आघाडीला वेध मनसेच्या वचकनाम्याचे?
सकाळ वृत्तसेवा
Friday, October 22, 2010 AT 12:30 AM (IST)
डोंबिवली - शिवसेनेचा वचननामा प्रसिद्ध झाल्यानंतर आता कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यातून कोणत्या आश्वासनांची खैरात होणार आहे, याची जनतेला उत्सुकता लागली आहे. परंतु आघाडीचे नेते जाहीरनामा प्रसिद्ध करण्याबाबत चालढकल करीत असल्याने कार्यकर्ते संभ्रमात आहेत. एकीकडे शिवसेनेच्या जाहीरनाम्यात राहून गेलेल्या मुद्द्यांचा समावेश आपल्या वचननाम्यात करण्याची तयारी आघाडीने सुरू केलेली असतानाच दुसरीकडे मनसेच्या "वचक'नाम्याचे वेध आघाडीला लागले असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर रंगू लागली आहे.
बुधवारी झालेल्या आघाडीच्या संयुक्त बैठकीत जाहीरनामा प्रसिद्ध होईल, अशी शक्यता आघाडीच्या स्थानिक नेत्यांना वाटत होती. आघाडीच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांवर महिन्याभरापासून चर्चा सुरू असून, दोन आठवड्यांपूर्वीच जाहीरनामा तयार असल्याचे सांगण्यात येत होते. प्रत्यक्षात मात्र युतीने वचननामा प्रसिद्ध केल्यानंतर त्यातील आश्वासनांपैकी कोणते मुद्दे राहून गेले आहेत, याची चाचपणी करत आघाडीच्या नेत्यांनी आपल्या जाहीरनाम्यात पुन्हा बदल केला असल्याची माहिती खास सूत्रांकडून मिळाली.
आघाडीच्या नेत्यांनी सुरुवातीपासून मनसेची धास्ती घेतली असून, मनसे आपल्या वचकनाम्यात कोणत्या वचनांना प्राधान्य देते, याकडे आघाडीच्या नेत्यांचे लक्ष लागले आहे. यामुळे जोपर्यंत मनसेचा वचकनामा जाहीर होणार नाही तोपर्यंत आघाडीचे नेते आपला जाहीरनामा प्रसिद्ध करण्याबाबत चालढकल करणार असल्याची शक्यता राजकीय गोटातून व्यक्त होत आहे. मनसेने आपल्या वचकनाम्यात दिलेल्या आश्वासनांनुसार आपल्या जाहीरनाम्यात बदल करून परिपूर्ण जाहीरनामा जनतेसमोर ठेवून त्याद्वारे जनतेला इम्प्रेस करण्याचा डाव आघाडीचे नेते टाकत आहेत.
प्रत्यक्षात जाहीरनाम्यातील वचनांची वीस टक्केही पूर्तता होत नाही. तरीही पालिका निवडणुकीत आघाडी कोणती नवी आश्वासने देणार? याकडे आता मतदारांचे लक्ष लागले आहे.
आघाडीची भूमिका काय?स्थानिक नेते 24 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध करणार असल्याचे सांगत आहेत. असे असले तरीही जोपर्यंत मनसेचा वचकनामा प्रसिद्ध होत नाही तोपर्यंत आघाडीकडून जाहीरनामा प्रसिद्ध होण्यात टाळाटाळ होण्याची शक्यता आहे. प्रत्यक्ष निवडणुकीला अवघे आठ दिवस शिल्लक असतानाही आघाडीची भूमिकाच जनतेसमोर मांडली न गेल्याची भावना जनतेतून व्यक्त होत आहे.