शनिवार, 2 अक्टूबर 2010

राज ठाकरे यांची पोतडी रिकामी ..!

राज ठाकरे यांची पोतडी रिकामी ..!
नाशिक, २ ऑक्टोबर / प्रतिनिधी
मनसेची स्थापना झाल्यानंतर वेगवेगळ्या मुद्यांवरून अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेणाऱ्या राज ठाकरे यांच्याकडील जवळपास  सर्वच मुद्दे संपुष्टात आले की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. शनिवारी ही बाब दस्तुरखुद्द राज यांनीच येथे बोलून दाखविली. आज आपल्या पोतडीत काही नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी राजकारणात आपण अपघाताने दाखल झाल्याचे सांगून सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला. मनसेतर्फे आयोजित करिअर मेळाव्यात मार्गदर्शन करताना राज यांनी विद्यार्थ्यांना आपला आतला आवाज ऐकून करिअर निवडण्याचा सल्ला दिला खरा, मात्र सद्यस्थितीत स्वत:च्या आतल्या आवाजाबद्दल काहिशी संधिग्धताच ठेवणे त्यांनी पसंत केले.
करिअर फेअरच्या निमित्ताने अनेक महिन्यानंतर नाशिक येथे राज यांचे जाहीर भाषण होणार असल्याने हजारो युवकांनी सकाळपासून महाकवी कालिदास कला मंदिरात गर्दी केली होती. तथापि, राज यांचे नेहमीच्या ठाकरी शैलीत भाषण न झाल्याने जमलेल्या युवकांचा काहिसा हिरमोड झाला. असे असूनही कला मंदिरातील त्यांच्या मोटारीला सर्वानी एकच गराडा घातल्याने त्यांची ‘क्रेझ’ कायम असल्याचे अधोरेखीत झाले. आ. वसंत गीते यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या तीन वर्षांपासून मनसेतर्फे स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले जात आहे. यंदाच्या शिबिर समारोपप्रसंगी बोलताना राज यांनी करिअर हा मोठा विषय असून तो प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी निगडीत असल्याचे सांगितले. करिअर करायचे म्हणजे काय ते तुमच्या अंर्तमनात तुम्हाला प्रथम समजले पाहिजे. ते एकदा समजले की तुम्हाला कुणाच्या मार्गदर्शनाची गरज राहणार नसल्याचे ते म्हणाले.
राजकारण देखील एक करिअर असून आपण त्यात अपघाताने आलो आहोत. ‘कमर्शिअल आर्टिस्ट’ शिक्षण घेतल्यावर व्यंगचित्रकार आणि मग राजकीय व्यंगचित्रकार असे आपल्या आयुष्यातील काही पदर त्यांनी उलगडून दाखविले. महात्मा गांधी, अमिताभ बच्चन, सचिन तेंडूलकर यांची उदाहरणे देत राज यांनी विद्यार्थ्यांना आपले समाधान नेमके कशात आहे ते ओळखण्याचा सल्ला दिला. दरम्यान, भरगच्च सभागृहात एका प्रवेशद्वारातून जागा नसतानाही काही जण आत शिरत असल्याचे पाहून राज यांनी ‘जागा शिल्लक नसताना अजून किती आत शिरणार’ असा टोला परप्रांतीयांचा उल्लेख न करता हाणला. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना उद्देशून बोलताना त्यांनी आपल्या पोतडीत आज फारसे काही नसल्याचे स्पष्ट करत आपली पोतडी जणू रिकामी असल्याचा संदेश दिला. दरम्यान, प्रारंभी, शिबिराचे संयोजक आ. गीते यांनी या संपूर्ण उपक्रमाचा आढावा घेतला. शिबिरासाठी प्रारंभापासून प्रयत्न करणाऱ्या बाळासाहेब दुगजे यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांचा राज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

राजकीय बंडखोरी जिवंतपणाचे लक्षण

राजकीय बंडखोरी जिवंतपणाचे लक्षण
सकाळ वृत्तसेवा
Sunday, October 03, 2010 AT 12:30 AM (IST)

डोंबिवली - कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी मनसेतर्फे घेण्यात आलेल्या उमेदवारांच्या मुलाखतीच्या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. मनसे सगळ्यांनाच उमेदवारी देऊ शकत नसली, तरी मनसेत बंडखोरी हा विषय नाही; तरीदेखील प्रत्येक राजकीय पक्षातील बंडखोरी ही त्या-त्या पक्षाच्या जिवंतपणाचे लक्षण असल्याचे मत मनसेचे आमदार बाळा नांदगावकर यांनी आज येथे व्यक्त केले.

मनसेतर्फे डोंबिवलीत गेल्या दोन दिवसांपासून सर्वेश सभागृहात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचा कार्यक्रम सुरू होता. आज त्याची सांगता झाली. या वेळी नांदगावकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी मनसेचे आमदार नितीन सरदेसाई, प्रवीण दरेकर, रमेश पाटील, प्रकाश भोईर, मनोज चव्हाण, शालिनी ठाकरे, शहर अध्यक्ष राजेश कदम आदी उपस्थित होते.

मनसेने दोन दिवसांपूर्वी कल्याणच्या सर्वोदय पार्कमध्ये कल्याण पूर्व- पश्‍चिमेतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्यानंतर काल आणि आज डोंबिवली पूर्व-पश्‍चिमेतील इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. आमदार सरदेसाई यांनी सांगितले, की प्रत्येक प्रभागात चार ते नऊ उमेदवार इच्छुक असून, महापालिकेच्या 107 प्रभागांतून 600 पेक्षा जास्त उमेदवार इच्छुक आहेत. उच्चशिक्षित तरुण आणि महिला उमेदवारांचाही प्रतिसाद मोठा आहे. इच्छुक उमेदवारांमध्ये गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचे उमेदवार नाहीत. मनसेतर्फे आंदोलने करताना गुन्हे दाखल झालेले उमेदवार इच्छुक आहेत. त्यामुळे सुकाणू समितीलाही योग्य उमेदवाराची निवड करणे कठीण जाणार आहे. मुलाखतीचा सविस्तर अहवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सादर केला जाईल. लवकरच उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल, असे ते म्हणाले.

107 जागा लढविणार
सत्ताधारी शिवसेना- भाजप युतीकडून विकासाच्या बाबतीत जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. हाच मनसेच्या प्रचाराचा मुद्दा राहणार आहे. मनसेचे प्रमुख राज ठाकरे प्रचारात अग्रभागी राहणार आहेत. 107 जागा लढविण्याचा मनसेचा मानस आहे. सगळ्या जागांसाठी मनसेकडे उमेदवार आहेत, असे आमदार नांदगावकर यांनी स्पष्ट केले
follow  राज ठाकरे - एक वादळ

शुक्रवार, 1 अक्टूबर 2010

'टोल'विरोधात सेना व मनसे आमनेसामने

'टोल'विरोधात सेना व मनसे आमनेसामने
सकाळ वृत्तसेवा
Saturday, October 02, 2010 AT 12:03 PM (IST)
पुणे - सातारा रस्त्याची दुरवस्था आणि टोलच्या दरातील प्रस्तावित वाढ याच्या निषेधार्थ खेड-शिवापूर येथील टोलनाक्‍यावर शनिवारी सकाळी निदर्शने करण्यात आली. यामध्ये शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी समोरासमोर येत दोन्ही बाजूंनी रस्ता अडवून धरल्यामुळे या पुणे-सातारा रस्त्यावरील वाहतूक विस्कळित झाली.

मनसेच आमदार रमेश वांजळे आणि शिवसेनेचे बाबा धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते निदर्शनांमध्ये सहभागी झाले आहेत. आजपासून या रस्त्यावर टोले देणे बंद करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य ट्रक, टेंपो, टॅंकर्स, बस वाहतूक महासंघासह सुमारे २० संघटनांनी दिला आहे. महासंघाचे सदस्यही निदर्शनांमध्ये सहभागी झाले आहेत.

गुरुवार, 30 सितंबर 2010

नेत्यांच्या कचखाऊ भूमिकेने 'मनसे'च्या गडाला खिंडार?

नेत्यांच्या कचखाऊ भूमिकेने 'मनसे'च्या गडाला खिंडार?
सकाळ वृत्तसेवा
Friday, October 01, 2010 AT 12:53 AM (IST)
 

कोल्हापूर - महापालिकेच्या निवडणुकीसंबंधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी घेतलेल्या कचखाऊ भूमिकेमुळे नाराज झालेल्या मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामा देण्याची तयारी केली आहे. दोन दिवसात मनसेतील मोठा गट बाहेर पडण्याची शक्‍यता असून मनसेला खिंडार पडणार आहे.

महापालिकेची निवडणूक लढवायची नाही अशी भूमिका संपर्कप्रमुख संजय जामदार, आमदार शिशिर शिंदे यांनी जाहीर केली आहे. जिल्हाप्रमुख उदय पोवार यांनी कोणत्याही स्थितीत निवडणूक लढवायचीच अशी भूमिका घेतली. अनेकांनी निवडणुकीत उमेदवारीची संधी मिळेल या अपेक्षेने मनसेत प्रवेश केला होता; पण मनसेतील गटबाजी, कुरघोड्या यामुळे पक्षाचे अस्तित्व असून नसल्यासारखे झाल्याने निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता; मात्र निवडणूक लढवण्याची संधी आता मिळाली नाही तर पुन्हा पाच वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे. मनसेच्या नेत्यांची एकूणच कचखाऊ भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. कोल्हापूरच्या बाबतीत ठोस निर्णय घेतला जात नाही. पक्षातील गटबाजी संपवण्यासाठी नूतन पदाधिकारी निवडण्यासाठी हालचाली सुरू झाल्या; पण प्रत्यक्षात कोणताच निर्णय झालेला नाही. आहे त्या पदाधिकाऱ्यांनाही काम करू दिले जात नाही. एकूणच मनसेतील आंधळा कारभार लक्षात घेऊन कार्यकर्ते मनसेलाच राम राम करण्याचा विचार करत आहेत. राष्ट्रवादी, कॉंग्रेस, भाजप, शिवसेना असे पर्याय त्यांच्यापुढे आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांचा एक मोठा गट दोन दिवसात राजीनामा देऊन बाहेर पडण्याची शक्‍यता आहे.

प्रचंड गर्दीत मनसेच्या मुलाखती सुरू

प्रचंड गर्दीत मनसेच्या मुलाखती सुरू
सकाळ वृत्तसेवा
Thursday, September 30, 2010 AT 12:30 AM (IST)
 

कल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती प्रचंड गर्दीत सुरू झाल्या. पक्षाच्या सुकाणू समितीतर्फे आणखी दोन दिवस मुलाखती घेतल्या जाणार आहेत.

कल्याण पश्‍चिमेतील सर्वोदय पार्कमध्ये मनसेच्या इच्छुकांच्या कालपासून मुलाखती सुरू झाल्या. सकाळी अकरापासून मुलाखती सुरू होणार असल्याने इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी सकाळी नऊपासूनच सर्वोदय पार्क परिसरात एकच गर्दी केली होती. मुलाखतीसाठी पूर्वतयारी करून आलेल्या उमेदवारांनी प्रभागातील समस्या आणि इतर माहितीचा डेटा असलेली फाईल बरोबर ठेवली होती. काल सकाळी अकरापासून सुरू झालेल्या इच्छुकांच्या मुलाखतीच्या पहिल्या सत्रात प्रभाग क्षेत्र "अ' व "ब' मधील 150 पेक्षा जास्त इच्छुकांच्या मुलाखती रात्री साडेअकरापर्यंत सुरू होत्या. एका प्रभागातून किमान सहा ते 12 इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत.

इच्छुक उमेदवार असलेल्या महिलांची संख्या लक्षणीय होती. जवळपास 45 टक्के इच्छुक महिला उमेदवारांनी मुलाखती दिल्या. त्यात डॉक्‍टर, वकील, शिक्षक आदींचा समावेश आहे. मराठी समाजातील इच्छुकांसह ख्रिश्‍चन, मुस्लिम आणि इतर मागासवर्गीय अशा सगळ्या समाज घटकातील उमेदवार मनसेतर्फे निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे मुलाखतीत दिसून आले. मनसेच्या स्थापनेपासून सोबत असलेल्या कार्यकर्त्यांचा इच्छुकांमध्ये समावेश अधिक होता.

प्रभाग क्षेत्र "क' व "ड' मधील प्रभागातून इच्छुक असलेल्या उमेदवारांची मुलाखत दिवसभरात घेण्यात येणार आहे. त्यानंतर उद्या व 1 ऑक्‍टोबर रोजी डोंबिवलीतील पूर्व-पश्‍चिमेतील इच्छुकांच्या मुलाखती डोंबिवलीत पार पडणार आहेत.

मुलाखत घेणाऱ्या सुकाणू समितीत आमदार बाळा नांदगावकर, शिशिर शिंदे, नितीन सरदेसाई, रमेश पाटील, प्रकाश भोईर यांच्यासह शालिनी ठाकरे, मनोज चव्हाण यांचा समावेश आहे. निवडणुकीच्या नियोजन समितीचे कामकाज राजन गावंड, विनय भोईटे, केदार हुंबळकर, मनोहर सुगदरे पाहत आहेत.

एकाच प्रभागात प्रबळ दावेदारप्रभाग क्रमांक 21 (गांधीनगर) प्रभागातून अपक्ष नगरसेवक फैसल जलाल यांनी मनसेत प्रवेश केला आहे. गांधीनगरातून श्री. जलाल हे इच्छुक आहेत. या प्रभागातून मनसेचे जिल्हा चिटणीस इरफान शेख इच्छुक आहेत. भाजपला रामराम ठोकून मनसेत आलेले नगरसेवक दिनेश तावडे यांनी प्रभाग क्रमांक 32 (जोशीबाग) उत्सुकता दर्शविली आहे. याच प्रभागातून मनसेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष ऊर्मिला तांबे इच्छुक आहेत. मनसेच्या स्थापनेपासून महिला आघाडीत तांबे सक्रिय आहेत. कल्याणमधील या दोन प्रभागांतून कोणाला उमेदवारी द्यायची, असा एक पेचप्रसंग मनसेच्या निवडणूक सुकाणू समितीपुढे निर्माण होणार आहे.