भाऊबंदकीचा पुढचा अंक
-
Monday, June 14, 2010 AT 12:45 AM (IST)
पराभव मग तो कोणताही असो; शिवसेनेच्या जिव्हारी लागतो. त्यातून त्या पक्षाचे नेते चवताळून उठतात, कोणीतरी त्यांच्या टीकेचे लक्ष्य होते आणि पुढचे काही दिवस त्या व्यक्तीला, संस्थेला लक्ष्य केले जाते, हाच आजवरचा इतिहास आहे. पराजयातून तो पक्ष काय शिकतो, त्याचे विश्लेषण कसे करतो का यापेक्षाही तो कशी प्रतिक्रिया देतो हेच राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे ठरते. विधान परिषदेच्या निवडणुकीत अनिल परब यांचा निसटता पराभव झाल्यावर शिवसेनेतून व्यक्त होत असलेला त्रागा अपेक्षितच होता. उमेदवारांना पसंती देताना शिवसेनेची व्यूहरचना चुकली, की नजरकैदेत ठेवूनही काही आमदारांनी शिस्तीचे दार किलकिले केले यावर इतरत्र बरेच मंथन सुरू आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मतांमुळे आघाडीचा फायदा झाल्याने "सामना' या मुखपत्रातून राज ठाकरे आणि मनसेवर शिवसेनेने सडकून टीका केली. ती जनभावना असल्याचेही स्पष्ट केले. त्याला राज ठाकरे उत्तर देणे अपेक्षितच होते. किंबहुना त्यांनी जाहीररीत्या उत्तर द्यावे म्हणूनही हा खटाटोप करण्यात आल्याची चर्चा रंगली होती. त्यातच राज यांच्या समर्थकांतील खास करून तरुणाईतील अस्वस्थता या वेळी लपून राहिली नाही. त्यांच्या राजकीय शैलीची पाठराखण करणारी ही मंडळी "सोशल नेटवर्किंग'वर मोकळी झाली. त्यांनी आपली नापसंती उघड केली. कॉंग्रेसधार्जिण्या, राजकीय सोय पाहणाऱ्या शिवसेनेच्या आजवरच्या राजकारणावर त्यांनी नेमके बोट ठेवले. शिवाय या वेळच्या टीकेत राज यांनी जुने संदर्भ देताना बडव्यांसोबत प्रत्यक्ष आपल्या "विठ्ठला'लाही सोडलेले नाही. ज्यांना उमेदवारी दिली त्यांचे राजकीय कर्तृत्व जगजाहीर करण्यापासून, ज्यांना पवित्र करून पक्षात घेतले त्यांच्यापर्यंत साऱ्यांनाच त्यांच्या टीकेचे लक्ष्य व्हावे लागल्याने ही राजकीय टोलेबाजी नजीकच्या काळातही सुरूच राहील, असे दिसते. खरे तर यात नवे काहीच नाही.
शिवसेनेचे राजकारण ज्यांनी जवळून पाहिले आहे, त्यांना यातील बऱ्याच खाचाखोचांची कल्पना आहे. आजवर त्याची जाहीररीत्या वाच्यता व्हायची ती केवळ आरोपांच्या पातळीवर. राज ठाकरे हे शिवसेनेच्या पूर्वीच्या निर्णयप्रकियेचे जवळचे साक्षीदार असल्याने त्यांच्या प्रत्युत्तरातील तपशिलाला महत्त्व आहे, इतकेच. "माझा पक्ष मला हवा तसा चालवू द्या,' ही राज यांनी व्यक्त केलेली अपेक्षा आणि त्याच वेळी त्यांनी "माझे घर माझ्या व्यवसायातील पैशांवर चालते, राजकारणातील पैशांवर नव्हे,' अशी केलेली टीका शिवसेना नेत्यांना झोंबणारी आहे. मुळातच मनसे आमदारांचे निलंबन रद्द व्हावे यासाठी मनसे आघाडीला पाठिंबा देईल, अशी चर्चा होती. ती खरी असल्याचे व त्यासाठीच ही तडजोड केल्याचे राज यांनी जाहीरही केले. त्याला शिवसेना मुद्देसूद उत्तर देईल, असे अपेक्षित होते. मात्र "अबू आझमींशी संगत लखलाभ असो,' असा तिरकस शेरा मारून शिवसेनेने आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे. विधानसभा निवडणुकांतील पराभवानंतर शिवसेनेने मनसेला आणि त्या पक्षामागे जाणाऱ्या मराठी माणसाला टीकेचे लक्ष्य केले होते. नंतरही दोन्ही चुलत भावांनी रक्तदान महायज्ञावरून टोलेबाजी केली होती. पुढे अंबरनाथला मनसेच्या पाठिंब्यावर शिवसेनेला सत्ता मिळताच अनेकांना नव्या राजकीय चाहुलीची स्वप्ने पडली होती. उद्धव ठाकरे हे चांगले छायाचित्रकार आहेत, या राज ठाकरे यांच्या कौतुकामागची खोच न कळल्यानेही बरेच राजकीय विश्लेषक भांबावले होते. अनेकांना तर शिवसेना-मनसे एकत्र येण्याची नवी राजकीय पहाट दिसू लागली होती. त्यांनी एक व्हावे म्हणून आवाहने, आर्जवांना ऊत आला होता. मात्र अखेर महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पाचवीला पुजलेली भाऊबंदकीच पुन्हा समोर आली आणि त्या नाट्याचा नवा अंक सुरू झाला. या प्रयोगातील महत्त्वाचा प्रवेश आहे, तो कॉंग्रेसचा. मनसेच्या मतांमुळे आघाडीचा- मुख्यमंत्र्यांच्या पसंतीचा चौथा उमेदवार निवडून आला, हे उघड गुपित होते. मनसेच्या मतांची विभागणी आदल्याच दिवशी जाहीर झालेलीही होती. फक्त उत्तर भारतीयांचा रोष पत्करावा लागू नये यासाठी कॉंग्रेसने मनसेच्या पाठिंब्याबाबत कानावर हात ठेवले. आता उत्तरेतील राजकारण कदाचित कॉंग्रेसला साधता येईल. मात्र लहान, प्रादेशिक पक्षांचा राजकीय स्वार्थासाठी होणारा वापर आणि तो होऊ देणारे नेते स्पष्टपणे समोर आले. आधीच बदलत्या भूमिका आणि सोयीचे राजकारण यामुळे जवळपास निम्मा मतदार निवडणुकांपासून दूर राहतो. त्यातच पेटी-खोका संस्कृती, मतदान करणाऱ्या लोकप्रतिनिधींना झालेल्या राजकीय लाभाची चर्चा उघडपणे सुरू झाल्याने राजकारण हे कामाच्या क्षेत्रापेक्षा लाभाचे, हिशेब चुकते करण्याचे, इप्सित साध्य करण्याचे क्षेत्र म्हणूनच अधिक नावारूपाला येते आहे, हे दुर्दैवी आहे. अगदी बाळासाहेब ठाकरेंपासून शिवसेनेच्या नेत्यांच्या भाषणात रोखठोक भूमिकेबरोबरच मनोरंजन, नकला, खिल्ली सारे ठासून भरलेले असते. त्यातून मतदारांचे, सभेला आलेल्या श्रोत्यांचे मनोरंजन होते. आताच्या भाऊबंदकीच्या नाट्यातून फारशी नवी नसलेली रहस्यमय दृश्ये पाहायला मिळाली. उत्कंठा ताणून धरावी, असे काही दिसेल, पाहायला मिळेल किंवा समोर येईल, असे नाही. काही प्रवेश तर पुनःपुन्हा पाहावे लागण्याची चिन्हे आहेत. यातून नागरिकांची करमणूक होईलही कदाचित, पण पुढे काय? या भाऊबंदकीचे रूपांतर संघर्षात, रस्त्यावर उतरून केल्या जाणाऱ्या शक्तिप्रदर्शनात होऊ नये, एवढीच अपेक्षा.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें