मनसेला हवा मुंबई पालिकेत ‘केकवॉक’! |
आता एकच लक्ष्य.. मुंबई महानगरपालिका ! राज ठाकरे यांच्या आजच्या वाढदिवशी त्यांना भेट म्हणून त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी आणलेले बहुतांशी केक हे पालिकेची प्रतिकृती होते.. शिवसेना- भाजप युतीकडून पालिकेची सत्ता खेचून घेताना आगामी पालिका निवडणुकांत मनसेला केकवॉक मिळणार, असा जणू आत्मविश्वासच या पदाधिकाऱ्यांनी राज यांचे अभिनंदन करताना व्यक्त केला. शिवाजी पार्क येथील ‘कृष्णभुवन’ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आज सकाळपासून कार्यकर्त्यांची अक्षरश: रीघ लागली होती. प्रचंड जल्लोषात ढोल-ताशांच्या गजरात मुंबईच्या विविध भागांतून मनसे कार्यकर्ते राज यांना शुभेच्छा देण्यासाठी राज यांच्या निवासस्थानी येत होते. मनसेचे आमदार व गटनेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, राम कदम, यांच्यासह मनसेच्या सर्व आमदारांनी राज यांचे अभिष्टचिंतन केले. मुंबईबाहेरचे कार्यकर्तेही विविध वाहनांतून राज यांचा जयघोष करीत येत होते. राज यांच्या निवासस्थानाबाहेर उभारलेल्या मंडपात कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा राज यांनी स्वीकारल्या. कार्यकर्त्यांप्रमाणेच चित्रपट, संगीत अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही राज यांना पुष्पगुच्छ पाठवून तसेच दूरध्वनीवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. राज यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत जागोजागी मनसेच्या कार्यकर्त्यांनी फलक लावले होते. त्याचप्रमाणे आरोग्य उपक्रम तसेच वह्या वाटप करून अनेक पदाधिकाऱ्यांनी राज यांचा वाढदिवस साजरा केला. मनसेचे राम कदम यांनी आमदार झाल्यानंतर आपल्या मतदारसंघात कार्यकर्त्यांसाठी दरवाजा नसलेले व चोवीस तास उघडे राहणारे कार्यालय सुरु केले होते. या कार्यालयाला आयएसओ ९००१ दर्जा मिळाला असून त्याचे प्रमाणपत्र राम कदम यांनी राज यांना वाढदिवसानिमित्त सादर केले. अनेक कार्यकर्त्यांनी आणलेले केक लक्ष वेधून घेणारे होते. यातील महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने आणलेला केक विशेष लक्ष वेधून घेणारा होता. आता ‘लढाई मुंबई महापालिकेची’ हे दर्शविणारा मुंबई महापालिका मुख्यालयाची प्रतिकृती असलेला हा मोठा केक होता.
राज यांच्या वाढदिवसानिमित्त आज राजकीय वर्तुळात चर्चा होती ती त्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा त्यांना शुभेच्छा देणारा दूरध्वनी येणार का, याची. राज यांनी शिवसेना सोडल्यानंतर दरवर्षी ठाकरे हे आपल्या पुतण्याला वाढदिवशी शुभेच्छा पाठवत होते. मात्र यंदा विधान परिषद निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राज आणि उद्धव यांत रंगलेल्या संघर्षांच्या पाश्र्वभूमीवर शिवसेनाप्रमुखांचा दूरध्वनी राज यांना आला नाही.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें