मुंबई
- मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीला एकत्रितपणे सामोरे जाण्याचा
प्रस्ताव शिवसेनेने आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसमोर (मनसे) ठेवला आहे.
निमित्त ठरले, मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी "मातोश्री‘वर जाऊन उद्धव
यांच्या घेतलेल्या भेटीचे. गेली अनेक वर्षे दुरावलेले हे चुलत बंधू
भेटल्यामुळे नवी राजकीय समीकरणे आकाराला येण्याची शक्यता आहे.
भाजपने
उघडलेली आघाडी आणि गेल्या काही वर्षांच्या सत्तेमुळे निर्माण झालेले
प्रस्थापितविरोधी (ऍन्टीइन्कम्बन्सी) वातावरण भेदण्यासाठी मराठी मतांनी
एकत्र येणे हा एकमेव पर्याय शिवसेनेसमोर असून, तो प्रत्यक्षात आणण्याच्या
हालचाली शिवसेनेतून सुरू झाल्या आहेत. राज आणि उद्धव या दोन्ही ठाकरे
बंधूंबरोबर अत्यंत सलगीचे संबंध असलेल्या "सामना‘चे संपादक संजय राऊत यांनी
या भेटीची कल्पना मांडली होती. ती स्वीकारत आज ठाकरे बंधूंची प्राथमिक भेट
झाली. काही वर्षांच्या मध्यंतरानंतर झालेली ही भेट दोन्ही पक्षांनी मराठी
माणसाला एकत्र आणून निवडणुकीला सामोरे जावे यासाठी होती. भाजप येत्या काही
दिवसांत मुंबईच्या महापालिकेतून बाहेर पडेल आणि कारभाराची चौकशी सुरू करेल,
अशी भीती असल्याने शिवसेना नवा भिडू शोधते आहे. मराठी मतांचे एकत्रीकरण हा
निवडणूक जिंकवून देणारा एकमेव मुद्दा असल्याने ठाकरेंनी एकत्र येण्याचा
प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मुंबई महापालिका
निवडणुकीत फारसे काही हाती लागेल अशी शक्यता वाटत नसल्याने, आज राज यांनी
भावाला भेटण्याची तयारी दाखवली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या
संबंधातला तपशील ठरवण्यास वेळ असला, तरी ही शक्यता तपासून पाहण्यास
दोघांचीही हरकत नाही, हा कार्यकर्त्यांना अत्यंत विधायक मुद्दा वाटतो आहे.
राज
ठाकरे यांचे समर्थक बाळा नांदगावकर हे शिवसेनेत परतणार अशी शक्यता गेल्या
काही दिवसांपासून व्यक्त केली जात होती. त्यांचे शिवसेनेशी असलेले सुमधुर
संबंध लक्षात घेता; त्यांना आज मध्यस्थ ठेवण्यात आले होते. "ही दोन
भावांची नव्हे, तर दोन मोठ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट असल्या‘चे
विधान करीत त्यांनी या भेटीमागील राजकीय रंगांना जगासमोर आणले आहे. मनसेला
या निवडणुकीत फारसे यश मिळणार नसले, तरी प्रत्येक वॉर्डात मनसे खेचणार ती
मते अर्थातच शिवसेनेच्या विरोधात जातील. त्यामुळे त्यांना एकत्र आणण्याचा
विचार या भेटीमागे आहे, असे सांगितले जाते. मुंबईतील उपनगरांत शिवसेनेची
मते फारशी नसल्याने या भागात हार मानावी लागेल, अशी भीती शिवसेना नेत्यांना
वाटते, त्यामुळे एकत्र येण्याची धडपड सुरू आहे.