मंगलवार, 10 अगस्त 2010

मल्टिप्लेक्‍सने मराठी चित्रपट दाखवावा - राज

मल्टिप्लेक्‍सने मराठी चित्रपट दाखवावा - राज
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, August 11, 2010 AT 12:15 AM (IST)
 
मुंबई - महाराष्ट्रातील प्रत्येक मल्टिप्लेक्‍समध्ये उद्यापासून (ता. 11) मराठी चित्रपट दाखविलाच गेला पाहिजे; अन्यथा मल्टिप्लेक्‍स मालकाच्या कानामागे "फटाक' आवाज काढला जाईल, असा थेट इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिला. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्या तिसऱ्या वर्धापनदिन कार्यक्रमात ते बोलत होते.

राज ठाकरे म्हणाले, की ज्या मल्टिप्लेक्‍समध्ये मराठी चित्रपट दाखविले जात नाहीत, त्यांची यादी आपल्याकडे आणून द्या आणि हे आंदोलन उद्यापासून सुरू करा. उद्यापासून प्रत्येक मल्टिप्लेक्‍समध्ये मराठी चित्रपट दाखविला गेलाच पाहिजे. कायद्यामध्ये तरतूद असतानाही काही मल्टिप्लेक्‍सवाले कायदे सरळसरळ मोडीत आहेत. त्यांना दुसरी भाषा कळत नाही. म्हणूनच कायदा मोडणाऱ्यांचा आम्ही बंदोबस्त करू.

चित्रपटसृष्टीला पोखरलेल्या "पायरसी'विरुद्ध मनसेच्या चित्रपट सेनेने सुरू केलेला लढा यापुढेही जोमाने सुरू ठेवावा; कारण पायरसी रोखणे हीच आज खरी गरज आहे, अशी भूमिका प्रसिद्ध अभिनेते जितेंद्र यांनी याप्रसंगी मांडली.

चित्रपट सेनेच्या उपाध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी चित्रपटसृष्टीतील अस्तित्वात असलेल्या 22 असोसिएशनवर जोरदार टीका केली. त्यांनी आतापर्यंत या सृष्टीतील कामगारांसाठी काय केले ? असा सवाल उपस्थित करून या असोशिएशनची मान्यता रद्द करावी, अशी माणगी केली. मनसेचा पायरसीविरुद्धचा लढा यापुढेही कायम राहील, असे आश्‍वासन चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमय खोपकर यांनी दिले. याप्रसंगी मनसेच्या कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांचे भाषण झाले; तसेच राज ठाकरे यांच्या हस्ते मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ कलाकारांचा सत्कार करण्यात आला.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें