी जाणार आहे. "मातोश्री'वरही आजच निवेदन पोहोचविण्यात आले आहे. या मोर्चात मराठीप्रेमी व मराठी अस्मिता कायम राहावी असा "पण' करणाऱ्या सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मूकमोर्चात कुठल्याही रंगाचा झेंडा दिसणार नाही; तसेच कोणतीही घोषणा करण्यात येणार नाही. मात्र, "केवळ मराठी मनोकामना... हे चित्र पुन्हा दिसावे...' असे फलक प्रत्येकाच्या हाती देण्यात येणार असून याच माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे.
पत्रक, बॅनर, माध्यम, एसएमएस; तसेच सह्यांच्या मोहिमेद्वारे आमच्या चळवळीचे उद्दिष्ट मुंबईतच नव्हे; तर राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्यात आले आहे. कालच्या दहीहंडीच्या निमित्ताने विविध गोविंदा पथकांशी संपर्क साधून हा विषय त्यांच्यापर्यंत नेण्यात आला आहे. आता पाच सप्टेंबरच्या निर्णायक मूकमोर्चाला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहायचे आहे. नाशिक, कोल्हापूर, रत्नागिरी, पुणे, चिपळूण आदी ठिकाणांहून कार्यकर्ते मोर्चात सहभागी होणार आहेत. सुमारे 10 हजार लोक यामध्ये सहभागी होतील, असा अंदाज वळंजू यांनी व्यक्त केला.