मंगलवार, 8 फ़रवरी 2011

रेल्वेतील मराठी टक्‍क्‍यांसाठी नवी "राज'नीती

रेल्वेतील मराठी टक्‍क्‍यांसाठी नवी "राज'नीती
पंकज जोशी - सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, February 09, 2011 AT 05:15 AM (IST)
 
पुणे - पदार्पणातच रेल्वेमधील मराठी "टक्‍क्‍या'बाबत आक्रमक भूमिका घेणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता हा मराठी टक्का वाढवण्यासाठी विधायकतेची कास धरत राज्यातील तरुणांकडून रेल्वे परीक्षेचे फॉर्म भरून घेण्याची नवी "राज'नीती आखली आहे. पुढील वर्षात होणाऱ्या चार महापालिकांच्या निवडणुकांना सामोरे जाताना आपला फॉर्म टिकवण्यासाठी "मनसे'ने ही "फॉर्मनीती' आखल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

रेल्वेमध्ये लवकरच स्पर्धापरीक्षेद्वारा दहा हजार कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे. त्यात "मराठी टक्का' वाढविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विधायक राजकारणाचा नवा फंडा मनसेने शोधला आहे. तरुणांकडून रेल्वेपरीक्षेचे फॉर्म भरून घेण्यासाठी सध्या राबवल्या जाणाऱ्या अभियानाचा भाग म्हणून पुणे, मुंबईसारख्या महानगरांपासून ते थेट सासवड, खेडसारख्या तालुक्‍यांच्या गावापर्यंत मनसेतर्फे केंद्र उघडण्यात आले आहे. तिथे परीक्षाफॉर्म उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात मनसेच्या कार्यालयांव्यतिरिक्त रेल्वे व बस स्थानकांवर ता. 6 ते 8 फेब्रुवारी या कालावधीत सुरू असलेल्या या केंद्रांवर फॉर्म भरण्यासाठी इच्छुक तरुणांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. एकट्या पुणे जिल्ह्यात एक लाख फॉर्मचे वाटप झाले, तर पहिल्याच दिवशी 27 हजार तरुणांचे भरलेले परीक्षाफॉर्म प्राप्त झाले. तरुणांचा प्रतिसाद पाहता, येत्या दहा तारखेपर्यंत फॉर्म भरून घेण्याचे काम सुरू राहणार आहे.
प्रत्येक केंद्रावर फॉर्म कसा भरावा, यासाठी एक माहीतगार व्यक्ती उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय पुण्यात आणि मुंबईत फॉर्मसंबंधी मार्गदर्शन करण्यासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच, स्पर्धापरीक्षांच्या फॉर्ममध्ये त्रुटी राहून ते बाद होऊ नयेत यासाठी मनसेने 120 तज्ज्ञांच्या खास पथकाची नेमणूक केली आहे. राज्यातील सर्व फॉर्म भरून झाल्यानंतर त्यांपैकी बिनचूक फॉर्म एकत्र करून "राजगड' या मुंबईतील मनसेच्या मुख्य कार्यालयात पाठविण्यात येतील. तेथे पुन्हा तज्ज्ञांकडून त्या फॉर्मची छाननी होईल आणि मगच ते रेल्वे भरती बोर्डाकडे पाठविण्यात येणार आहेत. जास्तीत जास्त मराठी तरुणांची परीक्षेसाठी निवड व्हावी, या उद्देशाने मनसेतर्फे अशी विविध बाजूंनी काळजी घेण्यात येत आहे. विशेष म्हणजे पूर्वी महाराष्ट्रात रेल्वेची परीक्षा द्यायला येणाऱ्या परप्रांतीयांविरोधात मनसेने यापूर्वी आक्रमक भूमिका घेतली होती. रेल्वे परीक्षेतील भाषिक मुद्‌द्‌याचा प्रश्‍नही त्यांनी लावून धरला होता. त्यानंतर केंद्रीय रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी रेल्वेची परीक्षा सर्व प्रादेशिक भाषांमध्ये घेण्याचे आश्‍वासन दिले होते.
पूर्वी रेल्वेभरतीत केवळ शे-दोनशे मराठी तरुणांची निवड व्हायची. यंदा हा आकडा पाच हजारांपेक्षाही जास्त होणार असल्याचा अंदाज मनसेचे पदाधिकारी व्यक्त करत आहेत. या संदर्भात मनसेचे राज्य सरचिटणीस अनिल शिदोरे म्हणाले, ""आम्ही मराठी बांधवांच्या हितासाठी चांगली कामे करत राहणार आहोत. रेल्वे, विमा, यांसारख्या केंद्रीय नोकऱ्यांमध्ये मराठी माणसाच्या जागा वाढविण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. त्याला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. येत्या 9 मार्चला मनसेच्या स्थापनेला पाच वर्षे पूर्ण होत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर असे विधायक उपक्रम राबविल्याने संघटनात्मक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण व्हायला मदत होत आहे.''
रेल्वेच्या दहा हजार जागांपैकी जास्तीत जास्त जागांवर जर मराठी तरुणांची निवड झाली, तर त्याचा मनसेच्या संघटनात्मक पातळीवर सकारात्मक परिणाम होण्याची शक्‍यता मनसेला वाटते आहे. आगामी काळात मुंबई, पुण्यासह चार महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. मनसेच्या या उपक्रमामुळे या निवडणुकांमध्ये मनसेला राजकीय फायदा होणार का, याबाबत राजकीय निरीक्षकांमध्ये मात्र तर्कवितर्क लढविले जात आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें