शनिवार, 28 अक्टूबर 2017

नितेश राणेंचा मराठी 'स्वाभिमान' जागा, मनसेला पाठिंबा

मुंबई : मालाडमधील मनसेचे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यावर फेरीवाल्यांनी जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर आता मनसे प्रचंड आक्रमक झाली आहे. आता काँग्रेसचे आमदार आणि स्वाभिमान संघटनेचे प्रमुख नितेश राणे यांनीही मनसेच्या कार्यकर्त्यांचं समर्थन केलं आहे.
“एका मराठी माणसाला एका अनधिकृत फेरीवाल्याने मारणं, हे कधीच सहन करणार नाही. मग तो कुठल्याही पक्षाचा असेल.”, असे म्हणत आमदार नितेश राणे मनसे कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत.

यावेळी आमदार नितेश राणे यांनी मुंबई काँग्रेसवरही निशाणा साधला. ते म्हणाले, “मुंबई काँग्रेस म्हणजे उत्तर भारतीयांचा पक्ष असल्यासारखं वाटतंय आणि त्यांना मराठी माणसांची मतंही हवी असतात.”
काय आहे प्रकरण?
मालाडमध्ये फेरीवाल्यांच्या मारहाणीत जखमी झालेले मनसेचे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांना उपचारासाठी बोरीवलीच्या ऑस्कर रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांची भेट घेणार आहेत. काल मालाडमध्ये फेरीवाल्यांनी सुशांत माळवदे यांना जबर मारहाण केली होती. या संपूर्ण प्रकरणाला संजय निरुपम जबाबदार असल्याचा आरोप केला जातो आहे. काँग्रेसच्या संजय निरुपमांनी फेरीवाल्यांना चिथावणी दिल्याचा आरोप मनसेनं केला आहे.

मालाडमध्ये फेरीवाल्यांचा मनसे कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला

गुरुवार, 26 अक्टूबर 2017

याच 'पप्पू'ला घाबरून मोदी गुजरातला का जाताहेत- राज ठाकरे

मुंबई : भाजपच्या नेत्यांनी आधीपासून राहुल गांधींना लक्ष्य करून 'पप्पू पप्पू' म्हणून चिडवले. तेच राहुल गांधी आज गुजरातमध्ये जाऊन 'झप्पू' होत आहेत. राहुल यांच्या सभेला लोकांची जेवढी गर्दी होत आहे त्याला घाबरून मोदी नऊ-नऊ वेळा गुजरातमध्ये जात आहेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.
ज्या राहुल गांधींना तुम्ही आतापर्यंत अपमानित करत होता. तीच व्यक्ती आज गुजरातमध्ये जात आहे तेव्हा तुम्हाला एवढी भीती का वाटत आहे, असा राज ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला. 
इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू केल्यानंतर विरोधी पक्षाचे सरकार आले होते. मात्र, तेव्हापासून आतापर्यंत जी विरोधी पक्षांची सरकारे येतात त्यांनी शत्रूंची गरजच पडत नाही. ते स्वतःसाठीच खड्डा खोदून ठेवतात. तसेच हे मोदी सरकार करत आहे. राजीव गांधींच्या नंतर या देशात पहिल्यांदाच एवढे मोठ्या प्रमाणावर बहुमत मिळवून केंद्रातील सरकार सत्तेत आले आहे. मात्र, तरीही नोटाबंदी आणि जीएसटीसारखे जीवघेणे निर्णय मोदी सरकार घेत आहे, अशा शब्दांत राज यांनी मोदी सरकारच्या कारभारावर संताप व्यक्त केला. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली.  
राज ठाकरे म्हणाले, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी अर्थमंत्री असताना देशाला हलाखीच्या आर्थिक स्थितीतून सावरले. मात्र, मोदी सरकार पुन्हा आर्थिक स्थिती बिघडवत आहे. 
EVM यंत्रांमध्ये गडबड
दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारने इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात कसा फेरफार केला जातो याचे प्रात्यक्षिक देण्यास तयार होते. मात्र, निवडणूक आयोगाने त्यांना प्रात्यक्षिक देण्याची संधीच दिली नाही. किरीट सोमय्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले होते. मग एवढ्या वर्षांत कधीच भाजपला एवढी मते मिळाली नाहीत, आणि आता कशी मिळत आहेत. याची चौकशी तर व्हायलाच पाहिजे. 
परतीचा पाऊस
सोशल मीडियावर मोदी सरकारविरोधात टीका होत असल्याबद्दल बोलताना राज म्हणाले, सोशल मीडिया वापरून मोदी सरकार सत्तेत आले. त्यावेळी सोशल मीडियावर काहीही केलं तरी चालत होतं. आता तोच सोशल मीडिया आता त्यांच्याविरोधात जात आहे तेव्हा मात्र सरकारविरोधात कोणी लिहिले तर त्याच्याविरोधात लगेच गुन्हे दाखल केले जातात. मला मोदींनी गुजरातमधील केवळ ठराविक गोष्टी दाखवल्या, सांगितल्या. त्यामुळे तेच देशाचा विकास करू शकतील असे सुरवातीला मला वाटले. मात्र, आता तीन वर्षे झाली तरी ते केवळ खोटंच बोलत आहेत.

मंगलवार, 24 अक्टूबर 2017

चार दिवस संप करून ही परिस्थिती बदलणार नसेल तर त्याला काय अर्थ? : राज ठाकरे

कल्याणः कामगारांनी एकाच ठिकाणी ठाम राहिले पाहिजे एकदा इकडे सत्ता आली की तिकडे, असेच वागलात तर जो तो तुम्हाला लूटेल. चार दिवस संप करून ही परिस्थिती बदलणार नसेल तर त्याला काय अर्थ? असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संपकरी एसटी कर्मचारी आणि महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेच्या शिष्टमंडळाला केला. यावेळी एसटी कर्मचारी वर्गाच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन ही ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहे.
सोमवार (ता. 23) महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेच्या शिष्टमंडळाने एसटी कामगारांच्या संपाच्या पाश्वभुमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईच्या दादर मधील कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली. संपात सहभागी झालेल्या एसटी कामगारांवर होणारी संभाव्य कारवाई संदर्भात एसटी प्रशासनाच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्या सोबत चर्चा करू, वेळप्रसंगी पत्र ही देऊ असे आश्वासन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावेळी दिले. यावेळी एसटी कामगारांच्या संघटनाबाबत ही ठाकरे यांनी खडेबोल सुनावले. कामगारांनी कुठे तरी एकाच जागेवर ठाम राहण्याची गरज आहे. अन्याथा प्रत्येकाकडून असेच लुटले जाल, असा टोला लगावत पुढे म्हणाले की, 'सतत घरंगळत जायला एकदा इकडे सत्ता आली की तिकडे असेच राहणार असाल तर लुटले जाल. आता ही तेच होईल चार दिवसाचा संप करूनही परिस्थिती बदलणार नसेल तर मग काय अर्थ आहे.'

परिवहनच्या संघटनात्मक बदलांकडे ही आपण जातीने लक्ष घालू, असे आश्वासन ठाकरे यांनी शिष्टमंडळास दिले. या प्रसंगी सरचिटणीस मोहन चावरे, कार्याध्यक्ष विकास अकलेकर, हरी माळी, ठाणे विभागाचे सचिव महादेव मस्के, विजय नांगरे आणि विभाग कल्याण, धुळे, नाशिक, रायगड, बुलढाणा, रत्नागिरी अन्य पदाधिकारी उपस्थित होते.