मंगलवार, 29 नवंबर 2011

टीकाटिप्पणीला महत्त्व देत नाही - राज ठाकरे

टीकाटिप्पणीला महत्त्व देत नाही - राज ठाकरे
-
Wednesday, November 30, 2011 AT 01:00 AM (IST)


मुंबई - आंदोलनाच्या काळात दगड घेणारा कार्यकर्ता तुमच्यातील पाहिजे आणि महापालिकेच्या महासभेत अभ्यासून बोलणारा नगरसेवकही तुमच्यामधीलच हवा, असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज महापालिकेसाठी इच्छुक असलेल्या मनसेच्या उमेदवारांना केले. तसेच 4 डिसेंबरच्या लेखी परीक्षेनंतर बाहेरच्या साऱ्यांना मनसेच्या तिकिटाची दारे बंद होणार असल्याचे त्यांनी ठणकावले.

षण्मुखानंद सभागृहात आज इच्छुकांसह राज यांनी दुपारी पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. या वेळी लेखी परीक्षेची भीती मनात न बाळण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. विरोधकांनी केलेल्या टीकाटिप्पणीला आपण महत्त्व देत नाही. मात्र, जो कार्यकर्ता आंदोलनाच्या काळात दगड हातात घेतो, त्यांच्यामधीलच एक जण महासभेत अभ्यासपूर्ण बोलताना मला पाहायचे असल्याचे त्यांनी सांगितले. मी मुलाखत घेतल्यावर उमेदवार एकच असेल याची तुम्हाला कल्पना आहे ना, अशी विचारणा केल्यावर उपस्थितांनी होकार दिला. तसेच परीक्षेचे ओझे मनावर न घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला. केवळ ऑप्शन असलेले प्रश्‍न असल्याने लिखाणाचे काम नसल्याचा दिलासा त्यांनी पुन्हा एकदा आपल्या कार्यकर्त्यांना दिला

'मनसे'च्या इच्छुकांचा पहाटे अभ्यास

'मनसे'च्या इच्छुकांचा पहाटे अभ्यास
राजेंद्र बच्छाव - सकाळ वृत्तसेवा
Tuesday, November 29, 2011 AT 03:45 AM (IST)

इंदिरानगर - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येत्या चार डिसेंबरला इच्छुक उमेदवारांची परीक्षा घेण्याचे ठरविले आणि परिसरातील सर्वच इच्छुक उमेदवारांची दिनचर्याच बदलली आहे. एरवी रात्री एक-दोनपर्यंत कार्यकर्त्यांसमवेत चर्चा करणारे अभ्यास करायचा आहे, असे सांगत दहालाच घराचा रस्ता धरत आहेत. सकाळी दहाला उठणारे पहाटे उठून पुन्हा अभ्यास करत आहेत.

महाविद्यालयात असताना कधी गांभीर्याने अभ्यास केला नाही. महाविद्यालयात एक तर खेळात किंवा राजकारणात धडाडी दाखवली. तेव्हादेखील अभ्यास म्हणजे केवळ वरच्या वर्गात जाण्यापुरता. अर्थात, वेळ मिळाला तर. अन्यथा पारंपरिक फिल्डिंग लावून उत्तीर्ण व्हायचे. आता मात्र करिअरचा प्रश्‍न असल्याने आणि साहेबांनी कोणताही अनुचित प्रकार न करण्याची तंबी दिल्याने गांभीर्याने अभ्यास करण्यावाचून पर्याय नसल्याने मोठी गोची झाल्याचे अनेकांनी सांगितले. काही ठिकाणी पती एका प्रभागातून, तर पत्नी शेजारच्या प्रभागातून इच्छुक असल्याने त्या घरांत तर धमालच आहे. दोघेही अभ्यासात व्यस्त आहेत. आता कोणता अभ्यास करत आहात, असा प्रश्‍न मुलं विचारतात, असे एका इच्छुकाने सांगितले. दोघांनी मग एकमेकांचा सराव घेणे आलेच. परीक्षेत अनुत्तीर्ण होऊन बेअब्रू होऊ नये म्हणून जीव तोडून अभ्यास करावा लागतोय, असे काहींनी सांगितले. ज्येष्ठ इच्छुकांची मात्र आणखीन पंचाईत झाली आहे. आई, अभ्यास केला का? किती प्रकरणे झाली?, असे प्रश्‍न कार्यकर्त्या मुलाकडून येत असल्याने उलटीच परिस्थिती झाली आहे. काहींनी तर चार तारखेपर्यंत पक्षाचे कार्यक्रम आणि प्रभागातील उपक्रम स्थगित केले आहेत. पुरुष गटातील इच्छुक कधी मित्रांच्या, तर कधी पत्नीच्या मदतीने झालेल्या अभ्यासाची उजळणी करत आहेत. तिकिटाच्या स्पर्धेत हा मोठा अडथळा असल्याने येथेच धडपडायला नको म्हणून प्रत्येकाची लगीनघाई सुरू आहे. काही दिवसांपूर्वी जोमाने सुरू केलेल्या नागरिकांच्या भेटीचा कार्यक्रम थांबविण्यात आला आहे. त्यात ही कमी शिक्षण असलेल्यांनी तर परीक्षेचा मोठा धसका घेतला आहे. नक्की स्वरूप काय असेल, याचा कुणालाच अंदाज नसल्याने काय करायचे या विवंचनेत ते आहेत. लिहिण्याचा वेगदेखील जेमतेम असल्याने आमचं काही खरं नाही, असा सूर ही मंडळी व्यक्त करत आहेत. परीक्षेमुळे इतर पक्षातून आयत्या वेळी येणारे बडे प्रस्थ लादण्यात येणार नाही, हे तरी किमान स्पष्ट झाल्याने बुडत्याला काडीचा आधार अशी परिस्थिती आहे. "मनसे'च्या परीक्षेच्या फतव्यामुळे सर्वच इच्छुकांनी कंबर कसली असून, कधी एकदा हे आटोपते आणि निकाल कळतो या प्रतीक्षेत सर्व जण आहेत