शुक्रवार, 20 सप्टेंबर 2013 - 03:30 AM IST
|
नवाब मलिक यांचा टोला
मुंबई- अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या सरकार स्पॉन्सर्ड असल्याचा सनसनाटी आरोप करणाऱ्या राज ठाकरे यांना राष्ट्रवादीनेही प्रत्युत्तर दिले असून रमेश किणींची हत्या राज ठाकरे स्पॉन्सर्ड होती का, असा सवाल आमदार नवाब मलिक यांनी केला.
मलिक यांच्या या आरोपामुळे राष्ट्रवादी विरुद्ध मनसे संघर्ष पेटण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. या वेळी त्यांनी भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. मोदी यांचे नाव पत्रकार परिषदेत घोषित करण्यात आल्यानंतर पक्षाचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी मोदी यांच्या गळ्यात हिऱ्या-मोत्यांचा हार घातला होता. मोदींनी तो हार स्वीकारला व नंतर खासगी सचिवाकडे दिला. या हाराची किंमत किती कोटी होती, हा हार सध्या कुठे आहे, असा सवालही मलिक यांनी केला.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे उत्तम काम करत आहेत. त्यांचे निर्णय चांगले आहेत. त्यांना राष्ट्रवादीचा विरोध नाही; मात्र सरकारची निर्णय प्रक्रिया गतिमान झाली पाहिजे. प्रलंबित फायलींचा विषय अजून संपलेला नाही. लोकांना न्याय द्यायचा असेल तर विकासाची कामे पूर्ण करण्याची गरज असल्याने फायली प्रलंबित ठेवून चालणार नाही, अशी कोपरखळी मलिक यांनी मारली.