शुक्रवार, 13 जनवरी 2017

मुंबईत मनसे स्वबळावर लढणार - राज ठाकरे

मुंबई - मी ट्रेलर नव्हे, तर पिक्‍चर दाखवतो. शिवसेना, भाजपकडे पैसे आहेत. माझ्याकडे नाहीत. दुसरे पक्ष पैशांच्या जोरावर माणसे विकत घेत आहेत, असा घणाघाती आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. मुंबई महापालिकेत सर्व जागा स्वबळावर लढवणार असल्याचेही राज यांनी जाहीर केले. निवडणुकीसाठी मनसेने "वॉर रूम' तयार केली आहे. त्याच्या उद्‌घाटनप्रसंगी फेसबुक लाइव्हद्वारे त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांच्या थेट प्रश्‍नांना रोखठोक उत्तरेही दिली.

मनसेकडे युतीचा प्रस्ताव आला तर या वेळी विचार करीन, असे राज मंगळवारी म्हणाले होते. अद्याप मी कुणाकडे गेलेलो नाही आणि कुणी माझ्याकडे आलेले नाही. त्यामुळे या सर्व चर्चांना सध्या तरी काहीही अर्थ नाही, असे ते बुधवारी म्हणाले. शिवसेनेने भ्रष्टाचार केला असेल तर भाजप काय करत होता? त्यांना हा भ्रष्टाचार रोखावा असे वाटले नाही का? दोघांनी मिळूनच फावडा मारला आहे, असा टोला राज यांनी लगावला. मनसेच्या चांगल्या कामांबद्दल कुणी बोलत नाही. ज्यांना पक्षातून बाहेर पडायचे आहे त्यांनी जावे. मी ट्रेलर दाखवत नाही, डायरेक्‍ट पिक्‍चर दाखवतो. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पुढे काय करणार ते आताच सांगू शकत नाही. समुद्रात शिवस्मारक उभारण्यासाठी कोट्यवधी रुपये आहेत, मग माणसे जिवंत राहावीत यासाठी पैसा खर्च का करत नाहीत? सरकार नको त्या गोष्टींवर खर्च करत आहे. शिवस्मारकाऐवजी राज्यातील गडकिल्ल्यांची दुरुस्ती करा, असे ते म्हणाले.
नाशिक महापालिकेचे कर्ज फेडून मी कामे करून दाखवली. नाशिकमध्ये केलेले काम इतर शहरांतही दाखवा. अजूनही बरीच माणसे माझ्यासोबत विश्‍वासाने आहेत. मी पुन्हा 60 नगरसेवक निवडून आणून दाखवीन.
- राज ठाकरे, मनसे प्रमुख
राज ठाकरे उवाच
राज्यात टोलनाके मनसेच्या प्रयत्नामुळे बंद
भाजपकडून योजनांचा, उद्‌घाटनांचा धडका
कॉंग्रेसने जी योजना केली त्याचे मोदींकडून जलपूजन
शिवसेना-भाजपकडे सांगण्यासारखे काहीच नाही
महापालिकेतील भ्रष्टाचाराला दोन्ही पक्ष जबाबदार

बुधवार, 11 जनवरी 2017

ब्रशचा स्ट्रोक देताना बाळासाहेबांचा धाक वाटतो...


शिवाजी मंदिरात"शोध मराठी मनाचा' या कार्यक्रमात व्यंगचित्रकार राज ठाकरे यांची आशुतोष आपटे आणि रामदास फुटाणे यांनी मुलाखत घेतली. व्यंगचित्रकाराच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू त्यातून उलगडले. या मुलाखतीचा हा संपादित अंश...
पहिले चित्र कोणते आणि कधी काढले? 
पहिले चित्र आठवत नाही, पण एक आठवतेय, बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवाजी महाराज यांच्यावर लिहिलेल्या एका पुस्तकाच्या मुखपृष्ठावर शिवाजी महाराजांचे चित्र होते. ते मी बॉलपेनने काढले होते. तेव्हा मी तिसरी-चौथीत असेन. त्याचा आनंद एक दिवसच टिकला, नंतर ते चित्र फाटले की कुठे गेले ते कळलेच नाही.
चित्र असो की शब्द, कधी खोडणे तुम्हाला जमले नाही. परदेशातील चित्रकला आणि भारतातील चित्रकला, यात काय फरक वाटतो?
-
भारतातील आणि परदेशातील चित्रकलेत मोठा फरक पाहायला मिळाला. परदेशातील शिल्पकार आपल्यापेक्षा कितीतरी पटीने पुढे आहेत. भारतात तर पुतळ्यांचे पेवच फुटले आहे. दगड कोरताना दगडाला कपड्याचा फिल देणं ही खूप मोठी गोष्ट आहे. दगड नाही ते कापडच आहे, असा फिल आपल्याला येतो. घोडा किंवा माणूस यांची चित्रे जिवंत वाटतात. लिओनार्दो द विंची, मायलेड आदींची चित्रे यांना तोड नाही. अशी कला आपल्याकडे मी अजून पाहिलेली नाही. त्यांच्या चित्र, शिल्पावर खरोखरचे कापड आहे असेच वाटते. परदेशात कलेची कदर केली जाते. आपल्याकडे तशी होत नाही. आपल्याकडे ऍनिमेशनला कार्टून फिल्म म्हणून ओळख आहे. परदेशात ऍनिमेशन हे कल्चर आहे. तसं कल्चर आपल्याकडे विकसित व्हायला हवे.

परदेशातील कोणती गोष्ट आपल्याला भावते? 
-मी ऑस्ट्रेलियात गेलो होतो. तेव्हा तिथे एका सोविनिअर शॉपमध्ये मी गेलो. तिथे विद्यार्थी आले होते. ऑस्ट्रेलिया खंडाचा शोध लावणाऱ्या कॅप्टन कुक यांचा शोध प्रवास कसा झाला, त्याचे प्रात्यक्षिक जगाच्या नकाशावर महासागरातून तीन रेषा काढून विद्यार्थांना शिक्षिका समजावून सांगत होती. तो खडतर प्रवास कसा झाला, त्याचे वर्णन प्रात्यक्षिकांसह त्या सांगत होत्या, तेव्हा मीही विद्यार्थी म्हणूनच ते समजावून घेत होतो. छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकिल्ले तसे विद्यार्थ्यांना समजावून दिले पाहिजेत. तेव्हाच महाराज विद्यार्थ्यांना कळतील. मात्र शिक्षकांनाच शिकविण्याची वेळ आलीय. विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण दिले तर आपले विद्यार्थी आपल्या इतिहासाला विसरणार नाहीत. 26 जुलैला माधव सातवळेकर यांच्या
चित्रांचे पुराच्या पाण्याने नुकसान झाले. मात्र त्यांच्या चित्रांचे जतन करावे,असे कोणालाही वाटले नाही. त्यांच्या पेंटिंगचा चिखल झाला. अशा उदाहरणामुळे कळते की, चित्रांविषयी आणि चित्रकारांविषयी कदर नाही.
राजकारण्यांना चित्रकलेची जाण नाही? त्यामुळे असे घडतेय? 
-पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या मंत्रिमंडळात त्या त्या विषयाची जाण असलेल्या व्यक्तींना त्या त्या खात्याचे मंत्री केले होते. बहुमत मिळाल्यामुळे मोदींनाही ते शक्‍य होते. मात्र आता तज्ज्ञांना विचारले जात नाही. दप्तराचे ओझे कमी करायचे हे वजनकाट्याने तपासत असतील तर यापेक्षा दुर्दैव कोणते?
सरकार शिक्षणाकडे विनोदाने बघतेय? 
- शिक्षण ही महत्त्वाची गोष्ट आहे. सिलॅबस, एकदाच तयार करायला हवा. या खात्यात जो येतो, त्या प्रत्येकाला आलेला झटका, हे राज्याचे धोरण नाही. असे नाही होऊ शकत नाही.
तुम्ही व्यंगचित्र सातत्याने का काढत नाही? 
- व्यंगचित्र काढण्यासाठी गढून घ्यावे लागते. मी घरातून खाली आलो की माझी ओपीडी सुरू होते. व्यंगचित्रासाठी बैठक पाहिजे. वरवरचे नाही जमत मला. मी ड्रॉईंगला बसतो तेव्हा सतत मागे बाळासाहेब आणि माझे वडील असल्याचा भास होतो. तो धाक अजूनही आहे. ब्रशचा किंवा पेन्सिलचा स्ट्रोक देताना बाळासाहेब आठवतात. तो स्ट्रोक बाळासाहेबांना आवडेल की नाही, याचा विचार मनात असतो. दोघांबद्दलचा धाक अजूनही मनात कायम आहे.
व्यंगचित्रासाठी वेगळा अभ्यास करावा लागतो? 
- रोज जागतिक स्तरावरील घडामोडी, राजकीय घडामोडी, इतिहास यांचे संदर्भ माहीत असायला हवेत. त्यासाठी रोज वर्तमानपत्र वाचले पाहिजे. अग्रलेखांचे वाचन हवे. थोडा तिरका विचार करावा लागतो. विषयाची समज आणि जाण असावी लागते.
स्टेजवरले व्यंग आपण कसे करता?
- भाषणाच्या वेळी मी अनेकदा मुद्दे लिहून आणलेले असतात. ते पुढे ठेवतो. मात्र 99 टक्के वेळा मी त्याकडे लक्ष देत नाही. बोलता बोलता न कळत नक्कल येते. व्यंगचित्रकार असल्याने नकला नकळत येतात.