शुक्रवार, 12 अगस्त 2011

राज ठाकरे मुंबईत परतले

राज ठाकरे मुंबईत परतले
सकाळ वृत्तसेवा
Saturday, August 13, 2011 AT 03:45 AM (IST)
 
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे दहा दिवसांच्या गुजरात दौऱ्यानंतर आज सकाळी मुंबईत आगमन झाले. सकाळी सव्वाअकरा वाजता गुजरातच्या अहमदाबाद विमानतळावरून जेट एअरवेजच्या विमानाने आलेल्या राज यांचे मुंबईच्या सांताक्रूझ विमानतळावर सव्वाबारा वाजता मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार स्वागत केले.

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज ठाकरे यांना गुजरात भेटीचे निमंत्रण दिले होते. मोदी यांचे निमंत्रण स्वीकारल्यापासून राज यांच्या गुजरात दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मुख्यमंत्र्यांनीच निमंत्रण दिल्याने राज यांना गुजरातमध्ये "स्टेट गेस्ट'चा दर्जा आपोआपच मिळाला. राज ठाकरे यांनी आपल्या दहा दिवसांच्या गुजरात दौऱ्यात तेथील विकास झालेल्या अनेक ठिकाणांना भेटी दिल्या; तसेच दररोजच पत्रकार परिषदा घेऊन त्यांनी नरेंद्र मोदी व गुजरातच्या विकासाचे कोडकौतुक केले. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी नरेंद्र मोदी देशाच्या पंतप्रधानपदासाठी लायक व्यक्‍तिमत्त्व असल्याचे सांगून त्यासाठी मनसे त्यांना पूर्णपणे पाठिंबा देईल, अशी घोषणा केली. राज यांच्या गुजरात दौऱ्याकडे महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते. ते आता कोणती भूमिका घेतात याची उत्सुकता आहे.

गुरुवार, 11 अगस्त 2011

राज ठाकरे आज परतणार

राज ठाकरे आज परतणार
सकाळ वृत्तसेवा
Friday, August 12, 2011 AT 03:45 AM (IST)
 
मुंबई - महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार करण्यासाठी हातभार लागावा यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुरू केलेल्या गुजरात दौऱ्याची सांगता आज झाली. आपल्या नव्या अनुभवाची शिदोरी गाठीशी बांधलेल्या राज यांचे उद्या सकाळी साडेअकरा वाजता सांताक्रूझ विमानतळावर आगमन होणार आहे.

राज यांनी 3 ऑगस्टपासून गुजरातचा दौरा सुरू केला होता. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे पाहुणे म्हणून त्यांना निमंत्रित करण्यात आले होते. गुजरात पोलिसांच्या फौजफाट्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी गुजरातमधील प्रकल्पांची पाहणी केली. नोकरशहा आणि राज्यकर्त्यांनी एकत्र येऊन केलेल्या या विकासकामांची राज यांनी मुक्तकंठाने स्तुती केली आहे. एवढेच नव्हे, तर भावी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना पसंती दिली आहे. राजकीय पक्षातील मतभेद बाजूला ठेवून केवळ विकासाचा अभ्यास करण्यासाठी गुजरातमध्ये आलेल्या राज यांचे मोदी यांनीही जाहीरपणे कौतुक केले.

बॅड आणि ब्रॅण्ड
गुजरातच्या ब्रॅण्ड ऍम्बेसेडरची जाहिरात आल्यावर "ते' तिकडे गेले असावेत, अशी टीका शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी राज यांचे नाव न घेता केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून "बॅड ऍम्बेसेडर' असण्यापेक्षा ब्रॅण्ड ऍम्बेसेडर असणे केव्हावी उत्तमच, असा टोला राज यांनी लगावला आहे.

मंगलवार, 9 अगस्त 2011

मी मुंबईकर, मी मराठी अन्‌ "हूं गुजराती!'

मी मुंबईकर, मी मराठी अन्‌ "हूं गुजराती!'
प्रकाश अकोलकर
Tuesday, August 09, 2011 AT 03:00 AM (IST)
 

राज ठाकरे यांनी गुजरात दौऱ्याची आखणी मोठ्या चतुराईनं केली आहे. राजकीय, भावनात्मक आणि अभ्यास अशी तीन स्तरांवर समाजमनाशी धागा जोडण्याचा हा प्रयत्न आहे.

राज ठाकरे सध्या गुजरातेत आहेत. सोबत पत्रकार आहेत, त्याचबरोबर विविध क्षेत्रांतील जाणकारही. कुणी व्यवस्थापन शास्त्राचा तज्ज्ञ आहे, तर कुणाचा विदेशी राजनीती आणि अर्थनीती यांचा अभ्यासक आहे. कोणी सामाजिक कार्यात आपली हयात घालवलेली आहे. "हा आपला अभ्यासदौरा आहे, त्याचा राजकारणाशी काही संबंध नाही,' असं राज यांनी आधीच सांगून टाकलं आहे. पण दस्तुरखुद्द नरेंद्र मोदी यांनी "टीम राज'चं जातीनं स्वागत करून "टीम राज'ला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळेल, अशी व्यवस्था केली आहे.

राज यांनी या दौऱ्याची आखणी मोठ्या चतुराईनं केली आहे. राजकीय, भावनात्मक आणि अभ्यास अशी तीन स्तरांवर समाजमनाशी धागा जोडण्याचा हा प्रयत्न आहे. मुंबई महापालिका निवडणुका अवघ्या सहा महिन्यांवर आलेल्या असताना, मुंबईतील ४० लाखांच्या आसपास असलेल्या गुजराती समाजाचे आयकॉन नरेंद्र मोदी यांच्यावर राज स्तुतिसुमनं उधळत आहेत. समजा, यात काही व्यावहारिक राजकारण नाही, तरी भावनेच्या पातळीवर होणाऱ्या राजकारणाचं काय? राज यांनी टायमिंग तर मोठं अचूक साधलंय!

ंमुंबईतल्या गुजराती समाजाची पहिली तार अशा रीतीनं छेडल्यावर राज महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनाही विसरलेले नाहीत. अहमदाबादेत राज प्रथम साबरमती आश्रमात जातील, असं कुणी सांगितलं असतं, तर त्यावर विश्‍वास ठेवणं कठीण गेलं असतं. पण, राज साबरमती आश्रमापाठोपाठ थेट पोरबंदरला, महात्माजींच्या जन्मगावीही गेले. शिवाय, वल्लभभाईंनाही आदरांजली वाहायला ते विसरले नाहीत. सर्व स्तरांवरील गुजराती समाज "कनेक्‍ट' राहावा म्हणून केलेली ही आखणी होती. भले, यात राजकारण नसेलही कदाचित... पण या दौऱ्यामुळे निदान मुंबईतील गुजराती समाजानं तरी सुटकेचा निःश्‍वास नक्‍कीच सोडला असणार. कारण राज शिवसेनेतून बाहेर पडून सहा वर्षं उलटली असली, तरी त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सुरवातीच्या काळात उत्तर भारतीयांविरोधात केलेली हिंसक आंदोलनं मुंबईकर अद्याप विसरलेले नाहीत. खरं तर राज यांनी शिवसेनेला अखेरचा "जय महाराष्ट्र!' करण्याआधीच उद्धव यांनी शिवसेनेच्या "मी मराठी' या बाण्याला "मी मुंबईकर' असं समंजस स्वरूप देण्याचा प्रयत्न केला होता. १९६०च्या दशकात शिवसेना स्थापन झाली, तेव्हा त्या संघटनेचा "यूएसपी' म्हणजेच युनिक सेलिंग पॉईंट "मी मराठी' असणं जितकं स्वाभाविक होतं, तितकंच जागतिकीकरण आणि शिवाय पुढे घेतलेला हिंदुत्वाचा वसा या पार्श्‍वभूमीवर एकविसाव्या शतकात तो "मी मुंबईकर' असणं अपरिहार्य होतं. वैचारिक स्थित्यंतराची ही प्रक्रिया जितकी नैसर्गिक होती, तितकीच ती अर्थातच राजकीयही होती. पण, त्यावर शिवसेनेतच वादळं उठली. मराठी माणसाला आपण वाऱ्यावर तर सोडत नाही ना, असे सवाल केले गेले आणि अखेर रेल्वे बोर्डाच्या परीक्षेस येणाऱ्या उत्तर भारतीयांना कल्याण स्थानकावर भारतीय विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी जबरी मारहाण केली. "मी मुंबईकर' या संकल्पनेचं विसर्जनही तिथंच कल्याण रेल्वे स्थानकात झालं. खरं तर हिंदुत्व हा श्‍वास असेल, तर मराठी हा प्राण आहे किंवा हिंदुत्व प्राण असेल, तर मराठी श्‍वास आहे, अशी भाषा शिवसेनेच्या व्यासपीठावरून त्याआधी सुरू झालीच होती. त्यामुळे एकीकडे मराठी बाणा कायम ठेवून ज्या पद्धतीनं हिंदुत्वाची झूल पांघरण्यात आली होती, त्याच धर्तीवर पुढे "मी मुंबईकर' ही मोहीम शिवसेनेनं राबवायला हवी होती; पण, आपल्या मराठी व्होट बॅंकेला खिंडार पडेल, या भीतीनं त्याकडे पाठ फिरवण्यात आली. मराठी मतपेढीला खिंडार अखेर पडलंच, पण ते दोन वर्षांनी, राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यावर. त्यामुळेच आताच्या राज ठाकरे यांच्या या गुजरात दौऱ्यामुळे अनेक प्रश्‍न विचारता येऊ शकतात. राज यांनी आता "हूं गुजराती...' असा आवाज लावण्याचं खरं कारण आपल्याला कळणं कठीण आहे. पण, राज यांचं मोदींवर पूर्वापार प्रेम आहे. गुजरात विधानसभेच्या निवडणुका २००७ मध्ये झाल्या, तेव्हाही त्यांनी आपले खास दूत म्हणून शिशिर शिंदे यांना अहमदाबादेत पाठवलं होतं आणि शिंद्यांनीही मोठ्या प्रेमानं मोदी यांची भेट घेऊन, त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामुळे कदाचित या दौऱ्यामागे राजकारण नसेल आणि तो "फ्रेंडशिप डे'च्या निमित्तानं आयोजित केलेला मैत्री सप्ताहही असू शकतो.

पण, एक गोष्ट मात्र विसरता येणार नाही; राज ठाकरे हे कधीतरी आपल्यापुढे महाराष्ट्राच्या विकासाची ब्लू प्रिंट सादर करणार आहेत. त्यांच्यासाठी ही स्टडी टूर असू शकते. त्याला गुजरातचा विकास कारणीभूत असणार. पण नेमक्‍या याच काळात नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहारचाही चांगलाच विकास झाला आहे. गुजरातनं मारलेल्या मजलेपेक्षा बिहारच्या प्रगतीचं महत्त्व मोठं आहे, कारण ती शून्यातनं झालेली निर्मिती आहे. राज यांनी आता लगोलग बिहारचाही अभ्यासदौरा केला, तरच गुजरात दौऱ्यामागे राजकारण नाही, असं आपण ठामपणे म्हणू शकू!

'मनसे'ला युतीत आणायला मोदींचे 'मन'से प्रयत्न

'मनसे'ला युतीत आणायला मोदींचे 'मन'से प्रयत्न
गोविंद घोळवे : सकाळ वृत्तसेवा
Tuesday, August 09, 2011 AT 11:57 AM (IST)
 

मुंबई- राज ठाकरेंच्या पाठिंब्याशिवाय महाराष्ट्रात युती राज येणे असंभव असल्याची जाणीव भाजप आणि शिवसेनेच्या नेते मंडळींना आहे. भाऊबंदकीत कोण पडणार, या भीतीपोटी आजतागायत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर घरोबा करण्यासाठी कोणी आक्रमक प्रयत्न केलेले नाहीत. मात्र, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आता मनसेला बरोबर घेण्यासाठी मनापासून प्रयत्न सुरू केले असल्याने भविष्यात आजचे कट्टर शत्रू उद्याचे मित्र होऊ शकतात.

शिवसेना कार्याध्यक्षपदी उद्धव ठाकरे यांची नियुक्‍ती झाल्यानंतर शिवसेनेची महाराष्ट्र विधानसभेतील मुलूख मैदान तोफ असणारे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेला अखेरचा "जय महाराष्ट्र' केला. त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची कार्यशैली लाभलेले राज ठाकरेंनी "विठ्ठल सध्या बडव्यांच्या ताब्यात आहे,' असे म्हणत शिवसेनेला "जय महाराष्ट्र' केल्यामुळे महाराष्ट्राचा हा विरोधी पक्ष अत्यंत कमकुवत झाला होता. त्यामुळे शिवसेनेत एकच खळबळ उडाली होती. कार्यकर्त्यांना कोणता झेंडा हाती घ्यावा, हे कळत नव्हते.

मागील विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या पक्षाला काही जागा सोडून सेना-भाजपबरोबर घ्यावे, असा प्रयत्न भाजप नेते मंडळींकडून केला गेला. कधी भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांनी, तर कधी खासदार गोपीनाथ मुंडेंनी प्रयत्न केले. मात्र, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी सर्वांची मागणी फेटाळून लावली. उलट पुन्हा असा विषय उपस्थित केला तर खबरदार म्हणत वेळप्रसंगी युती तोडू, असा इशारा दिला होता. त्यामुळे कोणी मनसेला सोबत घेण्याचे नावही काढत नव्हते. या निवडणुकांमध्ये मनसेने मुंबई, नाशिक, ठाणे व पुणे शहरात आपले चांगले खाते उघडून १३ आमदार निवडून आणले. त्यानंतरच मनसेचा प्रभाव व ताकद सर्व पक्षांना कळली; परंतु सेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना कोण विनंती करणार? असा प्रश्‍न भाजप नेतृत्वाला पडला होता.
खा. मुंडे यांनी आपण मनसेला आगामी काळात बरोबर घेण्याचा प्रयत्न करू, राजकारणात काहीही असंभव नसते. आजचा शत्रू उद्याचा मित्र होऊ शकतो. यामुळे "नथिंग इज इम्पॉसिबल' असे ठणकावून सांगितले होते; परंतु त्यांच्या वक्‍तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड गोंधळ उडाला होता. सेना-भाजप युती तुटणार अशी शक्‍यता निर्माण झाली होती. मात्र, सेना कार्याध्यक्षांनी हे खा. मुंडे यांचे व्यक्तिगत मत असल्याचे सांगत "नो-कॉमेन्ट्‌स', अशी संयमी आणि शांत भूमिका घेतली होती.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून भाजपच्या सर्व वरिष्ठ नेते मंडळींनी मनसेला सहकार्याची भूमिका घ्या, अशी गळ सेना नेतृत्वाला घातली होती; परंतु सेनेची भूमिका बदलण्यात भाजप नेतृत्वाला अद्याप यश आलेले नाही. मात्र, शेवटचा प्रयत्न म्हणून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या तीन दिवसांपासून गुजरातच्या दौऱ्यावर असणारे मनसेप्रमुख राज ठाकरे यांची बडदास्त एखाद्या अतिमहत्त्वाच्या व्यक्‍तीसारखी ठेवली असून दहा टक्‍के गुजरात प्रशासन राज यांच्या सेवेला पाठविले आहे.

राज्यात दोन्ही कॉंग्रेस पक्षांच्या आघाडीचे सरकार आहे; परंतु दोघेही पाच वर्ष एकमेकांना संपविण्याची भाषा बोलतात. अनेक विकास प्रकल्पांना थांबवून एकमेकांवर कुरघोडी करतात. मात्र सत्ता वाटून घेतात, असे आता दस्तुरखुद्द सेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनीच पिंपरी-चिंचवड दौऱ्यात सांगितले आहे. हाच धागा पकडून आता मोदी पुन्हा एकदा राज्यात युतीचेच राज आणण्यासाठी दोघा भावांना एकत्र आणण्यासाठी मनापासून प्रयत्न करीत असल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे. भाजप वर्तुळातही अशी चर्चा होत आहे.

यासंदर्भात विधानसभेतील शिवसेना गटनेते आमदार सुभाष देसाई यांच्याशी संपर्क साधला असता आपल्याला अशी शक्‍यता वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले. ""लोक अनेक राज्यात पर्यटनासाठी दौरे करीत असतात, तसा हादेखील एक दौरा असू शकतो,'' अशी प्रतिक्रिया देसाई यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्‍त केली.

नितीशकुमार नाराज
नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये राज ठाकरे यांचे केलेले स्वागत पाहता बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार मात्र भाजपवर प्रचंड नाराज आहेत. यासंदर्भात संयुक्त जनता दलाचे प्रमुख शरद यादव हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे अध्यक्ष लालकृष्ण अडवानी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे समजते