टोलनाक्यांवरील वाहनांचा लेखाजोखा मनसे मांडणार
- सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, June 16, 2012 AT 01:00 AM (IST)
मुंबई - रस्त्यांच्या खर्चाच्या नावाखाली आघाडी
सरकार उद्याच्या काळात गल्लीतही टोलनाके उभारतील, असा आरोप करून राज्यातील
टोलनाक्यांवर दिवसाला किती टोलवसुली होते, याचा लेखाजोखा मनसे ठेवणार
असल्याची माहिती मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली. त्याच वेळी या
कार्यकर्त्यांच्या कामात संबंधित कंपनी अथवा सरकारने अडथळा आणण्याचा
प्रयत्न केल्यास संपूर्ण महाराष्ट्रात मी हंगामा करीन. हा हंगामा मग
कोणालाही आवरता येणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. कृष्णकुंजवर आयोजित पत्रकार परिषदेत टोलनाक्यांच्या विरोधातील लढा हा टोलवसुलीत पारदर्शकता येईपर्यंत सुरू राहणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. ठाण्यात टोलनाक्यांच्या विरोधात केलेल्या आवाहनानंतर राज्यात जागोजागी मनसैनिकांनी आंदोलन केले. मी टोलवसुलीच्या विरोधात नाही. कामे करण्यासाठी निधी लागतो, याची कल्पना मला आहे. पण, टोलनाक्यांच्या नावाखाली कमी वाहने दाखवून मंत्री आणि कंत्राटदार एकत्र येऊन जी नागरिकांची लूट करीत आहेत; त्याला आपला विरोध असल्याचे ते म्हणाले. ही गुन्हेगारी स्वरूपाची लूट उघडकीस आणण्यासाठी सोमवारपासून राज्यातील प्रत्येक टोलनाक्यावर 50 मनसैनिक उभे राहून वाहनांची संख्या मोजणार आहेत. तसेच, या वेळी फलक लावून वाहनचालकांना टोलच्या बदल्यात त्यांना किमान कोणत्या सुविधा देणे अपेक्षित आहे, याची माहिती दिली जाणार आहे. मनसेचे कार्यकर्ते कामात कोणताही अडथळा आणणार नाहीत. मात्र, या कार्यकर्त्यांना काही त्रास दिल्यास संपूर्ण राज्यात हंगामा करण्याचा इशारा राज यांनी दिला.
मंत्र्यांच्या आशीर्वादाने टोलवसुलीत पारदर्शकता राहिलेली नाही. कंत्राट भरताना गाड्यांचा आकडा कमी दाखविणे, कमी वाहनांच्या नावाखाली कंत्राट वाढवून देणे, कंत्राट संपल्यावरही वसुली सुरू ठेवणे, कायद्याने सुरक्षितता देणे आवश्यक असताना वाहनचालकांना वाऱ्यावर सोडणे, परतीचा प्रवास असल्यास प्रवासाचा टोल पन्नास टक्के घेणे बंधनकारक असताना पूर्ण पैसे घेणे आदी गोष्टी या टोलनाक्यांच्या कंत्राटामध्ये सर्रास सुरू असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला.
छगन भुजबळांची रोजीरोटी
मी टोलनाक्याच्या विरोधात बोलल्यावर छगन भुजबळ यांच्या रोजीरोटीवरच लाथ मारल्यासारखे ते चिडले आहेत. पण, मला समजाविण्याच्या भानगडीत त्यांनी पडू नये. व्यवसाय कसा करायचा, याची मला माहिती आहे. तसेच, टोलनाका नाही, तर राज्य चालविण्यास आपण तयार असल्याचा टोला राज यांनी छगन भुजबळ यांना लगावला.
महाराष्ट्रात वाहनचालकांना फेफरे
गुजरातमध्ये डाव्या बाजूने चालणाऱ्या इतर राज्यांतील ट्रकचालकांना महाराष्ट्रात आल्यावर फेफरे भरते. येथील कायद्याचा धाक नसल्यानेच हे ट्रकचालक आडवेतिडवे गाड्या चालवत असल्याने महामार्गावर वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. यासाठी "एनएच-4' या महामार्गाची आपण डीव्हीडी तयार केली आहे. या डीव्हीडीमध्ये कर्नाटकमधील महामार्गावरील वाहतूक आणि महाराष्ट्रातील वाहतुकीतील फरक कळत असल्याचे सांगून या डीव्हीडीचे वाटप त्यांनी केले