गुरुवार, 10 जनवरी 2013

नववर्षाच्या सुरुवातीलाच उद्धव व राज 'ऍक्‍शन'मध्ये

नववर्षाच्या सुरुवातीलाच उद्धव व राज 'ऍक्‍शन'मध्ये

राजेश मोरे - सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, January 11, 2013 AT 02:45 AM (IST)
मुंबई- शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच अधिक जोमदारपणे पक्षात आक्रमक झाले आहेत. उद्धव यांनी पक्षशिस्त धाब्यावर बसविण्याचा ठपका ठेवून नाशिकचे माजी जिल्हाप्रमुख सुनील बागुल यांना थेट बाहेरचा रस्ता दाखविला आहे; तर राज यांनी रस्ते आणि आस्थापना संघटनेनंतर मनसेच्या नवनिर्माण वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांना बरखास्तीचा मार्ग दाखविला आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेत कोणत्या पद्धतीने निर्णय होणार, याकडे शिवसैनिकांसह इतरांचेही लक्ष आहे. कोकणातील शिवसेनेचा एक चेहरा असलेले परशुराम उपरकर मनसेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे, पण उपरकर यांनी जाहीरपणे अद्याप त्यांची भूमिका मांडली नसल्याने ते शिवसेनेतच असल्याचे मानले जात आहे. तसेच आज शिवसेनाभवनात झालेल्या पत्रकार परिषदेत विधिमंडळ नेते सुभाष देसाई यांनी उपरकर यांच्याशी आमचा संवाद असल्याने हा विषय तूर्त थांबविल्याचे संकेत दिले.

नाशिकमध्ये मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनी नाशिकच्या जिल्हाप्रमुख आणि महापालिकेतील नेत्यांसह पक्षनेतृत्वाबद्दलही आक्रमक भाषा वापरल्याची माहिती "मातोश्री'वर पोहोचली होती. नाशिकमध्ये मनसेचा वारू चौफेर उधळून थेट महापौरपद मनसेकडे गेल्याने आधीच शिवसेनेत चिंतेचे वातावरण असताना या गटातटाचा फटका पुढे ऐनवेळी बसू नये यासाठी या विषयाचा थेट "निक्काल' लावून भविष्यात मीडियाच्या साक्षीने पक्षनेतृत्वाला लक्ष्य केल्यास त्यांना याच मार्गाने जावे लागणार असल्याचा इशारा यानिमित्ताने उद्धव यांनी पक्षातील नेत्यांना दिल्याचे मानले जात आहे.

राज ठाकरे यांनीही पक्षबांधणीकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. फेब्रुवारीत राज्याचा दौरा सुरू करण्याबरोबरच त्यांनी पक्षामधील वादग्रस्त पदाधिकाऱ्यांना थेट घरचा रस्ता दाखविला आहे. एकीकडे हर्षवर्धन जाधव यांनी पक्षनेतृत्वावर थेट टीका करीत मनसेचा राजीनामा दिल्यावरही त्याची दखल राज यांनी घेतली नाही. त्याच वेळी पक्षांतर्गत तक्रारीची दखल घेऊन रस्ते आस्थापनेनंतर वाहतूक सेनेच्या अध्यक्षांचा अपवाद सोडून इतरांना घरचा रस्ता दाखविला आहे. तसेच यापुढील कोणतीही नेमणूक परस्पर न करण्याचा आदेश दिला आहे. काही दिवस शिवसेनेसह मनसेच्या गोटातही शांतता होती, पण आता नव्या वर्षाच्या सुरुवातीला दोन्ही पक्षांनी नवी सुरुवात पक्षातून आक्रमकपणे केल्याचे दिसते आहे.

बुधवार, 9 जनवरी 2013

मनसे सेटलमेंट करणारा पक्ष

मनसे सेटलमेंट करणारा पक्ष

- सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, January 10, 2013 AT 03:00 AM (IST)


मुंबई - आमदार असताना पोलिसांकडून बेदम मारहाण झाल्यानंतरही पक्ष आपल्या पाठीशी उभा राहिला नाही. मनसे सेटलमेंटमध्ये अडकला आहे. पक्षाच्या तिकिटावर निवडून आल्याने पक्ष सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्याची माहिती मराठवाड्यातील कन्नडचे मनसे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज दिली.

विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यालयात जाधव यांनी राजीनामा सादर केला. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी मनसेवर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, आमदारकीचा राजीनामा दिल्याने मी पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जाणार आहे. कोणत्याही पक्षातून नव्हे, तर अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मंत्र्यांकडे असलेल्या पोलिसांकडून मला बेदम मारहाण झाली. त्यानंतर राज ठाकरे यांनी सभा घेतली; पण योग्य ठिकाणी या विषयावर दादच मागण्यात आली नाही. विधानसभेच्या अधिवेशनात पहिल्या दिवसापासून या विषयावर मनसे आक्रमक होणे अपेक्षित असताना गटनेते बाळा नांदगावकर यांनी तुझा विषय एवढा महत्त्वाचा नसल्याची प्रतिक्रिया दिल्याचा आरोप जाधव यांनी या वेळी केला. आपल्यावरील मारहाणीत सेटलमेंट झाल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. पक्षप्रमुखांच्या परवानगीशिवाय अशी सेटलमेंट होणे शक्‍य नसल्याची पुस्तीही त्यांनी जोडली. केवळ शिवसेनेने मारहाणीत विषय उपस्थित केल्यानेच त्यावर चर्चा घडू शकली.

आम्ही रस्त्यावरचे नाहीत
ज्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आणि कॉंग्रेसच्या विरोधात लढल्याने पोलिसांच्या मारहाणीला सामोरे जावे लागले, त्याच पक्षाला जिल्हा परिषदेत पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. एवढेच नव्हे तर स्थानिक पातळीवरील निर्णयातही वरिष्ठ पातळीवरून सातत्याने हस्तक्षेप केला जात होता. आम्ही काय रस्त्यावरचे लोक नाहीत. माझे वडीलही आमदार होते. मनसेचे काम चांगले चालेल असे वाटल्याने येथे आलो होतो; पण येथेही सेटलमेंटवरच सारे चालत असल्याने जनतेकडे पुन्हा एकदा जाणार असल्याचे जाधव यांनी सांगितले

रविवार, 6 जनवरी 2013

बलात्काराच्या घटनेला 'बिहारीच' जबाबदार - राज

बलात्काराच्या घटनेला 'बिहारीच' जबाबदार - राज
 

- वृत्तसंस्था
Sunday, January 06, 2013 AT 02:49 PM (IST)
मुंबई - दिल्लीत बसमध्ये झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेला बिहारमधून दिल्लीमध्ये स्थलांतरीत झालेलेच जबाबदार असल्याचे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

गोरेगाव येथे एका कार्यक्रमात शनिवारी बोलताना राज ठाकरे म्हणाले, की आपण सर्वजण दिल्लीतील बलात्काराच्या घटनेविषयी बोलत आहोत. पण, ते सर्वजण कुठले होते हे कोणीच बोलत नाही. मी जरा काही बोललो की, लगेच माझ्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतात. पण, हे सर्व बलात्कार करणारे बिहारमधून आले आहेत तरी त्यांच्याबद्दल कोणीच काही करत नाही. माझ्यामते आपली सर्व सिस्टीम बिघडली आहे. 

राज ठाकरे यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर बिहारमधील नेत्यांनी नाराजगी व्यक्त केली आहे. जनता दल युनायटेडने राज ठाकरे यांचे वक्तव्य बेजबाबदारपणाचे असल्याचे म्हटले आहे