त्रिशंकू अवस्थेतील लाखमोलाचा फॅक्टर!
प्रकाश अकोलकर
Thursday, January 05, 2012 AT 02:45 AM (IST)
राज
ठाकरे यांच्यामुळे मुंबईसह काही महापालिकांत त्रिशंकू अवस्था निर्माण होऊ
शकते आणि तसे झाल्यास राज यांची काय भूमिका असेल, हा सर्वच पक्षांसाठी
कळीचा मुद्दा आहे.
राज ठाकरे नेमकं करणार आहेत तरी काय? खरं तर या प्रश्नाला अनेक पदर आहेत आणि त्याची उत्तरंही त्यानुसार वेगवेगळी आहेत. साडेसहा वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांना घेरलेल्या "बडव्यां'ना वैतागून त्यांनी शिवसेनेला अखेरचा "जय महाराष्ट्र!' केला, तेव्हापासून हा प्रश्न अनेकदा विचारला गेला आहे. खुद्द राज यांनीही वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे निर्णय घेऊन आपल्याला काय करायचे आहे किंबहुना आपण काय करू शकतो, ते दाखवून दिलं आहे.
पण आजमितीला या प्रश्नाला असलेला संदर्भ नवा आहे. महाराष्ट्रातल्या दहा महानगरांचे पुढच्या पाच वर्षांचे राज्यकर्ते कोण, हा प्रश्नाचा फैसला पुढच्या दीड महिन्यात व्हायचा आहे. तो भले मतदार करणार असले, तरी त्यानंतरही राज घेणार असलेली भूमिका किमान तीन महापालिकांमध्ये कळीची ठरणार असल्यामुळे, येत्या दीड महिन्यात मीडियाचा सारा फोकस हा राज यांच्यावरच राहू शकतो. अर्थात, राज यांच्या ताकदीचा अंदाज पाच वर्षांपूर्वीच्या महापालिका निवडणुकांतील त्यांची कामगिरी लक्षात घेऊन कोणी करू पाहेल, तर तो मूर्खपणा ठरेल. कारण त्यानंतर लगोलग 2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपली ताकद खऱ्या अर्थानं दाखवून दिली होती. त्यामुळे राज्यात सत्तेवर असलेली कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची आघाडी आणि मुंबई, ठाणे, नाशकातील महापालिका ताब्यात असलेली शिवसेना-भाजप युती या राज्यातील चारही प्रमुख पक्षांच्या पोटात गोळा आलेला असू शकतो. त्या निवडणुकीची वार्तापत्रं आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे व्हीडिओ आजही बघितले, तर राज्याच्या सर्वच्या सर्व म्हणजे 288 मतदारसंघांत राज आणि उद्धव हे दोन ठाकरे बंधूच एकमेकांच्या विरोधात उभे होते की काय, असा प्रश्न मनात येऊ शकतो. त्यानंतरच्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीतही डिट्टो तसाच सामना झडला होता. त्यामुळेच आताही त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते; कारण आपल्यासाठी ही अस्तित्वाची लढाई आहे, हे या दोघांनीही ओळखलं आहे. आता प्रश्न एवढाच आहे, की मतदार या दोहोंच्या संदर्भात नेमकी काय भूमिका घेणार? राज्यातील चार बड्या प्रमुख पक्षांच्या तुलनेत राज यांची पाटी कोरी आहे आणि पर्यायाच्या शोधात असलेली जनता त्यांच्या पारड्यात वजन टाकू शकते. शिवाय, राज हे फक्त शिवसेनेच्या गडाला सुरुंग लावतील, असंही मानता येणार नाही. 1999 मध्ये शरद पवार यांनी स्वबळावर एक हाती विधानसभा निवडणुका लढवल्या, तेव्हा त्यांनी केवळ कॉंग्रेसच नव्हे, तर इतरही पक्षांचे बुरुज जमीनदोस्त केले होते. आता राज ठाकरे यांनी उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली. त्यापाठोपाठ बेळगावसंदर्भात मराठी माणसाच्या प्रस्थापित भूमिकेला छेद देत आपल्याला वास्तवाचं भान असल्याचं दाखवून दिलं. रामदास आठवले यांनी शिवसेनेबरोबर जाण्याचा घेतलेला निर्णय मान्य नसलेला एक मोठा युवक समूह आंबेडकरी समाजात आहे. असे अनेक पदर "राज ठाकरे' या महापालिका निवडणुकांत कळीच्या ठरू पाहणाऱ्या घटकास आहेत.
त्यामुळेच राज यांची "मनसे' मुंबई, ठाणे आणि नाशिक या किमान तीन महापालिकांतील निकालांची बड्या राजकीय पक्षांनी मांडलेली समीकरणे उद्ध्वस्त करून टाकू शकते. अर्थात, त्यास या महापालिकांतील आजच्या सत्ताधाऱ्यांचा कारभारही बऱ्याच अंशी कारणीभूत आहे. गेल्या दहा-पंधरा वर्षांत राज्यातील बहुतेक महानगरे कमालीची बकाल होत चालली आहेत. या शहरांत दिसेल ती मोकळी जागा आणि तिथला निसर्ग उद्ध्वस्त करून, तिथं सिमेंट कॉंक्रीटची पंचतारांकित जंगलं उभारण्यात बिल्डर, कंत्राटदार लॉबीशी संगनमत करणाऱ्या राजकारण्यांचाच पुढाकार होता. मुंबई, पुणे, पाठोपाठ नाशिक, औरंगाबाद... हा म्हणे राज्याचा सुवर्णचतुष्कोन! पण कल्पनाशून्य नियोजनामुळे वेगानं झालेलं शहरीकरण आणि त्याला मिळालेली स्थानिक पातळीवरच्या राजकारण्यांची हाव, यातून आज या महाराष्ट्रातली महानगरं पुरती विद्रूप होऊन गेली आहेत. इकडं एक फ्लायओव्हर, तिकडे एक तरणतलाव आणि पलीकडे एक म्युझियम अशा पावडर-कुंकू-टिकली छाप "मेकअप'नं या महानगरांना त्यांचं त्यांचं मूळचं रूप प्राप्त होणार नाही.
राज ठाकरे यांची "मनसे' हे करून दाखवील, असा या लिखाणाचा बिलकूलच उद्देश नाही; किंबहुना राज यांनाही या प्रश्नांचं गांभीर्यानं आकलन झालंय की नाही, हा प्रश्नच आहे. पण लोकांना आता एक पर्याय हवा आहे आणि त्यामुळेच काही लोक तरी राज यांना संधी देऊ पाहतीलच. तरीही या कोणत्याही एका महापालिकेत राज यांची स्वबळावर सत्ता येईल, असंही म्हणता येत नाही. पण राज यांच्यामुळे मुंबईसह काही महापालिकांत त्रिशंकू अवस्था जरूर निर्माण होऊ शकते आणि तसं झाल्यास राज काय भूमिका घेतील, हा आज सर्वच पक्षांसाठी कळीचा मुद्दा बनला आहे. कारण कल्याण-डोंबिवली महापालिकेत तटस्थ राहून राज यांनी शिवसेनेच्या सत्तारोहणास अप्रत्यक्षरीत्या साह्यच केलं होतं, हे लोक अद्याप विसरलेले नाहीत. त्यामुळेच या निवडणुकांत आणि निकालानंतरही राज नेमकं काय करतील, हा प्रश्न आजमितीला लाखमोलाचा बनला आहे