सोमवार, 12 अगस्त 2013

मनसेचे... खळ्ळं खट्याक!


- - सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2013 - 01:30 AM IST

सातारा - दुष्काळी तालुक्‍यात चारा छावण्या सुरू ठेवाव्यात, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी, कर्मचाऱ्यांनी आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या मोटारीची बेसबॉल स्टीकने तोडफोड केली. त्यानंतर जिल्हाध्यक्ष रणजित भोसले व अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते स्वत:हून शहर पोलिस स्टेशनमध्ये हजर झाले. त्यांना पोलिसांनी अटक केली.

माण, खटाव, फलटण तालुक्‍यांत चारा छावण्या सुरू ठेवाव्यात, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 5 ऑगस्टपासून दहिवडी येथे उपोषण सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक करत एसटी बसचीही तोडफोड केली होती. त्यामुळे माणमध्ये तणावपूर्ण शांतता होती. छावण्या सुरू ठेवण्याबाबत कोणताच निर्णय न झाल्याने मनसेने साताऱ्यातून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात अतिरिक्त जिल्हाधिकारी बी. एस. पऱ्हाड यांची मोटार (एमएच 11 एजे 1) उभी होती. सकाळी 11.40 च्या सुमारास स्वत:च्या वाहनातून जिल्हाध्यक्ष रणजित भोसले, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष युवराज पवार व सांगली येथील एक पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात आले. त्यांच्या हातात बेसबॉल स्टीक व मनसेचे झेंडे होते. 11.50 च्या सुमारास रणजित भोसले यांनी स्टीकने वाहनांच्या काचा फोडल्या, तसेच अंबर दिवा फोडला. त्याच वेळी युवराज पवार व एका कार्यकर्त्याने झेंडा फडकावत "महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो, छावण्या सुरू राहिल्याच पाहिजेत' अशी घोषणाबाजी केली.

त्यानंतर आंदोलक रणजित भोसले, युवराज पवार, सचिन माने, संभाजी पाटील, रूपेश जाधव, अभिजित भोसले, आकाश खुडे, तानाजी सावंत व सचिन मोंडे आदी स्वत:हून पोलिस स्टेशनमध्ये हजर झाले. त्यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, जमावबंदी आदेशाचा भंग आदी कलमांखाली गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

जिल्हाधिकाऱ्यांची गाडी वाचली
पालकमंत्री शशिकांत शिंदे यांनी पाटण (कोयनानगर) येथे आज सकाळी बैठक बोलावली होती. त्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. गेले होते. त्यांच्या वाहनाच्या जागेवर आज श्री. पऱ्हाड यांची गाडी उभी होती. प्रत्येक सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित असतात. आज ते दौऱ्यावर असल्याने त्यांची गाडी तोडफोडीतून वाचली.

"महसूल'ची लेखणी थांबली!
मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनाची मोडतोड करत अंबर दिवा फोडला. त्याचा निषेध नोंदविण्यासाठी जिल्ह्यातील 74 महसूल अधिकारी व 1270 कर्मचाऱ्यांनी सोमवार व मंगळवारी कामबंद आंदोलन पुकारले. महसूल विभागाची लेखणी थांबल्याने सर्वसामान्यांची कामे खोळंबली.
अतिरिक्त जिल्हाधिकारी बी. एस. पऱ्हाड, निवासी उपजिल्हाधिकारी सोनाप्पा यमगर, उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख, श्रीमंत पाटोळे, शमा पवार, प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांच्यासह महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांनी निषेध नोंदविण्यासाठी नियोजन भवनात बैठक घेतली.

विविध संघटनांकडून निषेध

घटनेचा निषेध व्यक्‍त करण्यासाठी सातारा जिल्हा महसूल संघटना, जिल्हा महसूल कर्मचारी संघटना, जिल्हा वाहनचालक संघटना, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना, जिल्हा अधिकारी महासंघ व भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. राजकीय गुंडगिरी करून शासकीय यंत्रणेला दहशतवादी कृत्यांनी वेठीस धरण्याऐवजी शेतकरी, कामगारांना न्याय द्यावा, असे निवेदन कामगार शेतकरी संघर्ष समितीने काढले आहे.

सर्वसामान्यांची कामे रेंगाळली
सोमवारी सर्वच अधिकारी, कर्मचारी हे जिल्हाधिकारी, प्रांत, तहसील, मंडलाधिकारी व तलाठी कार्यालयात उपस्थित राहतात. आज सर्वसामान्य लोक अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी, कामे पूर्ण करण्यासाठी, निवेदन देण्यासाठी आली होती; परंतु काम बंद आंदोलन केल्याने आज दिवसभर कामे रेंगाळली.

Narendra Modi ( NaMo ) Speech Live in Hyderabad

Shri. Narendra Modi's speech at 1:08:14