मनसेचे लक्ष्य : 'त्या' 50 जागा
विष्णू सोनवणे - सकाळ वृत्तसेवा
Saturday, January 14, 2012 AT 04:00 AM (IST)
मुंबई - देशातील सर्वात मोठा अर्थसंकल्प असलेल्या मुंबई महापालिकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. महायुती आणि आघाडीचे राजकारण रंगात आले असताना मनसेने मात्र कुणाच्याही कुबड्या न घेता "प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील एक वॉर्ड जिंकायचाच', असा निर्धार करत शड्डू ठोकले आहेत. महापालिकेच्या गेल्या निवडणुकीतील दुसऱ्या क्रमांकाच्या 50 जागा मिळवणे, हेच मनसेचे "टार्गेट' आहे.
महापालिकेच्या 2007 मधील निवडणुकीत 50 मतदारसंघांत मनसे दुसऱ्या क्रमांकावर होती. शिवसेनेचे प्राबल्य असलेल्या वॉर्डांत मनसेने चांगलेच आव्हान उभे केले होते. या निवडणुकीसाठी मनसे अधिक ताकदीने तयारीला लागली आहे. गेल्या निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत अनेक मतदारसंघांतील समीकरणे बदलली होती. काही प्रभागांत मनसे उमेदवारांना भरभरून मते मिळाली होती. त्यापैकी अनेक ठिकाणी शिवसेनेची पिछेहाट झाल्याचे आढळले आहे. या परिस्थितीचा अंदाज घेऊन मनसेने प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील एक प्रभाग जिंकायचाच, अशी रणनीती आखल्याचे समजते. त्यासाठी प्रवीण दरेकर, शिशिर शिंदे, बाळा नांदगावकर, मंगेश सांगळे, राम कदम, नितीन सरदेसाई या आमदारांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
मुंबईत मनसेचे शिरीश चोगले, जितू नागवेकर, सुप्रिया पवार, परमेश्वर कदम, शैला लांडे, प्रकाश पाटणकर, राजेंद्र लाड आणि आमदार झालेले मंगेश सांगळे असे सात नगरसेवक आहेत. या जागा पुन्हा मनसेला मिळाव्यात, यासाठी मनसे ताकद लावणार आहे. शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या अन्य 50 मतदारसंघांतील उमेदवारांना कडवे आव्हान देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची चाचपणी करत आहेत.
व्यूहरचनेला अनुभवाचा आधार सर्व मतदारसंघांवर लक्ष केंद्रीत केल्यास मराठी मतांचा मोठा टक्का असलेल्या महत्त्वाच्या जागा थोड्या मतांसाठी हातातून निसटतात, हा गेल्या निवडणुकीतील अनुभव गाठीशी आहे. त्या आधारावरच या निवडणुकीची व्यूहरचना आखल्याची माहिती मनसेच्या सूत्रांनी दिली. चेंबूर, घाटकोपर, भांडुप मुलुंड, माहीम, विलेपार्ले, कांदिवली, चारकोप, दादर, परळ, साकीनाका, शिवाजी पार्क, वरळी बीडीडी चाळी, सातरस्ता, वरळी डेरी, शिवडी, माझगाव डॉक, लिबर्टी गार्डन आदी मराठी भाषकांचे प्राबल्य असलेल्या भागांत मनसे मोठा रसदपुरवठा करणार असल्याचे सांगण्यात आले