सेना-मनसेने एकत्र यावे - नाना पाटेकर
-
Wednesday, September 07, 2011 AT 04:00 AM (IST)
मुंबई - मराठी माणसाच्या हितासाठी शिवसेना व मनसेने एकत्र येणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी आज केले. मराठी माणसाचे मत एकच असल्याने ते मत तुम्ही कापून घेणार काय, असा प्रश्नही त्यांनी या पक्षांना उद्देशून केला.
शिवसेना हा मराठी माणसाचा आधार होता; मात्र तुम्ही त्यातून मनसे हा वेगळा पक्ष का स्थापन केलात, असा थेट सवाल नानांनी मुलाखतकार व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते शिरीष पारकर यांना विचारला. त्यावर महाभारतातील कृष्णाच्या दुर्योधनासोबतच्या अयशस्वी शिष्टाईचे उदाहरण देऊन पारकर यांनी तसे होणे अशक्य असल्याचे अप्रत्यक्षपणे सूचित केले. मुंबई गणेश महोत्सव-2011 अंतर्गत "नाना रंग' हा नाना पाटेकर यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम "महाराष्ट्र कला विकास प्रतिष्ठान'तर्फे साठ्ये महाविद्यालयाच्या पटांगणात आयोजित करण्यात आला होता.
अण्णा हजारे यांचे व त्यांच्या आंदोलनाचे पाटेकर यांनी कौतुक केले; मात्र ज्या दिवशी आपल्या स्वतःच्या आयुष्यातून भ्रष्टाचाराचे पूर्ण निर्मूलन होईल, तेव्हाच अण्णांच्या आंदोलनात सामील होईन, असेही त्यांनी स्पष्ट केले. "टीम अण्णा'मधील किरण बेदी व अरविंद केजरीवाल यांच्याबाबत बोलण्यास त्यांनी नकार दिला. राजकारणात जाण्याचा आपला कोणताही विचार नसल्याचे ते म्हणाले