सरकारविरोधात आमदारांची "मनसे' युती
सकाळ वृत्तसेवा
Friday, March 18, 2011 AT 12:30 AM (IST)
मुंबई - राजकारणात परस्परविरोधी टोकाच्या भूमिका असल्या तरी व्यक्तिगत हक्कासाठी सर्वपक्षीय आमदारांतील एकीचे बळ आज विधिमंडळात दिसले. आमदार विरुद्ध सरकार असे चित्र आज पहिल्यांदाच विधिमंडळात पाहायला मिळाले. सत्ताधारी आमदारांनी विरोधी पक्षाच्या आमदारांची बाजू उचलून धरल्याने मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री अवाक् झाले.
मनसेचे आमदार हर्षवर्धन जाधव मारहाण केल्याप्रकरणी सरकार पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करीत नसल्याने, संतापलेल्या आमदारांनी उद्या विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. आमदारांच्या आक्रमक भूमिकेवर तोडगा काढण्यासाठी सरकारला मात्र तारेवरची कसरत करावी लागत आहे.
आमदार हर्षवर्धन जाधव मारहाणप्रकरणी सर्वपक्षीय आमदारांच्या संतापाचा आज सरकारला सामना करावा लागला. विधानसभेत आमदारांनी घेतलेला आक्रमक पवित्रा विधानसभेच्या बाहेरही कायम राहिल्याने सरकारची पंचाईत झाली. आमदार जाधव यांना मारहाण करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करा. त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, यासाठी विरोधकांसह सत्ताधारी आमदारांनी सरकारवर अक्षरश: दबाव आणल्याचे चित्र होते.
आमदार जाधव मारहाणप्रकरणी सभागृहाचे कामकाज बंद पाडल्यानंतर सर्व आमदारांनी मुख्यमंत्र्यांच्या दालनाकडे मोर्चा वळविला. पोलिसांनी आमदाराला अमानुष मारहाण केल्यानंतरही सरकार पोलिसांवर कारवाई करीत नसल्याचे आश्चर्य आमदार व्यक्त करीत होते. "एका आमदाराला मारहाण झाली. गंभीर गुन्हा करणाऱ्या कैद्यालाही मारत नाहीत, त्यापेक्षा अमानुष मारहाण आमदाराला झाली. आज सरकार गप्प राहिले, तर उद्या कोणत्याही आमदारावर हा प्रसंग येईल', अशी व्यथाच आमदारांनी मुख्यमंत्र्यांपुढे मांडली. मात्र, या प्रकरणाचा सर्व तपास न्यायालयीन स्तरावर सुरू असल्याने सरकारला कोणतीही कारवाई करता येणार नाही, असे गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी स्पष्ट केले.
विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील, मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांची विधानसभा अध्यक्षांच्या दालनात या विषयावर बैठक झाली. सर्व आमदारांनी घेतलेली आक्रमक भूमिका कशी हाताळावी, याबाबत या बैठकीत चर्चा झाली.