शनिवार, 14 अगस्त 2010

मनसेच्या आंदोलनाला कलावंतांचा पाठिंबा

मनसेच्या आंदोलनाला कलावंतांचा पाठिंबा
सकाळ वृत्तसेवा
Sunday, August 15, 2010 AT 12:30 AM (IST)
 

मुंबई -  मल्टिप्लेक्‍सवाल्यांना धडा शिकविणे गरजेचे होते. त्याकरिता कुणी तरी पुढाकार घेणे आवश्‍यक होते. मनसेने असा पुढाकार घेतल्याबद्दल मराठी कलाकारांनी आनंद व्यक्त केला आहे. मुंबई-महाराष्ट्रात राहून यांची दादागिरी खपवून घेता कामा नये... मराठी चित्रपट त्यांनी लावलेच पाहिजेत... अशी प्रतिक्रिया मराठी चित्रपटसृष्टीत आज उमटली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज मल्टिप्लेक्‍सविरोधात आंदोलन केले. याबाबत काही कलाकार तसेच दिग्दर्शक आणि निर्मात्या मंडळींना बोलते केले असता त्यांनीही मल्टिप्लेक्‍सवाल्यांचा धिक्कार केला. निर्मात्या कांचन अधिकारी म्हणाल्या, ""मनसेने योग्य पाऊल उचललेले आहे. आपला त्याला संपूर्ण पाठिंबा आहे; मात्र तोडफोड किंवा हिंसाचार होता कामा नये असे आपणास वाटते. माझ्या चित्रपटांसाठी काही मल्टिप्लेक्‍सवाल्यांनी नकार दिला होता. सध्याचे मुख्यमंत्री यापूर्वी सांस्कृतिक मंत्री होते. त्यांच्या राज्यात अशा प्रकारे मराठी चित्रपटांवर अन्याय व्हावा ही लाजीरवाणी बाब आहे.''

अभिनेत्री आणि निर्मात्या किशोरी शहाणे-वीज यांचा "ऐका दाजिबा' हा चित्रपट कालपासून सगळीकडे प्रदर्शित झाला आहे. त्यांनीदेखील मल्टिप्लेक्‍सवाल्यांच्या मनमानीपणावर आसूड ओढले. त्या म्हणाल्या, ""कुणी तरी पुढे होऊन हा विषय हाती घेणे आवश्‍यक होते. मनसेने ते काम केले आहे. मराठी चित्रपटांना प्राईम टाईम देणे आवश्‍यक आहे. कारण हे मल्टिप्लेक्‍सवाले वेळ देतील ती सकाळची असेल आणि त्या वेळी चित्रपट पाहण्यास कोणीही येणार नाही, त्यामुळे लेखी आश्‍वासन घेणे गरजेचे आहे.''

दिग्दर्शक सुभाष काळे म्हणाले, ""महाराष्ट्रात राहून मराठी चित्रपट लावा... मराठी चित्रपट लावा... अशी भीक का मागायची. त्यांनी स्वतःहून मराठी चित्रपट लावले पाहिजेत. आम्ही एकेका चित्रपटासाठी कोट्यवधी रुपये खर्च करतो आणि मल्टिप्लेक्‍सवाल्यांसमोर हात पसरायचे? आज जे काही झाले (आंदोलन) ते योग्य आहे.''

अभिनेता संजय नार्वेकरने मनसेने केलेले आंदोलन योग्य आहे अशी प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, ""राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे. कारण मराठी चित्रपट किंवा मराठी भाषा याकरिता भीक मागता कामा नये. आपण महाराष्ट्रात राहतो. तेथे मराठीचा सन्मान झाला पाहिजे. मल्टिप्लेक्‍सवाल्यांनी सन्मानाने मराठी चित्रपट लावले पाहिजेत.''

मराठी चित्रपटाच्या मुद्‌द्‌यावर मनसे आक्रमक

मराठी चित्रपटाच्या मुद्‌द्‌यावर मनसे आक्रमक
सकाळ वृत्तसेवा
Saturday, August 14, 2010 AT 01:32 PM (IST)
 

ठाणे - मल्टिप्लेक्‍समध्ये "ती रात्र' या मराठी चित्रपटाचे तीन खेळ दाखवावेत, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी येथील इंटर्निटी मॉलवर दगडफेक करीत आज (शनिवार) सकाळी आंदोलन केले.

आमदार प्रवीण दरेकर, पक्षाचे ठाणे शहराध्यक्ष हरी माळी, विद्यार्थी सेनेचे अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. मल्टिप्लेक्‍समध्ये सकाळी मराठी चित्रपटाचा एकच खेळ दाखविला जातो. त्यामुळे प्रेक्षकांना सकाळच्या वेळेत चित्रपट पाहता येत नाही. मराठी चित्रपटाचे तीन खेळ दाखवावेत, अशी मागणी करणारे पत्र इंटर्निटी मॉलच्या व्यवस्थापकांना देण्यात आले.

मॉलमध्ये मराठी चित्रपटाचे एकच पोस्टर तर "पीपली लाइव्ह' या चित्रपटाची अनेक पोस्टर्स दिसली. त्यामुळे कार्यकर्त्यांनी दगडफेक करत "पीपली लाइव्ह'ची पोस्टर्स फाडून आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी हरी माळी यांना ताब्यात घेतले. दरम्यान, दादर येथील नक्षत्र मॉलवरही मनसेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली.

औरंगाबाद येथेही आंदोलनाचे पडसाद उमटले. मनसेच्या कार्यकर्त्यांनी अंजली बीग सिनेमात धुडगूस घालत चित्रपटगृह बंद पाडले. यावेळी पोलिसांनी १० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

गुरुवार, 12 अगस्त 2010

कॉमनवेल्थ'वर कलमाडींचा डल्ला - राज ठाकरे

कॉमनवेल्थ'वर कलमाडींचा डल्ला - राज ठाकरे
सकाळ वृत्तसेवा
Thursday, August 12, 2010 AT 04:54 PM (IST)
 

मुंबई - भारतीय जनतेच्या 'कॉमनवेल्थ'वर खासदार सुरेश कलमाडी यांनी डल्ला मारला आहे, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी केली.

म्युनिचमध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेत नेमबाजीत ५० मीटर प्रोन प्रकारात सुवर्णपदक मिळवणाऱ्या कोल्हापुरच्या तेजस्विनी सावंतने त्यांची "कृष्णकुंज' या निवासस्थानी भेट घेतली. तेजस्विनीचा राज ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सुरेश कलमाडींना लक्ष्य केले.

नवी दिल्लीत ऑक्‍टोबरमध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या संयोजनात भ्रष्टाचाराचा आरोप कलमाडी यांच्यावर करण्यात आला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर बोलताना राज ठाकरे यांनी कलमाडींवर टिका  केली. 

मंगलवार, 10 अगस्त 2010

मल्टिप्लेक्‍सने मराठी चित्रपट दाखवावा - राज

मल्टिप्लेक्‍सने मराठी चित्रपट दाखवावा - राज
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, August 11, 2010 AT 12:15 AM (IST)
 
मुंबई - महाराष्ट्रातील प्रत्येक मल्टिप्लेक्‍समध्ये उद्यापासून (ता. 11) मराठी चित्रपट दाखविलाच गेला पाहिजे; अन्यथा मल्टिप्लेक्‍स मालकाच्या कानामागे "फटाक' आवाज काढला जाईल, असा थेट इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिला. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्या तिसऱ्या वर्धापनदिन कार्यक्रमात ते बोलत होते.

राज ठाकरे म्हणाले, की ज्या मल्टिप्लेक्‍समध्ये मराठी चित्रपट दाखविले जात नाहीत, त्यांची यादी आपल्याकडे आणून द्या आणि हे आंदोलन उद्यापासून सुरू करा. उद्यापासून प्रत्येक मल्टिप्लेक्‍समध्ये मराठी चित्रपट दाखविला गेलाच पाहिजे. कायद्यामध्ये तरतूद असतानाही काही मल्टिप्लेक्‍सवाले कायदे सरळसरळ मोडीत आहेत. त्यांना दुसरी भाषा कळत नाही. म्हणूनच कायदा मोडणाऱ्यांचा आम्ही बंदोबस्त करू.

चित्रपटसृष्टीला पोखरलेल्या "पायरसी'विरुद्ध मनसेच्या चित्रपट सेनेने सुरू केलेला लढा यापुढेही जोमाने सुरू ठेवावा; कारण पायरसी रोखणे हीच आज खरी गरज आहे, अशी भूमिका प्रसिद्ध अभिनेते जितेंद्र यांनी याप्रसंगी मांडली.

चित्रपट सेनेच्या उपाध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी चित्रपटसृष्टीतील अस्तित्वात असलेल्या 22 असोसिएशनवर जोरदार टीका केली. त्यांनी आतापर्यंत या सृष्टीतील कामगारांसाठी काय केले ? असा सवाल उपस्थित करून या असोशिएशनची मान्यता रद्द करावी, अशी माणगी केली. मनसेचा पायरसीविरुद्धचा लढा यापुढेही कायम राहील, असे आश्‍वासन चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमय खोपकर यांनी दिले. याप्रसंगी मनसेच्या कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांचे भाषण झाले; तसेच राज ठाकरे यांच्या हस्ते मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ कलाकारांचा सत्कार करण्यात आला.

सोमवार, 9 अगस्त 2010

मलेरियाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनसे रस्त्यावर

मलेरियाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनसे रस्त्यावर
सकाळ वृत्तसेवा
Monday, August 09, 2010 AT 02:39 PM (IST)
 

मुंबई - मुंबईतील मलेरियाचा प्रादुर्भाव आणि अस्वच्छता दूर करण्यासाठी महानगरपालिकेची वाट न पाहता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरण्याचे आदेश, आज (सोमवार) मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले.

माटुंगा येथे मनसेतर्फे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. राज ठाकरे म्हणाले, ''मुंबईतील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याबाबत महापालिका आणि राज्य सरकार एकमेकांकडे बोटे दाखवत आहे. यामुळे आता ही जबाबदारी मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी पार पाडतील. तसेच मलेरियामुळे झालेल्या मृतांची संख्या सांगण्याबाबतही मुंबई महापालिका दिशाभूल करीत आहे. मुंबईत वाढलेल्या मलेरियाला परप्रांतियांचे लोंढेच जबाबदार आहेत. मुंबईत येणारे लोंढे हे मतांचे गठ्ठे आहेत. ''

मुंबई झोपडपट्ट्यांची वाढत असलेली संख्या गंभीर असून, यापुढे ज्याभागात झोपडपट्टी झालेली दिसेल त्या भागातील मनसेच्या शाखेतील पदाधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल, असे राज ठाकरे यांनी सांगितले.