"मनसे'शी युतीचे गोपीनाथ मुंडे यांचे संकेत
सकाळ वृत्तसेवा
Monday, February 07, 2011 AT 12:44 AM (IST)
भाजपच्या राज्य कार्यकारिणी बैठकीचा समारोप श्री. मुंडे यांच्या उपस्थितीत झाला. या वेळी बोलताना मुंडे म्हणाले, की खरे तर मागील निवडणुकीतच जनतेने युतीच्या बाजूने कौल दिला होता. लोकांना कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसची भ्रष्ट सत्ता नको होती. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लढविलेल्या 53 जागांवर त्यांना व युतीला मिळालेली मते विजयी उमेदवारांच्या मतांपेक्षा अधिक होती. 13 जागांवर "मनसे'चे उमेदवार विजयी झाले. याचाच अर्थ आपण 110 वर पोचलो असतो. त्यामुळे येत्या काळात समविचारी पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढवावी लागेल. यापुढे महाराष्ट्रात कोणत्याही एका पक्षाला सत्तेत येणे शक्य नाही.''
श्री. मुंडे यांनी तासाभराच्या भाषणात राज्य व केंद्र सरकारमधील भ्रष्टाचारावर जोरदार टीका केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांबाबत अवमानकारक विधान केल्याबद्दल त्यांचा निषेध केला. त्यांनी पत्रकारांची बिनशर्त माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली.
ते म्हणाले, की राज्यात माफियांचे राज्य आहे. आघाडीची सत्ता उलथवून टाकण्याचा संकल्प करूया. संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडीचे सरकार आले, तेव्हा सर्वत्र सोनिया गांधी यांच्या त्यागाची चर्चा होती. त्या वेळी राष्ट्रपतींनी केलेल्या अभिभाषणात शंभर दिवसांत महागाई कमी करू, विदेशातील बॅंकांत असलेला भारतीयांचा पैसा परत आणू व स्वच्छ, प्रामाणिक, पारदर्शी सरकार देऊ, या घोषणा केल्या होत्या. त्यापैकी एकही पूर्ण झालेली नाही.
केंद्रात झालेल्या टेलिकॉम घोटाळ्यामागे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग व सोनिया गांधी यांचाही हात असल्याचा आरोप श्री. मुंडे यांनी केला.
सुधीर मुनगंटीवार यांनी अध्यक्षीय समारोप केला. ते म्हणाले, की 14 मार्च रोजी भाजपच्या वतीने मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय झाला आहे. आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडण्याचा संकल्प करा. गावागावांत हा संदेश पोचवा. माफियाराज हटाओचा नारा घेऊन सर्व शक्तीने तयारीला लागा. प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे, पांडुरंग फुंडकर, खासदार रावसाहेब दानवे, प्रकाश जावडेकर, किरीट सोमय्या, विनोद तावडे, माजी मंत्री हरिभाऊ बागडे, श्रीकांत जोशी, रमापती त्रिपाठी, जिल्हाध्यक्ष सुरेश बनकर, शहराध्यक्ष बसवराज मंगरूळे, रघुनाथ कुलकर्णी, व्ही. सतीश आदी उपस्थित होते.
अशोक चव्हाण यांची आघाडी
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पन्नास आमदारांसह विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार नाकर्ते, नादान आहे. त्यामुळे आता आपल्याला कधी नव्हती एवढी अनुकूलता आहे. त्याचा फायदा घेऊया. सत्तेतून संपत्ती मिळविणाऱ्यांसोबत आपली असमान लढाई आहे. त्यासाठी तयारीला लागा, असा संदेशही त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.
मुंडेंचे वक्तव्य सत्तेसाठी - पारकर मुंबई - मराठी माणसांच्या हितासाठी उभे राहण्याऐवजी केवळ सत्तेचे राजकारण करण्यासाठी व सत्ता मिळविण्याच्या हेतूनेच भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी वक्तव्य केले असावे, असे मत "महाराष्ट्र नवनिर्माण सेने'चे सरचिटणीस शिरीष पारकर यांनी व्यक्त केले.
मराठीच्या मुद्द्यावर मनसेच्या हजारो कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या लाठ्या-काठ्या खाल्ल्या. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर लोकशाहीच्या विरोधात भाषणबंदी घालण्यात आली, तसेच जेव्हा मनसेच्या चार आमदारांचे निलंबन झाले तेव्हा मुंडे कुठे होते? तेव्हा मात्र त्यांनी कुठलीही भूमिका मांडली नव्हती, मग आजच त्यांना मनसेची आठवण कशी झाली, असा सवालही पारकर यांनी केला.
मनसे हा स्वतंत्र पक्ष आहे, या पक्षाला आपले विचार व धोरण आहे. गेल्या चार वर्षांत राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेने प्रगती केली आहे, त्यामुळे मनसेने कोणाबरोबर जावे व मनसेने कुणाशी युती करावी, याचे भाष्य मुंडे यांनी करू नये. तो सर्वाधिकार आमचे अध्यक्ष राज ठाकरे यांचाच आहे, असेही पारकर यांनी स्पष्ट केले.
..तर मुंडेही शिवसेनेत येऊ शकतात - राऊत
मुंबई - "राजकारणात अशक्य काहीच नसते', असे वक्तव्य करून शिवसेना व भाजपच्या युतीमध्ये मनसेचाही समावेश होऊ शकतो, असे संकेत देणाऱ्या मुंडे यांना आज शिवसेनेनेही ठाकरी भाषेत उत्तर दिले. "जर राजकारणात अशक्य काहीच नसते, तर मुंडेही शिवसेनेत येऊ शकतात,' असे भाकीत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज केले.
ते म्हणाले, ""शिवसेना व भाजपची युती गेल्या दोन दशकांची आहे व शिवसेना कोणाबरोबर युती करणार व कोणासोबत जाणार याचा निर्णय मुंडे नव्हे, तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हेच घेत असतात, हे बहुधा ते विसरले असावेत.''
राजकारणात काहीही अशक्य नसते व कधीही काहीही घडू शकते, हे आम्हालाही माहीत आहे, त्यामुळे संभाव्य राजकीय समीकरणाबद्दल विधाने करणारे मुंडे हे कधीही शिवसेनेत येऊ शकतात.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें