मंगलवार, 21 फ़रवरी 2012

विधानसभेनंतर मते घटल्यावरही मुंबईत मनसेचे इंजिन सुसाट

विधानसभेनंतर मते घटल्यावरही मुंबईत मनसेचे इंजिन सुसाट
राजेश मोरे - सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, February 21, 2012 AT 04:00 AM (IST)
 

मुंबई - भाजप, शिवसेना आणि रिपब्लिकन पक्षाने एकत्र येऊन "महायुती" म्हणून लढविलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणूकीतील मते अल्प प्रमाणात वाढली आहेत. विधानसभेच्या मानाने या मतांमध्ये अल्प प्रमाणात का होईना वाढ झाल्यावरही जागा कमी होण्याचा फटका युतीला बसला आहे. पण त्याचवेळी सातत्याने एकट्याने लढत असलेल्या मनसेच्या मतांमध्ये विधानसभेच्या मानाने लाख मतांची घट झाल्यावरही जागा मोठ्या प्रमाणात वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

विधानसभेच्या निवडणूकीपासून मनसेचे इंजिन जोरात मुंबईसह महाराष्ट्रातील प्रवास करीत आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही एकएक शहर करीत संपूर्ण राज्यात मनसे मजबुत करणार असल्याचे सांगितले आहे. खेड नगरपालिकापाठोपाठ नाशिकवर मनसेचा झेंडा फडकून त्याची सत्यता प्रत्यक्षात येणार असल्याचे मानले जात आहे. मनसे वाढताना शिवसेनेच्या नेतृत्त्वाने कितीही अमान्य केले तरी त्याचा सर्वाधिक फटका शिवसेनेलाच बसत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातही मुंबईसह इतर शहरीभागातील शिवसेनेतील अंतर्गत शहकाटशहाचे राजकारण मनसेच्या पथ्यावर पडत आहे. 2009 मधील विधानसभेच्या निवडणूकीत मनसेचे मुंबईतून तब्बल सहा आमदार निवडून आले होते. या विधानसभेच्या निवडणूकीत मनसेला 10 लाख 83 हजार 138 मते मिळाली होती. तर त्यावेळी रिपब्लिकन पक्ष सोबत नसताना शिवसेना भाजप युतीला 14 लाख 29 हजार 447 मते मिळाली होती. तर शिवसेनेचे केवळ चार आमदार आणि भाजपचे पाच आमदार निवडून आले होते.

यंदाची मुंबई महापालिकेची निवडणूक शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. त्यासाठी त्यांनी आपले सारे कौशल्य पणाला लावून महायुतीच्या प्रचाराची सारी सुत्रे आपल्या हाती ठेवून महायुतीला सत्तेच्या नजीक नेऊन ठेवले आहे. पण महापालिकेच्या निवडणूकीत रिपब्लिकन (आठवले) गटाला सोबत घेतल्यावरही या निवडणूकीत महायुतीला 14 लाख 35 हजार 733 मते मिळाली आहेत. विधानसभेच्या निवडणूकीपेक्षा सहा हजार 286 मतांची वाढ मिळाल्यावरही आणि युतीची "महायुती" झाल्यावरही महायुतीच्या दोन जागा कमी झाल्या आहेत. तर मनसेची मते विधानसभेच्या मानाने तब्बल 1 लाख 33 हजार 5 मतांनी घटल्यावरही त्यांनी तब्बल 29 जागांपर्यंत मजल मारली आहे. मनसेला महापालिकेच्या निवडणूकीत मुंबईत 9 लाख 50 हजार 133 मते मिळाली आहेत. विधानसभेपेक्षा मुंबई महापालिकेच्या निवडणूकीत कमी झालेली मते मनसेच्या दृष्टीने एक चर्चेचा विषय असला तरी ठराविक मराठमोळ्या पॉकेट्‌समधील मनसेच्या मतांची वाढ रिपब्लिकन पक्षाला सोबत घेतल्यावरही युतीच्या आणि त्यातही शिवसेनेच्या दृष्टीने चिंतेची बाब ठरली आहे



कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें