मी मुंबईकर, मी मराठी अन् "हूं गुजराती!'
प्रकाश अकोलकर
Tuesday, August 09, 2011 AT 03:00 AM (IST)
राज ठाकरे यांनी गुजरात दौऱ्याची आखणी मोठ्या चतुराईनं केली आहे. राजकीय, भावनात्मक आणि अभ्यास अशी तीन स्तरांवर समाजमनाशी धागा जोडण्याचा हा प्रयत्न आहे.
राज ठाकरे सध्या गुजरातेत आहेत. सोबत पत्रकार आहेत, त्याचबरोबर विविध क्षेत्रांतील जाणकारही. कुणी व्यवस्थापन शास्त्राचा तज्ज्ञ आहे, तर कुणाचा विदेशी राजनीती आणि अर्थनीती यांचा अभ्यासक आहे. कोणी सामाजिक कार्यात आपली हयात घालवलेली आहे. "हा आपला अभ्यासदौरा आहे, त्याचा राजकारणाशी काही संबंध नाही,' असं राज यांनी आधीच सांगून टाकलं आहे. पण दस्तुरखुद्द नरेंद्र मोदी यांनी "टीम राज'चं जातीनं स्वागत करून "टीम राज'ला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळेल, अशी व्यवस्था केली आहे.
राज यांनी या दौऱ्याची आखणी मोठ्या चतुराईनं केली आहे. राजकीय, भावनात्मक आणि अभ्यास अशी तीन स्तरांवर समाजमनाशी धागा जोडण्याचा हा प्रयत्न आहे. मुंबई महापालिका निवडणुका अवघ्या सहा महिन्यांवर आलेल्या असताना, मुंबईतील ४० लाखांच्या आसपास असलेल्या गुजराती समाजाचे आयकॉन नरेंद्र मोदी यांच्यावर राज स्तुतिसुमनं उधळत आहेत. समजा, यात काही व्यावहारिक राजकारण नाही, तरी भावनेच्या पातळीवर होणाऱ्या राजकारणाचं काय? राज यांनी टायमिंग तर मोठं अचूक साधलंय!
ंमुंबईतल्या गुजराती समाजाची पहिली तार अशा रीतीनं छेडल्यावर राज महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनाही विसरलेले नाहीत. अहमदाबादेत राज प्रथम साबरमती आश्रमात जातील, असं कुणी सांगितलं असतं, तर त्यावर विश्वास ठेवणं कठीण गेलं असतं. पण, राज साबरमती आश्रमापाठोपाठ थेट पोरबंदरला, महात्माजींच्या जन्मगावीही गेले. शिवाय, वल्लभभाईंनाही आदरांजली वाहायला ते विसरले नाहीत. सर्व स्तरांवरील गुजराती समाज "कनेक्ट' राहावा म्हणून केलेली ही आखणी होती. भले, यात राजकारण नसेलही कदाचित... पण या दौऱ्यामुळे निदान मुंबईतील गुजराती समाजानं तरी सुटकेचा निःश्वास नक्कीच सोडला असणार. कारण राज शिवसेनेतून बाहेर पडून सहा वर्षं उलटली असली, तरी त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सुरवातीच्या काळात उत्तर भारतीयांविरोधात केलेली हिंसक आंदोलनं मुंबईकर अद्याप विसरलेले नाहीत. खरं तर राज यांनी शिवसेनेला अखेरचा "जय महाराष्ट्र!' करण्याआधीच उद्धव यांनी शिवसेनेच्या "मी मराठी' या बाण्याला "मी मुंबईकर' असं समंजस स्वरूप देण्याचा प्रयत्न केला होता. १९६०च्या दशकात शिवसेना स्थापन झाली, तेव्हा त्या संघटनेचा "यूएसपी' म्हणजेच युनिक सेलिंग पॉईंट "मी मराठी' असणं जितकं स्वाभाविक होतं, तितकंच जागतिकीकरण आणि शिवाय पुढे घेतलेला हिंदुत्वाचा वसा या पार्श्वभूमीवर एकविसाव्या शतकात तो "मी मुंबईकर' असणं अपरिहार्य होतं. वैचारिक स्थित्यंतराची ही प्रक्रिया जितकी नैसर्गिक होती, तितकीच ती अर्थातच राजकीयही होती. पण, त्यावर शिवसेनेतच वादळं उठली. मराठी माणसाला आपण वाऱ्यावर तर सोडत नाही ना, असे सवाल केले गेले आणि अखेर रेल्वे बोर्डाच्या परीक्षेस येणाऱ्या उत्तर भारतीयांना कल्याण स्थानकावर भारतीय विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी जबरी मारहाण केली. "मी मुंबईकर' या संकल्पनेचं विसर्जनही तिथंच कल्याण रेल्वे स्थानकात झालं. खरं तर हिंदुत्व हा श्वास असेल, तर मराठी हा प्राण आहे किंवा हिंदुत्व प्राण असेल, तर मराठी श्वास आहे, अशी भाषा शिवसेनेच्या व्यासपीठावरून त्याआधी सुरू झालीच होती. त्यामुळे एकीकडे मराठी बाणा कायम ठेवून ज्या पद्धतीनं हिंदुत्वाची झूल पांघरण्यात आली होती, त्याच धर्तीवर पुढे "मी मुंबईकर' ही मोहीम शिवसेनेनं राबवायला हवी होती; पण, आपल्या मराठी व्होट बॅंकेला खिंडार पडेल, या भीतीनं त्याकडे पाठ फिरवण्यात आली. मराठी मतपेढीला खिंडार अखेर पडलंच, पण ते दोन वर्षांनी, राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यावर. त्यामुळेच आताच्या राज ठाकरे यांच्या या गुजरात दौऱ्यामुळे अनेक प्रश्न विचारता येऊ शकतात. राज यांनी आता "हूं गुजराती...' असा आवाज लावण्याचं खरं कारण आपल्याला कळणं कठीण आहे. पण, राज यांचं मोदींवर पूर्वापार प्रेम आहे. गुजरात विधानसभेच्या निवडणुका २००७ मध्ये झाल्या, तेव्हाही त्यांनी आपले खास दूत म्हणून शिशिर शिंदे यांना अहमदाबादेत पाठवलं होतं आणि शिंद्यांनीही मोठ्या प्रेमानं मोदी यांची भेट घेऊन, त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामुळे कदाचित या दौऱ्यामागे राजकारण नसेल आणि तो "फ्रेंडशिप डे'च्या निमित्तानं आयोजित केलेला मैत्री सप्ताहही असू शकतो.
पण, एक गोष्ट मात्र विसरता येणार नाही; राज ठाकरे हे कधीतरी आपल्यापुढे महाराष्ट्राच्या विकासाची ब्लू प्रिंट सादर करणार आहेत. त्यांच्यासाठी ही स्टडी टूर असू शकते. त्याला गुजरातचा विकास कारणीभूत असणार. पण नेमक्या याच काळात नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहारचाही चांगलाच विकास झाला आहे. गुजरातनं मारलेल्या मजलेपेक्षा बिहारच्या प्रगतीचं महत्त्व मोठं आहे, कारण ती शून्यातनं झालेली निर्मिती आहे. राज यांनी आता लगोलग बिहारचाही अभ्यासदौरा केला, तरच गुजरात दौऱ्यामागे राजकारण नाही, असं आपण ठामपणे म्हणू शकू!
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें