| |
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2013 - 02:30 AM IST
|
तपासात प्रगती नसल्याने संताप व्यक्त
मुंबई- पोलिसांनी योग्य प्रकारे शोध घेतल्यानंतर सगळ्याप्रकारचे मारेकरी सापडत असताना डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी एक महिन्यानंतरही का सापडत नाहीत, असा प्रश्न उपस्थित करून ही हत्या सरकार प्रायोजित तर नाही ना, अशी विचारणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.
जादूटोणाविरोधी पुस्तिकेचे प्रकाशन आज कृष्णकुंज येथे राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर राज यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधला. या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी मुक्ता दाभोलकर, पत्रकार युवराज मोहिते आदी उपस्थित होते. सगळ्या गुन्ह्यांतील मारेकरी सापडतात; मग डॉ. दाभोलकर यांच्या हत्येतील तपास का मार्गी लागत नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
एक महिन्यानंतरही या विषयातील तपास कामात काहीही घडत नसल्यानेच संशयाची सुई सरकारकडेच वळत असल्याचा गंभीर आरोप राज यांनी या वेळी केला. सरकारला या विषयावर कोणी जाब विचारत नसल्याबद्दलही त्यांनी संताप व्यक्त केला. पोलिसांच्या कामावर माझा विश्वास आहे; पण मुळात मारेकरी पकडले जावेत, अशी इच्छा सरकारची आहे का, याबद्दलच संशय आहे. हत्या झाल्यानंतर सरकारच्या वतीने वातावरण थंड करण्यासाठी आणि बातम्या थंड करण्यासाठी विविध वक्तव्य करण्यात आली होती; पण यानंतर सारे वातावरण थंडावले असल्यानेच ही हत्या सरकारने प्रायोजित केली असावी, असा संशय आपल्याला असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रत्येक गुन्हा "सीबीआय'कडे सोपवून उपयोगाचे नाही. मुळात "सीबीआय'चा वापरही सरकारकडून होत असतो. कोणत्याही प्रकरणाचा तपास लागत नसल्यास त्याचा तपास सीबीआयकडे देण्याची फॅशन सुरू झाल्याची टीका राज यांनी या वेळी केली.
दरम्यान, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची घेतलेली भेट आपण टॅक्सीसाठी देण्यात येणाऱ्या नऊ हजार परवान्याच्या संदर्भात होती. मात्र, त्यानंतरही आमचे गुप्तगू झाल्याची चर्चा रंगविण्यात आली. आमची जागा वाटपाची चर्चा झाल्याचा, असा संताप त्यांनी या वेळी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांबरोबर काय चर्चा झाली, याची माहिती नाशिकमध्ये जाहीरपणे देणार असल्याचे राज यांनी सांगितले.
वाघ ताडोबात; जाहिराती मुंबईत
जादूटोणाविरोधी पुस्तकातील चित्रेही गंभीर असावीत, अशी अपेक्षा या वेळी राज यांनी व्यक्त केली. तसेच तयार करण्यात आलेले पुस्तक ज्या दुर्गम ठिकाणी अशा घटना घडतात, त्या ठिकाणी पुस्तकांचे वितरण झाले पाहिजे. ताडोबाला वाघ मारले जातात आणि वाघ मारू नयेत, अशी जाहिरातबाजी मात्र मुंबईत केली जाते. असे याबाबत होता कामा नये. ज्या ठिकाणी असे प्रकार जास्त प्रमाणात होतात, त्या ठिकाणी जास्तीत जास्त पुस्तकांचे वाटप करण्याचे आवाहन राज यांनी केले.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें