पुण्यात विरोधी पक्षनेतेपद मनसेकडे?
- सकाळ वृत्तसेवा
Saturday, February 25, 2012 AT 02:15 AM (IST)
सर्वाधिक संख्याबळ असलेला विरोधी पक्ष किंवा नोंदणीकृत आघाडीस विरोधी पक्षनेतेपद देण्याची कायद्यात तरतूद आहे. त्यामुळे भाजप, शिवसेना आणि रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) यांनी एकत्रित येऊन विभागीय आयुक्तांकडे एक गट म्हणून नोंदणी केली, तर त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळेल, अशी चर्चा होती. मात्र, महायुतीच्या एकत्रित नोंदणीची शक्यता दोन्ही प्रमुख पक्षांनी जवळपास नाकारली आहे. त्यामुळे 29 जागा असणारा मनसे पुणे महापालिकेतील विरोधी पक्ष म्हणून विराजमान होणार असल्याची शक्यता बळावली आहे.
या संदर्भात भाजपचे शहराध्यक्ष विकास मठकरी म्हणाले, ""पुणेकरांनी शहरात कोणालाही स्पष्ट कौल दिला नसला, तरी राष्ट्रवादीला सत्तेसाठी जनादेश मिळाला आहे, तर विरोधी पक्षात मनसेला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. भाजप-शिवसेना आणि रिपब्लिकन पक्षाची एकत्रित नोंदणी करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. महायुती महापालिकेच्या जागावाटपापुरती सीमित होती, तिघांना एक गट म्हणून एकत्र येणे कितपत शक्य आहे, याचा विचार करावा लागेल.''
शिवसेनेच्या संपर्क प्रमुख डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, ""एकत्र गट नोंदणीबाबत आमची चर्चा झालेली नाही. भाजपकडून तसा प्रस्ताव यायला हवा, तसा प्रस्ताव आला, तर पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल.''
स्वतंत्र अस्तित्वावरच भर
बीडीपीसह अनेक मुद्द्यांवर भाजप आणि शिवसेनेत मतभेद असून, एक गट म्हणून नोंदणी झाली तरी भविष्यात अनेक विषयांवर मतभेद होऊ शकतात. त्यामुळे एकमेकांमध्ये गट म्हणून अडकण्यापेक्षा स्वतंत्र अस्तित्व ठेवण्यावरच या दोन्ही पक्षांचा भर असल्याचे समजते