शनिवार, 13 जनवरी 2018

मी हाती घेतलेले काम अर्धवट ठेवत नाही : राज ठाकरे


राजापूर : रिफायनरी प्रकल्प रद्द करायचा असेल तर सर्वांनी एकत्र रहावे लागेल. प्रकल्प रद्द करण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर ही गोष्ट घालेन. मी हाती घेतलेले कोणतेच काम अर्धवट ठेवत नाही. हा प्रकल्प रद्द होईपर्यंत मी तुमच्या पाठीशी राहणार असल्याची ग्वाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज नाणार येथील ग्रामस्थांशी बोलताना दिली.
राजापूर तालुक्यातील नाणार परिसरात रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला आहे. तरीदेखील हा प्रकल्प होणारच असे विधान मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील बैठकीत केले. त्यामुळे हा विरोध आणखीनच वाढला आहे.
ग्रामस्थांच्या विरोधानंतर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षानेदेखील ग्रामस्थांच्या पाठीशी राहण्याचा निर्णघ घेत प्रकल्पाला विरोध केला आहे. मात्र, याबाबत मनसेने आपली कोणतीच भूमिका स्पष्ट घेतलेली नाही.
नाणार परिसरातील ग्रामस्थांनी मुंबईत राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. या चर्चेदरम्यान आपण प्रकल्प परिसरातील ग्रामस्थांची प्रत्यक्ष भेट घेऊन आपली भूमिका मांडू असे जाहीर केले होते. त्यानुसार शनिवारी नाणार परिसराला भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत माजी आमदार बाळा नांदगावकर उपस्थित होते.
या भेटीदरम्यान उपस्थित ग्रामस्थांनी आम्हाला हा प्रकल्प नको, असे ठणकावून सांगितले. त्याचबरोबर मनसेने एक दणका देऊन हा प्रकल्प येथून हटवावा, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली.
यावेळी राज ठाकरे म्हणाले, की कोकणाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. कोकणी माणूस स्वस्त आहे, असा समज झाल्याने कोकणाच्या माथी असे प्रकल्प लादले जात आहेत. कोकणची ताकद दाखवून द्या, या प्रकल्पाला कडाडून विरोध करा, मी तुमच्या पाठीशी आहे. मात्र, जर फूट पडतील तर मग ब्रह्मदेवही वाचवू शकणार नाही, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
आज होला किंमत नाही तर जगात नाहीला किंमत आहे. त्यामुळे प्रकल्प नको, या भूमिकेवर ठाम रहा, मनसे तुमच्या सोबत आहे, असेही त्यांनी सांगितले.