शनिवार, 14 जनवरी 2012

नागपूर नव्हे, मनसेच्या 'रडार'वर मुंबई!

नागपूर नव्हे, मनसेच्या 'रडार'वर मुंबई!
-
Saturday, January 14, 2012 AT 04:15 AM (IST)
 

नागपूर - मनसेच्या रडारवर सध्या नागपूर महापालिका नाही. या महापालिकेतील विरोधी बाक बळकट करू, असे वक्‍तव्य पक्षाचे विधानसभेतील गटनेते बाळा नांदगावकर यांनी केले. अमरावती येथील कार्यकर्ता संमेलन संपवून नागपुरात आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. मनसेचे "टारगेट' मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे या चार महापालिका आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. नागपूरसाठी एकूण 96 जणांची यादी पक्षाकडे आल्याची माहितीही दिली.

श्री. नांदगावकर म्हणाले, मनसे राज्यातील सर्व महापालिका व जिल्हापरिषद निवडणूक स्वतंत्रपणे लढवणार आहे. निवडणूक आयोगाने जिल्हापरिषद निवडणूक आधी घेऊन बुचकळ्यात टाकले. मात्र, नगरपालिका निवडणुकीत राज्यात 70 नगरसेवक आल्याने कार्यकर्ते एकलव्याप्रमाणे काम करीत आहेत, हे स्पष्ट आहे. त्यामुळे या निवडणुकीतही यश मिळेल. मात्र, महापालिकात मोठे यश मिळेल. राज्यातील चार महापालिकेत सत्ता येईल. मुंबईत तर 70 जागांपेक्षा जास्त जिंकू. नाशिक व ठाण्यातही चांगले वातावरण आहे. पुण्यातही पक्ष सत्तेत बसेल. अमरावती व अकोला येथे महापालिकेसंदर्भात चांगले वातावरण आहे. संमेलनातील गर्दीवरून हे स्पष्ट झाले. माजी आमदार ज्ञानेश्‍वर धाने पाटील यांच्याकडे पक्षाने अमरावतीची जबाबदारी दिली आहे. तीन टर्म आमदार राहिलेल्यांनी पक्षात प्रवेश घेतल्याने मनसेची ताकद वाढली आहे.

खुद्द राज ठाकरे या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत. परीक्षेतील गुण, त्यांच्या वैयक्‍तिक डाटा, निरीक्षकांचा अहवाल यावेळी त्यांच्यापुढे असेल. त्यामुळे मेरिटच्या उमेदवाराला प्राधान्य मिळेल. काही इच्छुक अपरिहार्य कारणामुळे लेखी परीक्षेपासून वंचित राहिले होते. त्यांनाही पुन्हा परीक्षेची संधी दिली गेली. त्यांच्याही वैयक्‍तिक मुलाखत घेतली जाणार असल्याचे श्री. नांदगावकर यांनी सांगितले. हेमंत गडकरी, प्रवीण बरडे यावेळी उपस्थित होते.

निवडणुकीत कुस्ती, सत्तेसाठी दोस्ती! आमच्याकडे नामदेव, रामदास, सोपानदेव नाही. आम्ही एकला चलो रे आहे. युती करून कार्यकर्त्यांना भांडीच धुवायला लावायची नाहीत. शिवसेना हळूहळू स्वत:च रिकामी होत आहे. त्यांची युती व आघाडीचा फायदा मनसेला होईल. त्यांनी स्वतंत्रपणे लढून दाखवावे, असे आव्हानही श्री. नांदगावकर यांनी दिले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें