मग, वाघांसाठी 'बंद' का नाही? - राज
- सकाळ वृत्तसेवा
Friday, June 01, 2012 AT 01:45 AM (IST)
चंद्रपूर - पेट्रोलची भाववाढ झाल्याने संपूर्ण
देशात बंद पुकारण्यात आला. मात्र, वाघाच्या इतक्या शिकारी होऊनही कुणी
आवाज उठवीत नाहीत. वाघांसाठी बंद का नाही, असा सवाल मनसेचे अध्यक्ष राज
ठाकरे यांनी पत्रपरिषदेत केला. ताडोबा अभयारण्यातील शिकार, पुनर्सवनाच्या मार्गावरील गावांना भेट दिल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी गुरुवारी (ता. 31) राज ठाकरे यांनी महाऔष्णिक वीज केंद्राच्या ऊर्जानगर येथील हिराई विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, वाघाच्या शिकारीसंदर्भात जे वृत्तपत्रात वाचले, ते प्रत्यक्ष बघण्यासाठी इथे आलो. स्वयंसेवी संस्था, गावकरी आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर परिस्थिती समजेल. शिकारीत गावकऱ्यांचा सहभाग असेल. त्यामुळे बाहेरचे शिकारी इथे तळ ठोकून बसतात. स्थानिकांनी शिकारी टोळ्यांना मदत करणे आता थांबविले पाहिजे, असे आवाहन केले.
विदेशातील शासन वन्यप्राण्यांच्या संरक्षणात अतिशय गंभीर आहेत. मात्र, देशातील शासनाची उदासीन भूमिका आहे. नेते केवळ भूखंड आणि पैसा हडप करण्याच्या मागे लागले आहेत. उद्या वाघांचे जंगल नष्ट करून वनजमिनी बळकावतील, अशी भीती राज यांनी व्यक्त केली. येथील कोळसा खाणी मानवासह वन्यप्राण्यांसाठी धोकादायक ठरत आहे. वन्यजीवांच्या रक्षणासाठी वनविभागाने स्वयंसेवी संस्थांना विश्वासात घेऊन काम करण्याची गरज आहे, असल्याचे ते म्हणाले. यावेळी आमदार बाळा नांदगावकर, आमदार नितीन सरदेसाई, अनिल शिदोरे, मनसेचे पूर्वविदर्भ संघटक हेमंत गडकरी, जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार उपस्थित होते.
प्रत्येक बाबतीत राजकारण करणे ठीक नाही. प्राण्यांवर प्रेम आणि आपुलकी आहे. म्हणूनच थंड हवेच्या ठिकाणी न जाता 47 अंश तापमान असलेल्या चंद्रपूरात आलोय, ते उगीच नव्हे.
- राज ठाकरे.