गुरुवार, 17 जून 2010

'सोनी टीव्ही'ला मनसेचा दणका

'सोनी टीव्ही'ला मनसेचा दणका
सकाळ वृत्तसेवा
Friday, June 18, 2010 AT 12:51 AM (IST)
 

मुंबई - सोनी एंटरटेनमेंट चॅनेलवरून दाखविण्यात येणाऱ्या "कॉमेडी के सुपरस्टार' या मालिकेसाठी पाकिस्तानी कलाकारांसमवेत चित्रीकरण करण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सिने वर्कर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. या मालिकेतील पाकिस्तानी कलाकार शकील सिद्दीकी याची मालिकेतून त्वरित हकालपट्टी करावी, अशी मागणी असोसिएशनने केली आहे. कारवाई न झाल्यास मनसे त्याला आपल्या पद्धतीने चोख प्रत्युत्तर देईल, असा इशाराही आज दिला.

महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर, सरचिटणीस शालिनी ठाकरे, उपाध्यक्ष गजानन राणे आदी पदाधिकाऱ्यांनी सोनी टीव्हीच्या मालाड येथील मुख्य कार्यालयावर मोर्चा नेला. शिष्टमंडळात मनीष धुरी, संदीप देशपांडे, शशांक नागवेकर, सचिन चव्हाण, राजेश चक्रे व विलास सुद्रीक आदींचा समावेश होता. यापूर्वीही शकील सिद्दीकीला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चोप देऊन पळवून लावले होते व पुन्हा भारतात पाकिस्तानी कलाकारांना आणू नये, अशी समज "सोनी टीव्ही'ला दिली होती, असे खोपकर यांनी सांगितले.
पाकिस्तानी कलाकारांना पुन्हा भारतात आणणार नाही, असे सांगून सोनी टीव्हीने भारतीयांची माफी मागितली होती; परंतु पुन्हा तोच प्रकार घडला. भारतात चांगले कलाकार असताना पाकिस्तानी कलाकारांना प्रोत्साहन द्यायचे असेल, तर सोनी टीव्हीची वाटचाल मुंबईत कठीण होईल, असा इशाराही ठाकरे यांनी या वेळी दिला.

सोमवार, 14 जून 2010

मनसेला हवा मुंबई पालिकेत ‘केकवॉक’!

मनसेला हवा मुंबई पालिकेत ‘केकवॉक’! Bookmark and Share Print
मुंबई, १४ जून / खास प्रतिनिधी
आता एकच लक्ष्य.. मुंबई महानगरपालिका ! राज ठाकरे यांच्या आजच्या वाढदिवशी त्यांना भेट म्हणून त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी आणलेले बहुतांशी केक हे पालिकेची प्रतिकृती होते.. शिवसेना- भाजप युतीकडून पालिकेची सत्ता खेचून घेताना आगामी पालिका निवडणुकांत मनसेला केकवॉक मिळणार, असा जणू आत्मविश्वासच या पदाधिकाऱ्यांनी राज यांचे अभिनंदन करताना व्यक्त केला.  शिवाजी पार्क येथील ‘कृष्णभुवन’ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आज सकाळपासून कार्यकर्त्यांची अक्षरश: रीघ  लागली होती. प्रचंड जल्लोषात ढोल-ताशांच्या गजरात मुंबईच्या विविध भागांतून मनसे कार्यकर्ते राज यांना शुभेच्छा देण्यासाठी राज यांच्या निवासस्थानी येत होते. मनसेचे आमदार व गटनेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, राम कदम, यांच्यासह मनसेच्या सर्व आमदारांनी राज यांचे अभिष्टचिंतन केले. मुंबईबाहेरचे कार्यकर्तेही विविध वाहनांतून राज यांचा जयघोष करीत येत होते. राज यांच्या निवासस्थानाबाहेर उभारलेल्या मंडपात कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा राज यांनी स्वीकारल्या. कार्यकर्त्यांप्रमाणेच चित्रपट, संगीत अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही राज यांना पुष्पगुच्छ पाठवून तसेच दूरध्वनीवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. राज यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत जागोजागी मनसेच्या कार्यकर्त्यांनी फलक लावले होते. त्याचप्रमाणे आरोग्य उपक्रम तसेच वह्या वाटप करून अनेक पदाधिकाऱ्यांनी राज यांचा वाढदिवस साजरा केला. मनसेचे राम कदम यांनी आमदार झाल्यानंतर आपल्या मतदारसंघात कार्यकर्त्यांसाठी दरवाजा नसलेले व चोवीस तास उघडे राहणारे कार्यालय सुरु केले होते. या कार्यालयाला आयएसओ ९००१ दर्जा मिळाला असून त्याचे प्रमाणपत्र राम कदम यांनी राज यांना वाढदिवसानिमित्त सादर केले. अनेक कार्यकर्त्यांनी आणलेले केक लक्ष वेधून घेणारे होते. यातील महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने आणलेला केक विशेष लक्ष वेधून घेणारा होता. आता ‘लढाई मुंबई महापालिकेची’ हे दर्शविणारा मुंबई महापालिका मुख्यालयाची प्रतिकृती असलेला हा मोठा केक होता.
राज यांच्या वाढदिवसानिमित्त आज राजकीय वर्तुळात चर्चा होती ती त्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा त्यांना शुभेच्छा देणारा दूरध्वनी येणार का, याची. राज यांनी शिवसेना सोडल्यानंतर दरवर्षी ठाकरे हे आपल्या पुतण्याला वाढदिवशी शुभेच्छा पाठवत होते. मात्र यंदा विधान परिषद निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राज आणि उद्धव यांत रंगलेल्या संघर्षांच्या पाश्र्वभूमीवर शिवसेनाप्रमुखांचा दूरध्वनी राज यांना आला नाही.

'मनसे'कडून मदत?.. मिळालीच नाही!

'मनसे'कडून मदत?.. मिळालीच नाही!
सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, June 15, 2010 AT 12:15 AM (IST)
 

नवी दिल्ली -  महाराष्ट्रात विधान परिषदेच्या निवडणुकीत कॉंग्रेसला मदत करण्यावरून राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेत भांडण सुरू असताना कॉंग्रेसने या मदतीचा इन्कार केला आहे. "राज ठाकरेंशी कोणत्याही प्रकारचा समझोता होऊच शकत नाही,' अशा शब्दांत कॉंग्रेस-मनसे हातमिळवणी झाली नसल्याचा दावा पक्षाने केला आहे.

विधान परिषद निवडणुकीत कॉंग्रेसने समर्थन दिलेले अपक्ष उमेदवार विजय सावंत विजयी, तर शिवसेनेचे अनिल परब पराभूत झाले. त्यानंतर "मनसे'च्या आमदारांनी केलेल्या मतदानामुळे सावंत जिंकले असून, राज ठाकरेंनी कॉंग्रेसशी समझोता केला, अशी टीकेची झोड शिवसेनेने उठवली. शिवसेनेकडून होणाऱ्या "थैलीशाही'च्या आरोपांमुळे चिडलेल्या राज ठाकरेंनी "कॉंग्रेसशी समझोता हा "धनसे' नव्हे, तर "मनसे' होता,' असे प्रत्युत्तर देताना आपल्या आमदारांचे निलंबन रद्द व्हावे, यासाठीच कॉंग्रेसला मदत केल्याचे म्हटले होते. मुंबईत राहणाऱ्या उत्तर भारतीय आणि बिहारी नागरिकांविरुद्ध तीव्र आंदोलन केल्याबद्दल राज ठाकरेंना लक्ष्य करणाऱ्या कॉंग्रेसने विधान परिषदेच्या निवडणुकीत मात्र आपल्या समर्थक अपक्ष उमेदवाराला निवडून आणण्यासाठी राज ठाकरेंची मदत घेतल्याने शिवसेनेचा तिळपापड झाला.

राज ठाकरेंशी केलेल्या या हातमिळवणीचा परिणाम बिहार आणि उत्तर प्रदेशमधील आगामी निवडणुकांवर होऊ शकतो, याची धास्ती असल्याने राष्ट्रीय पक्ष असणाऱ्या कॉंग्रेसने "मनसे'शी कोणताही समझोता झालेला नसल्याचे दाखविणे सुरू केले आहे. या संदर्भात कॉंग्रेस मुख्यालयात झालेल्या दैनंदिन वार्तालापादरम्यान प्रवक्‍त्या जयंती नटराजन यांना, "मनसे'शी झालेल्या समझोत्यामुळे बिहार, उत्तर प्रदेशच्या निवडणुकांत कॉंग्रेसचे नुकसान होईल का, असे विचारले असता, ""कॉंग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत समझोता होऊच शकत नाही. दोन्ही पक्षांच्या विचारसरणीमध्ये मोठे अंतर आहे. ते सर्वांना माहिती असल्याने मी याचा इन्कार करते,'' असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, राज ठाकरेंनी स्वतः या संदर्भात पत्रकार परिषदेत वक्तव्य केल्याचे निदर्शनास आणून दिले असता, ""राज ठाकरे जे सांगत आहेत त्याची आपणाला माहिती नाही,'' असा बचावात्मक पवित्रा त्यांनी घेतला.

रविवार, 13 जून 2010

भाऊबंदकीचा पुढचा अंक

भाऊबंदकीचा पुढचा अंक
-
Monday, June 14, 2010 AT 12:45 AM (IST)
  l

पराभव मग तो कोणताही असो; शिवसेनेच्या जिव्हारी लागतो. त्यातून त्या पक्षाचे नेते चवताळून उठतात, कोणीतरी त्यांच्या टीकेचे लक्ष्य होते आणि पुढचे काही दिवस त्या व्यक्तीला, संस्थेला लक्ष्य केले जाते, हाच आजवरचा इतिहास आहे. पराजयातून तो पक्ष काय शिकतो, त्याचे विश्‍लेषण कसे करतो का यापेक्षाही तो कशी प्रतिक्रिया देतो हेच राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे ठरते. विधान परिषदेच्या निवडणुकीत अनिल परब यांचा निसटता पराभव झाल्यावर शिवसेनेतून व्यक्त होत असलेला त्रागा अपेक्षितच होता. उमेदवारांना पसंती देताना शिवसेनेची व्यूहरचना चुकली, की नजरकैदेत ठेवूनही काही आमदारांनी शिस्तीचे दार किलकिले केले यावर इतरत्र बरेच मंथन सुरू आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मतांमुळे आघाडीचा फायदा झाल्याने "सामना' या मुखपत्रातून राज ठाकरे आणि मनसेवर शिवसेनेने सडकून टीका केली. ती जनभावना असल्याचेही स्पष्ट केले. त्याला राज ठाकरे उत्तर देणे अपेक्षितच होते. किंबहुना त्यांनी जाहीररीत्या उत्तर द्यावे म्हणूनही हा खटाटोप करण्यात आल्याची चर्चा रंगली होती. त्यातच राज यांच्या समर्थकांतील खास करून तरुणाईतील अस्वस्थता या वेळी लपून राहिली नाही. त्यांच्या राजकीय शैलीची पाठराखण करणारी ही मंडळी "सोशल नेटवर्किंग'वर मोकळी झाली. त्यांनी आपली नापसंती उघड केली. कॉंग्रेसधार्जिण्या, राजकीय सोय पाहणाऱ्या शिवसेनेच्या आजवरच्या राजकारणावर त्यांनी नेमके बोट ठेवले. शिवाय या वेळच्या टीकेत राज यांनी जुने संदर्भ देताना बडव्यांसोबत प्रत्यक्ष आपल्या "विठ्ठला'लाही सोडलेले नाही. ज्यांना उमेदवारी दिली त्यांचे राजकीय कर्तृत्व जगजाहीर करण्यापासून, ज्यांना पवित्र करून पक्षात घेतले त्यांच्यापर्यंत साऱ्यांनाच त्यांच्या टीकेचे लक्ष्य व्हावे लागल्याने ही राजकीय टोलेबाजी नजीकच्या काळातही सुरूच राहील, असे दिसते. खरे तर यात नवे काहीच नाही.

शिवसेनेचे राजकारण ज्यांनी जवळून पाहिले आहे, त्यांना यातील बऱ्याच खाचाखोचांची कल्पना आहे. आजवर त्याची जाहीररीत्या वाच्यता व्हायची ती केवळ आरोपांच्या पातळीवर. राज ठाकरे हे शिवसेनेच्या पूर्वीच्या निर्णयप्रकियेचे जवळचे साक्षीदार असल्याने त्यांच्या प्रत्युत्तरातील तपशिलाला महत्त्व आहे, इतकेच. "माझा पक्ष मला हवा तसा चालवू द्या,' ही राज यांनी व्यक्त केलेली अपेक्षा आणि त्याच वेळी त्यांनी "माझे घर माझ्या व्यवसायातील पैशांवर चालते, राजकारणातील पैशांवर नव्हे,' अशी केलेली टीका शिवसेना नेत्यांना झोंबणारी आहे. मुळातच मनसे आमदारांचे निलंबन रद्द व्हावे यासाठी मनसे आघाडीला पाठिंबा देईल, अशी चर्चा होती. ती खरी असल्याचे व त्यासाठीच ही तडजोड केल्याचे राज यांनी जाहीरही केले. त्याला शिवसेना मुद्देसूद उत्तर देईल, असे अपेक्षित होते. मात्र "अबू आझमींशी संगत लखलाभ असो,' असा तिरकस शेरा मारून शिवसेनेने आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे. विधानसभा निवडणुकांतील पराभवानंतर शिवसेनेने मनसेला आणि त्या पक्षामागे जाणाऱ्या मराठी माणसाला टीकेचे लक्ष्य केले होते. नंतरही दोन्ही चुलत भावांनी रक्तदान महायज्ञावरून टोलेबाजी केली होती. पुढे अंबरनाथला मनसेच्या पाठिंब्यावर शिवसेनेला सत्ता मिळताच अनेकांना नव्या राजकीय चाहुलीची स्वप्ने पडली होती. उद्धव ठाकरे हे चांगले छायाचित्रकार आहेत, या राज ठाकरे यांच्या कौतुकामागची खोच न कळल्यानेही बरेच राजकीय विश्‍लेषक भांबावले होते. अनेकांना तर शिवसेना-मनसे एकत्र येण्याची नवी राजकीय पहाट दिसू लागली होती. त्यांनी एक व्हावे म्हणून आवाहने, आर्जवांना ऊत आला होता. मात्र अखेर महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पाचवीला पुजलेली भाऊबंदकीच पुन्हा समोर आली आणि त्या नाट्याचा नवा अंक सुरू झाला. या प्रयोगातील महत्त्वाचा प्रवेश आहे, तो कॉंग्रेसचा. मनसेच्या मतांमुळे आघाडीचा- मुख्यमंत्र्यांच्या पसंतीचा चौथा उमेदवार निवडून आला, हे उघड गुपित होते. मनसेच्या मतांची विभागणी आदल्याच दिवशी जाहीर झालेलीही होती. फक्त उत्तर भारतीयांचा रोष पत्करावा लागू नये यासाठी कॉंग्रेसने मनसेच्या पाठिंब्याबाबत कानावर हात ठेवले. आता उत्तरेतील राजकारण कदाचित कॉंग्रेसला साधता येईल. मात्र लहान, प्रादेशिक पक्षांचा राजकीय स्वार्थासाठी होणारा वापर आणि तो होऊ देणारे नेते स्पष्टपणे समोर आले. आधीच बदलत्या भूमिका आणि सोयीचे राजकारण यामुळे जवळपास निम्मा मतदार निवडणुकांपासून दूर राहतो. त्यातच पेटी-खोका संस्कृती, मतदान करणाऱ्या लोकप्रतिनिधींना झालेल्या राजकीय लाभाची चर्चा उघडपणे सुरू झाल्याने राजकारण हे कामाच्या क्षेत्रापेक्षा लाभाचे, हिशेब चुकते करण्याचे, इप्सित साध्य करण्याचे क्षेत्र म्हणूनच अधिक नावारूपाला येते आहे, हे दुर्दैवी आहे. अगदी बाळासाहेब ठाकरेंपासून शिवसेनेच्या नेत्यांच्या भाषणात रोखठोक भूमिकेबरोबरच मनोरंजन, नकला, खिल्ली सारे ठासून भरलेले असते. त्यातून मतदारांचे, सभेला आलेल्या श्रोत्यांचे मनोरंजन होते. आताच्या भाऊबंदकीच्या नाट्यातून फारशी नवी नसलेली रहस्यमय दृश्‍ये पाहायला मिळाली. उत्कंठा ताणून धरावी, असे काही दिसेल, पाहायला मिळेल किंवा समोर येईल, असे नाही. काही प्रवेश तर पुनःपुन्हा पाहावे लागण्याची चिन्हे आहेत. यातून नागरिकांची करमणूक होईलही कदाचित, पण पुढे काय? या भाऊबंदकीचे रूपांतर संघर्षात, रस्त्यावर उतरून केल्या जाणाऱ्या शक्तिप्रदर्शनात होऊ नये, एवढीच अपेक्षा.