मनसेची 'कोकणी जोडा' मोहीम
-
Saturday, February 12, 2011 AT 12:30 AM (IST)
मुंबई - कोकणातील मुंबईकर "चाकरमान्या'चे कार्ड शिवसेनेने मुंबई व कोकणातील गावात आजवर यशस्वीपणे वापरले आहे. हा फॉर्म्युला आता मनसेदेखील अजमावणार आहे. यासाठी मनसेने "कोकणी जोडा' मोहीम हाती घेतली आहे. कोकणात सध्या ऐरणीवर असलेल्या विविध विषयांवर आक्रमक आंदोलन करून कोकणवासीयांची मने जिंकण्याची व मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत त्याचे ऍडव्हान्टेज पदरात पाडून घेण्याच्या दृष्टीने मनसेने रणनीती आखली आहे.
मनसेतर्फे गुरुवारी परळ येथील शिरोडकर सभागृहात रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चाकरमान्यांचा मेळावा झाला. मनसेचे नेते आमदार बाळा नांदगावकर, आमदार प्रवीण दरेकर, आमदार शिरीष सावंत, सरचिटणीस व प्रवक्ते शिरीष पारकर, आमदार मंगेश सांगळे, शिल्पा सरपोतदार आदींसह कोकण व मुंबईतील प्रमुख कार्यकर्ते मेळाव्याला उपस्थित होते. "मनसे'च्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन कार्यकर्त्यांच्या कुटुंबातील महिलांचे अनोळखी व्यक्तींनी खून केले. त्या प्रकरणांचा तपास करण्यात पोलिस अपयशी ठरल्याने या प्रकरणांची सखोल चौकशी व्हावी, या मागणीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार "मनसे'च्या वतीने 17 फेब्रुवारीला ओरस येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या निमित्ताने "मनसे' कोकणात शक्तिप्रदर्शन करणार आहे. राज यांच्या आदेशावरून होणारा हा मोर्चा साजेसाच झाला पाहिजे, अशा सूचना नांदगावकर यांनी मेळाव्यात कार्यकर्त्यांना दिल्या. कोकणातील माती भुसभुशीत असताना मनसेला अद्याप तिथे जास्त शिरकाव करता आला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. लोकांना अन्य पक्ष नको आहेत. त्यांना मनसे हवी आहे; पण आपले कार्यकर्ते पक्ष वाढवायचा सोडून स्वत: मोठे होण्यात गुंतले आहेत, अशा शब्दांत नांदगावकर यांनी कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या; तर गावातल्या प्रश्नांवर आंदोलन उभे करून पक्षाचा डोलारा कार्यकर्त्यांनी उभा केला पाहिजे, असे दरेकर यांनी सांगितले.
मुंबईत स्थायिक असलेल्या कोकणवासीयांनी गावात संपर्क वाढवला पाहिजे. कोकणातील स्थानिक प्रश्नावर, महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रश्नावर कार्यकर्त्यांनी लढा देऊन कोकणी जनतेच्या मनात मनसेबद्दल विश्वास निर्माण केल्यास कोकणात मनसेला जम बसवता येईल, असे मत मनसेच्या नेत्यांनी या वेळी व्यक्त केले. मनसेचा 2014 मध्ये कोकणात आमदार निवडून येईल, या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू असल्याचे मनसेचे कोकणातील संपर्कप्रमुख शिरीष सावंत यांनी स्पष्ट केले.
कोकणी माणसाच्या मनाचा ठाव घेण्यात मनसे यशस्वी झाल्यास शिवसेनेप्रमाणे मनसेलाही मुंबई महापालिका निवडणुकीत फायदा होऊ शकतो, असा मनसेच्या धुरिणांचा कयास आहे. यासाठी मनसेने "मिशन कोकण' सुरू केले आहे