राज ठाकरे रंगले पत्रकारांशी अनौपचारिक गप्पात
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, June 22, 2010 AT 12:30 AM (IST)
लातूर - लातूर जिल्ह्यात पाऊस कसा आहे, लातूर महानगरपालिका झाली नाही का? असे म्हणतच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथील पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. पक्ष काढल्याने जबाबदारी वाढली असल्याचे त्यांनी सांगितले.
उमरगा येथे न्यायालयीन कामासाठी आले होते. तेथून सोमवारी (ता. 21) मुक्कामासाठी ते येथे आले आहेत. मंगळवारी ते कळंबला न्यायालयीन कामासाठी जाणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी शहरात बॅनर्स लावण्यात आले होते. चौका चौकात कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागतासाठी गर्दी केली होती. दुपारी एकच्या सुमारास त्यांचे शहरात आगमन झाले. येथील राजीव गांधी चौकात पक्षाच्या शहर शाखेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येणार होता. पण गाडीतूनच त्यांनी कार्यकर्त्यांना अभिवादन करून ते विश्रामगृहात गेले. तेथे पत्रकारांनी त्यांना गाठले. मी आज बातमी देणार नाही, तुम्हाला भेटायला आलो आहे, असे म्हणत श्री. ठाकरे यांनी गप्पा मारण्यास सुरवात केली. एक तास या गप्पा रंगल्या.
महानगरपालिका नाही?
जिल्ह्यात पाऊस कसा झाला आहे. सोलापूरला पाऊस जास्त झाला. लातूर महानगरपालिका झाली का? असे त्यांनी विचारले. लातूरला नऊ वर्ष मुख्यमंत्रिपद होते. महापालिका का झाली नाही? महापालिका झाल्यानंतर अनुदान मोठे येते, शहराच्या विकास करण्यास मदत होते. पण महानगरपालिका चालविणारे चांगले पाहिजेत, असे श्री. ठाकरे म्हणाले.
अमेरिकेत कार्डवर टोलटॅक्स
चर्चेत टोल टॅक्सचा विषय निघाला. यावर श्री. ठाकरे यांनी अमेरिकेतील उदाहरण दिले. काही दिवसापूर्वी अमेरिकेला गेलो होतो. तेथेही टोल टॅक्स घेतला जातो. पण तेथे टोलनाक्यावर पॅनल बोर्ड लावण्यात आले आहेत. तेथे कार्ड दाखविले की आपोआप आपल्या खात्यातून पैसे जमा होतात. कार्ड नाही दाखविले की लाल बत्ती लागते. ती तोडून गाडी नेली तर गाडीचा फोटो निघतो. आपल्या घरी त्याचे बिल येते. अशी पद्धत आहे. तेथे नाक्यावर कोणताही माणूस उभा राहत नाही. आपल्याकडे मात्र विचित्र पद्धत आहे. आपले नेते परदेशात जातात काय घेऊन येतात माहीत नाही. मुदत संपूनही सुरू असलेल्या टोल नाक्याकडे जरा लक्ष द्या असे त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना यावेळी सांगितले.
वीज प्रकल्पांना विरोध नको?
अमरावतीत वीज प्रकल्पाला विरोध होत आहे. ते चुकीचे आहे. वीज प्रकल्प झाल्याशिवाय भारनियमन कमी होणार नाही. एकीकडे भारनियमन म्हणून ओरडायचे अन् दुसरीकडे विरोध करायचा. यातून कसे भारनियमन कमी होणार? त्यामुळे वीज प्रकल्पांना विरोध करू नका असे माझ्या कार्यकर्त्यांना सांगितले आहे. जे विरोध करतात ते खासगीत जाऊन आपल्या किमती वाढवून घेतात, अशी टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.
विचारले होते का?
शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र यावेत म्हणून शिर्डीत साईबाबांना नवस केला. या विषयावरील चर्चेत नवस बोलताना विचारले होते का? असा प्रश्नच श्री. ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.
लक्ष घालीत नाही
औरंगाबाद महानगरपालिकेत झालेल्या गोंधळाविषयी ते म्हणाले, इतक्या लहान गोष्टीत मी लक्ष घालीत नाही. काय कारवाई करायची ते शासनाने ठरवावे, असे त्यांनी सांगितले.
तरीही विदर्भात कॉंग्रेसच!
वेगळ्या विदर्भाविषयी ते बोलले. विदर्भापेक्षा मराठवाडा मागासलेला आहे. तरी येथील जनता वेगळा मराठवाडा मागत नाही. विदर्भात अनेक नेते होऊन गेले. मुख्यमंत्री झाले. त्यांनी विकास करायला हवा होता. कोकणही मागासलेला आहे. म्हणून काय सर्वांनीच वेगळे मागायचे का? वेगळा विदर्भ मागायचा अन् कॉंग्रेसलाच विजयी करायचे ? नेमका विरोध कोणाला हेच कळत नाही, असे श्री. ठाकरे म्हणाले. यावेळी पक्षाचे जिल्हाप्रमुख अभय साळुंके उपस्थित होते.