शनिवार, 11 फ़रवरी 2012

नक्कल करायलाही अक्कल लागते

संकलन : संदीप आचार्य - रविवार, २९ जानेवारी २०१२
altगिरीश कुबेर-‘लोकसत्ता आयडिया एक्स्चेंज’मध्ये तुमचे स्वागत. तुमचा या एक्स्प्रेसच्या इमारतीशी तसा जुना संबंध आहे..
राज ठाकरे- ‘लोकसत्ता’मध्ये १९८६-८७ या दोन वर्षांमध्ये मी फ्रीलान्स कार्टुनिस्ट म्हणून काम केले. त्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री होते. त्यांच्यावर एक व्यंगचित्र मी काढले होते. ते माझे येथील शेवटचे व्यंगचित्र. नंतर घरी व्यंगचित्र काढायचो आणि येथे घेऊन यायचो.

त्यावेळी फारशी वादग्रस्त व्यंगचित्रे काढली नाहीत; कारण तेव्हा तशी सवय नव्हती. पुढे ‘सामना’ सुरू झाल्यानंतर १९९२ ते ९७ या काळात अनेक व्यंगचित्रे काढली. त्यावेळी शरद पवार यांच्यावरील काही व्यंगचित्रे गाजली होती. तेव्हा पवारांच्या २८५ भूखंडांचे प्रकरणही गाजत होते. त्यावर ‘आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे पाहायचे वाकून’ अशा ओळी लिहून एक व्यंगचित्र काढले होते. शिवसेनेला केवळ वातीपुरताच कापूस माहीत, अशी टीका कापूस आंदोलनाच्यावेळी शरद पवार यांनी केली होती. तेव्हा गादीवर झोपलेल्या पवारांचे चित्र काढले होते. खाली ओळी होत्या, ‘तुमचा कापसाचा संबंध केवळ सत्तेच्या गादी पुरताच का?’
altगिरीश कुबेर- तुमचे काकाही उत्तम व्यंगचित्रकार, व्यंगचित्राच्या बाबतीत तुमचे घराणे थेट डोव्हिड लो यांच्यापर्यंत पोहोचलेले. अशावेळी राजकारणात आल्यामुळे ‘ती रेषा’ पुसली गेली का? तुम्हाला डिस्ने वगैरेही करायचे होते? अभिषेक बच्चन यांना घेऊन एक चित्रपट करण्याचे तुमच्या मनात होते..
राज ठाकरे-  मी बराच काळ राजकीय व्यंगचित्रे काढली. आताच्या राजकीय वाटचालीत ते शक्य होत नाही. सध्या माझा बहुतेक वेळ मनसेच्या उमेदवारांचे ‘एडिटिंग’ करण्यात जातो. २००१ ला मी संपूर्णपणे राजकारण हा विषय बंद केला होता. ज्याचा शेवट मी ज्या पक्षात होतो तेथून बाहेर पडण्यात झाला. २००१ ते २००३ पर्यंत मी काय करतोय हे कोणी मला विचारतही नसे. निवडणुका आल्या की मला प्रचाराला बाहेर काढायचे आणि निवडणुका संपल्या की पुन्हा अडगळीत ठेवून द्यायचे. ही त्यावेळची पद्धत होती. २००४ सालीही असेच प्रचाराला बाहेर काढले होते. त्यामुळे माझ्यापुढे दोनच पर्याय होते. एक म्हणजे altराजकारणातून संपूर्णपणे बाजूला होणे किंवा स्वत:चा राजकीय पक्ष काढणे. त्यावेळी असंख्य कार्यकर्त्यांच्या तसेच अनेकांच्या माझ्याकडून काही अपेक्षा होत्या. त्यामुळे राजकारणातून बाहेर पडणे शक्य नव्हते. दुसरी गोष्ट म्हणजे मला दुसरे काहीच करता येत नव्हते म्हणून मी राजकारणात आलो नाही. करण्यासारख्या अनेक गोष्टी होत्या व आजही आहेत. शहरांचा विकास तसेच अनेक चांगल्या योजना तयार करणे या माझ्या आवडीच्या गोष्टी आहेत. माझ्यात नवनिर्मितीची क्षमता आहे ती लोकांसाठी का वापरू नये या विचारातून मी राजकारणात राहायचे ठरवले. नवीन काहीतरी करत राहाणे हा माझ्या आवडीचा भाग आहे. तेच राजकारणात मला करायचे आहे. लोकांनी जर आशीर्वाद दिले तर अनेक चांगल्या गोष्टी करता येतील. चित्रपट हे क्षेत्र असे आहे की त्यात संपूर्ण झोकून देण्याची गरज आहे. एकाचवेळी राजकारण आणि चित्रपट अशा दोन्ही गोष्टी करता येणार नाही.
: राज ठाकरे (Idea Exchange - सामर्थ संवादाचे) भाग - १

सुहास गांगल- तुम्हाला नवनिर्मिती करण्याची आवड आहे असे तुम्ही म्हणता, पण तुमच्यावर नक्कल करण्याचा आरोप होतो?
राज ठाकरे- असं आहे, त्यांना माझ्यावर असले आरोप करण्याशिवाय दुसरे काही करता येण्यासारखे नाही, त्यामुळे नक्कल करतो असे आरोप करत राहातात.
सुहास गांगल- बाळासाहेब म्हणाले होते, त्याच्याकडे, म्हणजे तुमच्याकडे ‘नक्कल’ आहे, आमच्याकडे ‘अक्कल’ आहे..
राज ठाकरे- अहो, नक्कल करायलाही अक्कल लागते.. प्रश्न असा आहे की, शेवटी मी कुठच्या बाहेरच्या घरातून आलेलो नाही. हा घराण्याचा वारसा आहे. नक्कल करण्याचा आरोप व्यंगचित्रांच्या बाबतीत का केला जात नाही? या गोष्टी केवळ नक्कल करून येत altनाहीत. तुम्ही आचार्य अत्रे यांची तसेच प्रबोधनकारांची जुनी पुस्तके वाचा. प्रबोधनकारांनी १९२२ साली परप्रांतीयांची घुसखोरी, नोकऱ्यांवरील आक्रमण हे विषय मांडले आहेत. मुंबईत परप्रांतीय येतील आणि मराठी टक्का कमी करतील असे माझ्या आजोबांनी त्यावेळी लिहिले होते. अत्रे यांनी मराठी माणसाविषयी मांडलेले विचार वाचल्यानंतर १९६०च्या दशकात शिवसेनेने जे विचार मांडले त्यालाही मग नक्कल म्हणायचे का?
प्रशांत दीक्षित- तुमच्या मते तुमची ओरिजिनॅलिटी कशात आहे आणि बाळासाहेबांची कशात आहे?
राज ठाकरे- तुम्ही एक लक्षात घ्या, तुम्ही या साऱ्या प्रकारात माझ्या वडिलांना विसरता. त्यांच्यामध्येही व्यंगचित्रकार, चित्रकला अशा अनेक गोष्टी होत्या.आता माझे वडील सुरुवातीपासून फोटोग्राफी करायचे, मग आता काय म्हणू नक्कल केली? माझ्यातले ओरिजनल काय ते इतरांनी पाहावे. मुळात ओरिजनल काय हे पाहण्यापेक्षा जेन्युइन काय आहे ते पाहा ना! प्रभाव आणि अनुकरण यांच्यात फरक असतो.
गिरीश कुबेर- कलावंत ठाकरे आणि फटकळ राजकारणी ठाकरे यांच्यात नेमके काय वैशिष्टय़ आहे? दुसरे म्हणजे, ठाकरे घराण्यातच एक चक्रमपणा दिसून येतो, ते नेमके काय आहे?
राज ठाकरे- चित्रकला अथवा व्यंगचित्रकला हे एक माध्यम आहे. व्यंगचित्र काढण्यासाठी मुळात चित्र काढता यायला हवे. त्यानंतर एखाद्या व्यक्तीचे किंवा घटनेतील व्यंग ओळखून व्यंगचित्र काढणे ही एक प्रक्रिया आहे. ती नक्कल करून येत नाही. मी जी व्यंगचित्रे काढली आणि जे राजकारण करत आहे त्यात एक सातत्य आहे. आणि चक्रमपणा हा अनुवांशिक भाग आहे. माझे आजोबा, खापर पणजोबा ही वेगळ्या धाटणीची माणसे होती. एखादी गोष्ट पटली नाही तर ठाम विरोध करत. मग कोणाची पर्वा वगैरे अजिबात नाही. कलेवर व कलावंतांवर प्रेम तसेच सामाजिक बांधीलकी हा ठाकऱ्यांचा स्थायीभाव. आता चार चार पिढय़ा डॉक्टर असतात ना? तसंच हा चक्रमपणा वारसहक्काने चालत आला आहे. हा वारसा पुढेही चालू राहील पण कोणत्या क्षेत्रात चालेल ते सांगणे कठीण आहे.
गिरीश कुबेर- मनसे स्थापन केल्यानंतर लोकांच्या अपेक्षांच्या कसोटीला उतरला आहात का ?
राज ठाकरे- पक्ष काढणे ही सोपी गोष्ट नाही. मी जेव्हा पक्ष काढला तेव्हा एकाही शिवसैनिकाला अथवा नेत्याला पक्षात येतो का म्हणून फोन केला नाही. तुम्ही विचार करा, जेव्हा मी पक्ष स्थापन केल्यानंतर शिवतीर्थावर सभा घेण्याचे ठरवले त्यावेळी जर लोक आले नसते तर दोन तासात, नव्हे, अवघ्या अध्र्या तासात मी संपलो असतो. नवीन पक्ष, नवीन झेंडा, नवीन चिन्ह तसेच राजकीय अनुभव नसलेला तरुण घेऊन २००७च्या पालिका निवडणुकीत उतरलो. निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी एका इंग्रजी वर्तमानपत्रात बातमी झळकली, ‘पार्टी इज ओव्हर’. मला त्यावेळी काय झाले असेल याचा नुसता विचार करा. त्या पार्टी इज ओव्हरपासून आजपर्यंतचा प्रवास झाला आहे. माझा पक्ष नवीन असल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या साऱ्यातून लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्राामणिकपणे प्रयत्न करत आहे.
: राज ठाकरे



मुकुंद संगोराम- नवीन पक्ष स्थापन करताना शिवसेनेतील काय घ्यायचं नाही, असं तुम्ही ठरवलं?
altराज ठाकरे- खरं सांगू?.. संपादक-साहित्यिक यांच्याशी वाद घालायचा नाही. त्याच्यात आपली एनर्जी वाया घालवायची नाही. पत्रकारांना शिव्या द्यायच्या नाहीत, अशा काही गोष्टी मी ठरवल्या होत्या. पत्रकारांचे फोन घ्यायचे. टीका झाली तर प्रतिक्रिया द्यायची नाही.
प्रशांत दीक्षित- तुम्ही शिवसेनेत असताना शिवसेना कोणत्या मुद्दय़ांपासून ढळत गेली?
राज ठाकरे- बाळासाहेब जोपर्यंत संपूर्णपणे कार्यरत होते तोपर्यंत काही प्रश्न नव्हता. त्यांचा प्रामाणिकपणा, कामावर बारीक लक्ष याला काही तोड नव्हती. त्यांचे विचार ठाम होते. नुसतेच पैसे व सत्ता असले विचार बाळासाहेबांच्या वेळेला नव्हते. त्यांनी ज्या कष्टातून हे उभे केले ते मी लहानपणापासून पाहिले आहे. त्यांचे जेव्हा चोवीस तास लक्ष होते तेव्हा काही अडचण नव्हती.
गिरीश कुबेर- नंतरच्या नेतृत्वाचे लक्ष नव्हते असे म्हणायचे आहे का ?
राज ठाकरे- कसं आहे, मी जेव्हा आंदोलन करतो किंवा मुद्दा मांडतो तेव्हा तो मला स्वत:ला पूर्णपणे पटलेला असतो. त्यामुळे मी कोणत्याही टीकेला तोंड देऊ शकतो. मुळात तुम्हालाच तुमचा विषय पटलेला नसेल तर तुम्ही त्याला न्याय देऊ शकणार नाही. आता आजच्याच सामनामध्ये उद्धवची पुस्तके ई-बुकवर टाकण्याची बातमी आहे. निवडणुकीचा विषय आहे आणि यांचे काय चालले आहे? आता मलाही अनेक षौक आहेत पण वेळकाळाचे भान बाळगले पाहिजे. विषयाचे गांभीर्य नसेल तर सारेच फिके पडत जाते. त्यामुळेच मी अखेर शिवसेनेतून बाहेर पडलो.
गिरीश कुबेर- १९६६ला शिवसेनेची स्थापना झाली. त्यानंतर तुमचा नवीन पक्ष उभा राहिला तो केवळ शिवसेनेच्या नाराजीतून उभा राहिला का?
राज ठाकरे- माझा पक्ष स्थापन होण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस हा नवीन पक्ष उभा राहिला. अर्थात शरद पवार अनुभवी होते. त्यापूर्वीही पुलोदचा प्रयोग त्यांनी केला होता. त्यांनी प्रस्थापितांना घेऊन पक्ष उभा केला. ते निवडून येणाऱ्या माणसांची मोळी बांधतात आणि त्याची दोरी ही पवार साहेबांच्या हाती घट्ट असते. माझ्याकडे निवडून येणाऱ्या माणसांची मोळी नव्हती. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर मराठी मते फोडल्याची टीका झाली. पराभव हा कोणाच्या तरी माथी मारायचा असतो त्यातून मनसेवर मराठी मते फोडल्याचा आरोप झाला. मात्र मराठी माणसाने असल्या आरोपांना दाद दिली नाही. दरवर्षी १८ वयोगटाचा तरुण मोठय़ा प्रमाणात बाहेर पडतो, अशा असंख्य महिला आहेत की ज्यांचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. त्याशिवाय कालपर्यंत मतदान न करणाऱ्या एका मोठय़ा वर्गाने मनसेला मत दिले आहे. माझ्याकडे अन्य पक्षांची वळलेली मते ही दीड टक्का असतील. सर्व पक्षांना त्यांची मते मिळाली याचा अर्थ मतदान वाढले आहे. महाराष्ट्रातील मराठी माणसाला स्वत:ला काही अक्कल आहे की नाही? त्यामुळे मराठी मते फुटली हे मला पटत नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शेकाप अगदी अपक्षांना मतदान करणारे मराठीच आहेत. तिथे नाही मराठी मते फुटत, मला मते मिळाली की मराठी मते फुटतात. हा काय प्रकार आहे? आपल्या भूमिकेवर आपण ठाम नाही, मुद्दे नीट मांडता येत नाहीत त्यामुळेच ही परिस्थिती ओढवली आहे, हे वास्तव शिवसेनेच्या नेत्यांनी स्वीकारले पाहिजे.
मधू कांबळे- हिंदुत्व आणि मराठी यात शिवसेना मराठीपासून थोडी दूर गेली हेही एक तुमच्या पक्षनिर्मितीचे कारण आहे का?
राज ठाकरे- शिवसेनेत असताना मी मराठी तरुणांसाठी रेल्वेभरती आंदोलन केले होते. त्यावेळी हे पुढे  वाढवायचे नाही, काही करायचे नाही, अशा सूचना मला देण्यात आल्या होत्या. तो एक भाग बाहेर पडण्यामागे होताच. मराठी आणि हिंदुत्व या गोंधळात शिवसेना सापडली का, असा प्रश्न उपस्थित होतो. पण मी बाळासाहेबांना याबाबत दोष देणार नाही. त्यांच्या भूमिकेमुळेच शिवसेना सत्तेपर्यंत आणि लोकसभेपर्यंत पोहोचली. ते जोपर्यंत पक्ष चालवत होते तोपर्यंत त्यांनी यशाकडेच शिवसेनेला नेले. नंतरचे काय बोलू?
गिरीश कुबेर- याचा अर्थ तुमचा फोकस केवळ मराठीपुरताच राहणार का?
राज ठाकरे- सरळ आहे. माझ्या पक्षाचे नावच ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ असे ठेवले आहे. त्यामुळे बाहेर जाण्याचे झंझटच ठेवले नाही. माझी सीमा मी निश्चित केली आहे. मला राष्ट्रीय नेता व्हायचे नाही आणि माझा पक्ष राष्ट्रीय करायचा नाही. पवारांना दिल्लीत मराठा नेता म्हणून तर नरेंद्र मोदी यांना गुजरातचा नेता म्हणून ओळखले जाते. प्रत्येक राज्य मोठे झाले तर देश मोठा होणारच आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो असे गुजरातमध्ये कोणीही बोलणार नाही. शिवसेना नॅशनल पार्टी व्हायला निघाली. गुजरात, गोवा, उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका लढवल्या. तसले मी काही करणार नाही. माझे खासदार हे महाराष्ट्राचे खासदार असतील व ते केवळ महाराष्ट्राचे प्रश्न संसदेत मांडतील.




दिनेश गुणे- मनसे हा शिवसेनेचा प्रथम क्रमांकाचा राजकीय शत्रू आहे का? त्यामुळेच पालिकेतील कारभारावर तुमच्याकडून टीका होते?
राज ठाकरे- जो पक्ष लोकांचे काम करत नाही तो माझा शत्रू आहे. मी काँग्रेस व अजित पवारांवरही टीका केली आहे. शेवटी ज्याची सत्ता आहे त्याच्यावरच टीका होणार. शिवसेना-भाजपची मुंबई व ठाण्यात सत्ता असल्याने त्यांच्यावरच टीका होणार. मुंबई व ठाण्याची वाट युतीने लावली त्यामुळे त्यांच्या कारभारावरच मी बोलणार. पुण्यात जाऊन मी सेनेवर टीका करणार नाही तर राष्ट्रवादीवर करणार. आमच्यातील वाद हे काही प्रॉपर्टीवरून नाहीत. हे काही अनिल आणि मुके श असे वाद नाहीत. हे काही जीवघेणे वैर नाही. पंडितअण्णा मुंडे यांच्यासारखे आता तुला संपवतोच असले काही नाही.
संदीप आचार्य- तुम्ही शिवसेनाप्रमुखांना अजूनही विठ्ठल मानता का? आणि त्यांना खूष करण्यासाठी नेमके काय करणार?
altराज ठाक रे- बाळासाहेब माझे दैवत आहेतच. त्यांच्या स्वप्नातील मुंबई व ठाण्याचे चित्र निर्माण करण्याचा, महाराष्ट्र घडवण्याचा माझा प्रयत्न राहील. खासकरून मुंबई व ठाण्याची निवडणूक आहे म्हणून सांगतो त्यांच्या स्वप्नातील शहर मी घडवीन त्यामुळे ते निश्चितच खूष होतील.
केदार दामले- तुम्ही गुजरातला जाऊन आला. बाळासाहेबांच्या स्वप्नातले तेथे काही आहे का, ज्याचा तुम्ही येथे समावेश कराल?
राज ठाकरे- मी गुजरात पाहायला गेलो होते. राज्याचा आराखडा अणि शहरांचा आराखडा वेगळा असतो. शहरांचा विचार करताना महानगरपालिका नेमके काय देऊ शकते याचा विचार करावा लागतो. तसेच राज्य शासन शहरांसाठी काय करणार तेही महत्त्वाचे असते. त्या दृष्टिकोनातून गुजरातचा दौरा केला. तेथील विकासकामांचा अभ्यास केला. सामान्य लोकांना राज्याची जबाबदारी व पालिकेची जबाबदारी याची नेमकी कल्पना नसते. त्यातून अनेकदा लोकांची गल्लत होते. वाहतुकीच्या प्रश्नाला पालिकेला जबाबदार धरले जाते. वास्तवात ती राज्य शासनाची जबाबदारी असते.
संदीप आचार्य- तुमची विकासाची ब्ल्यू पिंट्र लोकांपर्यंत कधी पोहोचणार? गेली अनेक वर्षे तुम्ही नुसते बोलताच आहात म्हणून हा प्रश्न लोकांच्याच मनात निर्माण झाला आहे.
राज ठाकरे- मलाच तुम्हाला विचारायचे आहे, ब्ल्यू प्रिंट म्हणजे नेमके काय? ही सोपी प्रक्रिया नाही. शहरांचा व राज्याच्या विकासाचा आराखडा तयार करायला वेळ लागणार. मी यापूर्वीही सांगितले होते की २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मनसेची ब्ल्यू प्रिंट जाहीर झालेली असेल.
संदीप आचार्य- तोपर्यंत झोपडय़ांचे टॉवर उभे असतील. अतिक्रमणांनी शहराच्या विकासाचा चेहरा बदललेला असेल, त्यामुळे तेव्हा तुमच्या ब्ल्यू प्रिंटचा काही उपयोग होईल असे वाटते का?
राज ठाकरे- महापालिका जसे वेगवेगळ्या कंपन्यांकडून रिपोर्ट बनवतात तसे रिपोर्ट माझ्याकडेही आहेत. तेच द्यायचे असते तर मी आताही देईन. आज पालिका अथवा राज्य शासन ज्या एजन्सी नेमून रिपोर्ट मागवतात ते ना त्यांना कळतात ना सर्वसामान्यांना त्याचा काही उपयोग होतो. शेवटी धूळ खात पडतात. मी विकासाचे एक चित्र पाहिले आहे ते ब्ल्यू प्रिंटमधून तुम्हाला निश्चित दिसेल. आता होते काय की रस्त्यावरची अनधिकृत बांधकामे काढता येत नाहीत म्हणून फ्लायओव्हर बांधले जातात आणि नंतर त्याचा विकास आराखडय़ात समावेश होतो. हे काय नियोजन झाले? त्याचवेळी गुजरातने केलेला विकास थक्क करणारा आहे. त्यामागे एक योजनाबद्ध नियोजन आहे.  विजेच्या बाबतीत त्यांनी महाराष्ट्राला मागे टाकले. आगामी दहा वर्षांत एक लाख मेगाव्ॉट वीज निर्मितीची त्यांची योजना आहे. यातून गुजरात तर प्रकाशून जाईलच परंतु अतिरिक्त वीज विकून त्यांना उत्पन्नही मिळणार आहे. राज्याच्या प्रगतीचा व्यवसाय करण्यात ते यशस्वी होतात आणि आपण मात्र नन्नाचा पाढा वाचत रडत राहातो. कोणत्याही राज्याच्या प्रगतीसाठी रस्ते, पाणी अणि वीज हा त्रिशूळ लागतो. तो महाराष्ट्रात आणण्यासाठी आपण का मागे पडलो?
संदीप आचार्य- उद्या तुमच्या म्हणण्याप्रमाणे पूर्ण वाट लागल्यानंतर तुम्हाला सत्ता मिळाली तर तुमच्या ब्ल्यू प्रिंटचा उपयोग कसा करणार?
राज ठाकरे- माझ्या हातात सत्ता दिल्याशिवाय यावर फार बोलता येणार नाही. पण एक सांगतो अत्यंत निर्दयपणे काम करीन. शिव्या खाईन मात्र त्यानंतर चित्र बदललेले असेल. आजही कायदे आहेत त्याची अंमलबजावणी होत नाही. आज बाहेरून आलेल्या लोकांनी मुंबईच्या संस्कृतीची वाट लावली आहे. आज हव्या तेवढय़ा गाडय़ा येताहेत. एकेकाकडे दोन-चार गाडय़ा आहेत. दोनपेक्षा जास्त गाडय़ा असल्या तर जादाचा कर त्या गाडय़ांवर लावला पाहिजे. अन्यथा रस्ते कमी पडणार. आता आणखी कठोर कायदे करायचे असतील तर त्यासाठी केंद्राची परवानगी लागते असे अधिकारी सांगतात. मी सत्तेत असतो तर कायदे करून टाकले असते. काय केंद्रातून पोलीस आले असते का मला पकडायला? हाच आपल्याकडचा व गुजरातमधील फरक आहे. तेथे नरेंद्र मोदी हे लोकांनी बसवलेले मुख्यमंत्री आहेत आणि आपले पृथ्वीराज चव्हाण हे दिल्लीच्या कृपेवर अवलंबून आहेत. त्यामुळे दिल्लीच्या कृपेवर मुख्यमंत्री बनलेल्यांकडून फारशी अपेक्षा करता येणार नाही.
सुहास गांगल- तुमच्याकडेही चार गाडय़ा आहेत..
राज ठाकरे- अर्थात माझ्याही दोन गाडय़ांवर जबर दंड लावा. चार गाडय़ा ही माझी गरज आहे म्हणून ठेवल्या आहेत. कुटुंब व कारभार वाढला की तुमच्या हे लक्षात येईल.
प्रशांत दीक्षित- हल्ली नगरसेवकांकडेही पाच-पाच गाडय़ा असतात..
राज ठाकरे- याची वेगवेगळी कारणं असतील. त्यातील एक म्हणजे गाडय़ा स्वस्त झाल्या आहेत.  सार्वजनिक वाहतूक मोडकळीला आल्यामुळे आता दुचाकीही वाढल्या आहे. यामागे केवळ कंपन्यांचे भले करण्याचे उद्योग असून याचा कोणी विचार करणार आहे की नाही? असाच प्रकार पेवर ब्लॉकचा आहे. काही कंपन्यांचे भले करण्यासाठी  चांगल्या रस्त्यांवरही पेवर ब्लॉक बसवले जातात. जर २० वर्षे टिकणारे रस्ते केले तर कंत्राटदारांचे करायचे काय, असा प्रश्न राजकारण्यांनाच पडणार आहे. टक्क्य़ाचे राजकारण आहे हे सारे.
सुहास गांगल- तुम्हाला टक्क्य़ाचे राजकारण नको हे मान्य केले तर मग तुमची सत्ता आल्यानंतर पक्ष कसा चालवणार?
राज ठाकरे- पक्ष चालवायला पैसा हवा, पैसे मिळवायला हवे. मात्र त्यासाठी टक्क्य़ाचे राजकारण करण्याची गरज नाही. मी जे गुजरातचे उदाहरण देतो ते त्यासाठीच. असल्या फालतू चिंधी चोरगिरी ते करत नाहीत. चांगले काम केल्यानंतर उद्योगपती स्वत:हून पैसे देण्यास तयार आहेत.
प्रशांत दीक्षित- गुजरातसारखा विकास किंवा उद्योग महाराष्ट्रात आणण्याची तुमची भूमिका आहे का?
राज ठाकरे- अर्थात महाराष्ट्राचा विकास करण्याचेच माझे स्वप्न आहे. महाराष्ट्रात उद्योगाला परवानगी देण्यासाठी मंत्रालयातील लोक ४० टक्क्य़ांची भागीदारी मागतात. या पातळीवर जर चालणार असेल तर कसे उद्योग महाराष्ट्रात टिकतील. म्हणूनच मी बेळगावच्या लोकांना सांगितले की महाराष्ट्रात काही रामराज्य नाही.
:



रोहन टिल्लू- ठाण्यात भाजपचे काही नगरसेवक मनसेत येऊ पाहात आहेत आणि मनसेच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा त्यांना विरोध आहे. अशावेळी तुमची भूमिका काय?
राज ठाकरे- ‘ऐकावे जनाचे करावे मनाचे’ हीच माझी भूमिका आहे.
संदीप आचार्य- सेना-भाजप गेली १५ वर्षे मुंबई-ठाण्यात सत्तेवर आहे. त्यांच्या कारभाराबाबत तुमचे काय म्हणणे आहे? त्यांनी विकास केला आहे का?
राज ठाकरे- मला असे वाटते आपण प्रचाराचे मुद्दे पाहिले तर त्यातून आपण पुढे सरकतच नाही. दरवेळी निवडणूक आली की, रस्ते, पाणी, स्वच्छता हेच मुद्दे सांगितले जातात. मुंबई दर्शनची जी गाडी  फिरते ती काय दाखवते तर ब्रिटिशांनी बांधलेल्या गोष्टीच दाखवते. युतीने शहरात दाखवण्यासारखे काय केले आहे? पालिकेने केलेल्या कोणत्या गोष्टी मुंबई दर्शनमध्ये दाखवतो? चार चांगल्या गोष्टी यांना अर्थसंकल्पाचा वापर करून का करता आल्या नाहीत?
गिरीश कुबेर- तुमचा जो वचकनामा येईल त्यात काय असेल?
राज ठाकरे- मुंबईच्या विकासाच्या तसेच पुढच्या पिढय़ांनी पाहाव्या अशा पाचच गोष्टी मी वचकनाम्यात मांडेन आणि पालिकेत सत्ता मिळाली तर त्या पूर्ण झालेल्या दिसतील. लोकांना महत्त्वाच्या वाटणाऱ्या गोष्टी पाच-सहाच आहेत.
दिनेश गुणे- तुमचा पक्ष सत्तेत नाही पण मतदारांना सांगता येतील अशा कोणत्या गोष्टी तुम्ही केल्या?
राज ठाकरे- ‘खळ्ळ खटॅक’! या कार्यक्रमातून अनेक गोष्टी झाल्या आहेत.
सुहास गांगल- ‘खळ्ळ खटॅक’ करून तुम्ही जेटच्या प्रश्नात लक्ष घातलेत. एअर इंडियातील कर्मचाऱ्यांना चार- चार महिने पगार मिळत नाही, तेथे तुम्ही काही करणार का?
राज ठाकरे- जेटचे लोक जसे माझ्याकडे आले तसे एअर इंडियातील कोणी आलेले नाही. ते आले तर निश्चितच त्यांना मदत करीन.
संदीप आचार्य- मनसेच्या मुंबई, ठाणे आदी पालिकेतील नगरसेवकांच्या कामगिरीबाबत तुम्ही समाधानी आहात का?
राज ठाकरे- सर्वच नगरसेवकांबाबत मी निश्चितच समाधानी नाही. माझ्या नगरसेवकांची संख्या कमी असल्यामुळे त्यांना फारसे बोलू दिले जात नाही. मात्र मुंबई व पुण्यात माझ्या नगरसेवकांनी अनेक चांगले विषय उपस्थित केले. मुंबईत दोनतीन जणांची कामगिरी चांगली आहे. सर्वच पक्षांमधील नगरसेवकांच्या कामाचा विचार केल्यावरच परीक्षा घेण्याची संकल्पना पुढे आली. यांनी कामच केले नाही तर निवडणुकीत मी माझा घसा कशाला कोरडा करायचा?
गिरीश कुबेर- पण बाळासाहेबांनी परीक्षा घेतली नाही व घेण्याची जरुरी नसल्याचे म्हटले आहे..
राज ठाकरे- नसतील त्यांनी परीक्षा घेतल्या. त्यांना आवश्यक वाटल्या नसतील. मला वाटलं म्हणून मी परीक्षा घेतल्या. काळ बदलला आहे. लोकांचे विचार बदलले आहेत. आजची पिढी बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला या विचारांची आहे. इंटरनेट अथवा अन्य माध्यमातून जग जवळ येत आहे. लोकांना जगातील शहरांची व आपल्या शहरांची परिस्थिती दिसते आहे. आपल्या शहरांची अधोगती दिसते आहे. ते जेव्हा मला प्रश्न विचारणार तेव्हा किमान माझ्या पक्षाचा नगरसेवक आयक्यू लेव्हलला सक्षम असला पाहिजे ही माझी भूमिका आहे.
गिरीश कुबेर- विधानसभा निवडणुकीच्या वेळीही परीक्षा घेणार का?
राज ठाकरे- जरूर घेतल्या पाहिजेत. केवळ मी एकटय़ानेच नव्हे तर बाकीच्या पक्षांनीही परीक्षा घेतल्यास चांगले उमेदवार मिळू शकतील. मी जरी पहिल्यांदा परीक्षा घेतल्या तरी हे काही माझे पेटंट नाही. कारण एखादी व्यक्ती खूप शिकली आहे म्हणजे तो योग्य उमेदवार होतो असे नाही. तर सामाजिक बांधीलकी आहे की नाही हेही तपासून सुवर्णमध्य साधला पाहिजे. परीक्षा घेतली म्हणजे खळ्ळ खटॅकवाल्या कार्यकर्त्यांना काही किंमत नाही,असे होणार नाही. नवीन लोक यामुळे राजकारणाकडे वळत असतील तर ते चांगले नाही का?
प्रशांत दीक्षित- महाराष्ट्रातील उद्योग बाहेर जात आहेत, अशा वेळी महाराष्ट्रात उद्योग राहावे यासाठी तुमचे काय व्हिजन आहे ?
राज ठाकरे- मुंबईचा विचार केला तर गिरण्या संपल्या. मात्र शहरात आजही अनेक कॉर्पोरेट कार्यालये आहेत. जगभरातील कोणत्याही शहरात उद्योग हे शहराबाहेर व कॉर्पोरेट कार्यालये शहरात असेच चित्र दिसेल. मुंबईमध्ये आगामी काळात कशा प्रकारचा व्यवसाय येईल यावर बरेच अवलंबून आहे. आपल्याकडे वाहतूक व्यवस्था प्रभावी झाल्यास अनेक उद्योग येथे येऊ शकतात. पायाभूत सुविधा निर्माण होणे गरजचे आहे. उद्योगांना सुविधा मिळाल्या पाहिजेत. आपल्याकडे उद्योजकांकडे चाळीस टक्के भागीदारी मंत्रालयातून मागितली जात असेल तर उद्योग राहतील कसे?  इंडस्ट्रीसाठी महाराष्ट्राएवढी चांगली जागा दुसरी नाही. परंतु इथे सत्तेत बसलेल्या राजकारण्यांकडे दूरदृष्टी नाही. विकासाची तळमळ नाही. डिस्नीसारखे मोठे उद्योग आपल्याकडे येत नाहीत कारण राजकीय स्थैर्य नाही. जेथे राजकीय स्थैर्य नसते तेथे परदेशातील मोठे उद्योग जातच नाहीत. त्यातून असे उद्योग आले की लगेच कामगार संघटना तेथे पोहोचणार आणि आपला झेंडा रोवणार. त्यामुळे येथे येणार कोण? कामगारांवर अन्याय होऊ नये या मताचा मी आहे परंतु दोन-चार टाळकी जी काही वाट लावतात ते योग्य नाही. यातून अनेक समस्या निर्माण होतात.
गिरीश कुबेर- हीच जर तुमची भूमिका असेल तर अमराठी लोकांना मारहाण करणे कितपत योग्य आहे?
राज ठाकरे- महाराष्ट्रात प्रगती होणार असेल तर त्यावरचा पहिला हक्क हा येथील मराठी तरुणांचाच आहे. मराठी मुलं सिलिकॉन व्हॅलीत नाव मिळवतात. त्यामुळे मराठी लोक कामाचे नाहीत हे म्हणणे चुकीचे आहे. एखादा उद्योग येथे आला त्यांना हवी असलेली माणसे त्यांनीच निवडावी, पण मराठीच. असे एकही क्षेत्र नाही जेथे मराठी माणूस काम करू शकत नाही. पण कंपन्यांमधील अधिकारी आपल्या राज्यातून येथे नात्यागोत्याचे लोक घेऊन येतात आणि इथल्या मराठी लोकांच्या संधी डावलल्या जातात हे मला मान्य नाही. बिहारचे लोक स्वस्तात काम करतात असे दाखवून इथल्या लोकांना डावलले जाते. यात कायदाही डावलला जातो. रेल्वे भरतीत मी पुढाकार घेतला तेव्हा पाच लाख मुलांनी अर्ज दाखल केले. दहा कोटीच्या महाराष्ट्रात एक कोटी मुले कामासाठी मिळणार नाहीत, हे कोणालाच पटणारे नाही. त्यामुळे त्यांना जर डावलेले जाणार असेल तर मी सहन करणार नाही.
गिरीश कुबेर- मुंबईत बाहेरचे लोक सहज येत. ते मुंबईला आपले म्हणत पण तुमच्या आंदोलनामुळे चित्र बदलले आहे..
राज ठाकरे- बाहेरच्यांना आपण आपलं म्हणत आलो पण ते आपल्याला परकेच मानतात. त्यांची वृत्ती बदलली नाही. ते जेव्हा येथे येतात तेव्हा जग एक असल्याचे सांगतात आणि त्यांच्या राज्यात गेले की ते त्यांच्या राज्याचे असतात. ही नाटकं फक्त मुंबई व महाराष्ट्रात चालतात. अमराठी टक्का वाढतो अशी ओरड राजकीय पक्ष करतात. त्यांनी शंभर टक्के मराठी उमेदवार दिल्यास अमराठी लोक मतदान न करता घरी बसणार आहेत का? जाती- पाती बघून उमेदवार कशाला देता?
दिनेश गुणे- गुजरात एक लाख मेगाव्ॉट वीज तयार करणार, असे तुम्ही सांगता. असे झाले तर शेजारच्या किमान पाच राज्यांना वीज निर्माण करण्याची गरज पडणार नाही. अशा वेळी जैतापूरसारख्या प्रकल्पांविषयी विषयी तुमचे मत काय?
राज ठाकरे- जैतापूर प्रकल्प व्हायलाच हवा असे माझे स्पष्ट मत आहे. जैतापूरच्या विरोधासाठी जी कारणे दिली जातात ती  भंपक आहेत. सुनामी वगैरे आली तर काय होईल, अशी भीती व्यक्त केली जाते. जगभर ज्या देशांमध्ये सर्वाधिक पर्यावरणाचा विचार करतात तेथे अणुऊर्जा प्रकल्प आहेत. मी मागे एका भाषणात यादी वाचून दाखवली होती. त्याच्यानंतर शिवसेनेने रिव्हर्स गिअर टाकला. जैतापूरमुळे धोक्याची भाषा करता, किरणोत्सर्गाची भाषा करता मग भाभा अ‍ॅटॉमिक रिसर्च सेंटर हे काय आहे? मुंबईच्या पोटात असलेल्या प्रकल्पाला विरोध नाही आणि जैतापूरला विरोध हे काय प्रकरण आहे? आणि आता अचानक हे गप्प का झाले? गेल्या तीन महिन्यांपासून शिवसेनेचा विरोध बंद का झाला?
मधू कांबळे- मग कोकणात येणाऱ्या एसईझेडबद्दल तुमचे मत काय आहे ?
राज ठाकरे- एसईझेडमध्ये नेमके काय करणार आहे ते स्पष्ट व्हायला हवे. आपल्याकडे दाखवले एक जाते आणि करायचे भलतेच असते. तेथील माणसांना त्यांच्या जमिनींचा योग्य भाव मिळाला  पाहिजे. त्याला किरकोळ भाव देणार आणि तुम्ही बक्कळ कमावणार हे कसे चालणार? सरकारचा प्रकल्प असला तर समजू शकतो पण एखादा उद्योजक तेथे जमीन घेणार व धंदा करणार आणि त्याच्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोलाने घेतल्या जाणार असतील ते योग्य नाही.
रेश्मा शिवडेकर- महाविद्यालयातील थेट निवडणुका हव्या की नको ?
राज ठाकरे- थेट निवडणुका नको. मीच तेव्हाचे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांना सांगून या निवडणुकांवर बंदी घालायला लावली. एक तर अधिकार नाही, पैसे नाही. मर्डर करणार, किडनॅप करणार.. त्यामुळेच या निवडणुका बंद केल्या.
सुहास गांगल- देशात ठाकरे हे एकमेव राजकीय कुटुंब आहे, जे निवडणूक लढवीत नाहीत..
राज ठाकरे- कारण आमच्या मनात येत नाही.
संदीप आचार्य- तुम्ही मागे मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त केली होती. मुख्यमंत्री बनण्यासाठी निवडणूक लढवावी लागते.
राज ठाकरे- मनात आले तर नक्की लढेन. नाहीतरी तुम्ही मला चक्रम म्हणताच.
गिरीश कुबेर- खासदार आनंद परांजपे तुमच्याकडे येणार होते, त्यांना का घेतले नाही?
राज ठाकरे- होय तो आमच्याकडे यायला निघाला होता. मला भेटलाही होता. पण कशासाठी त्याला घ्यायचे? त्याचा काय उपयोग होता? मी त्याला घेऊन करू काय, माझ्याकडे येऊन पवारांकडे बसला असता तर.. खरं सांगू, असले फोडाफोडीचे राजकारण मला मान्य नाही. याचा खासदार घे.. त्याचा नगरसेवक पळव, मग तुमचे लोक काय करणार? आपले लोक घडवण्याऐवजी भलते उद्योग करायचे हे मला मान्य नाही. फोडाफोडीतून तुमच्या हाताला काही लागत नाही. माझ्याकडेही पालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर अनेकजण आले. परंतु माझा पदाधिकारी सक्षम असेल तर मी त्याचाच प्रथम विचार करणार. परवा मी म्हटले होते की, हे शिवसेनावाले पवारांच्या वाटय़ाला गेले कशाला. हे असले फोडाफोडीचे राजकारण हे त्यांचे पेटंट आहे. आता बसलाय फटका त्यांच्या नादी लागल्याने.
स्वप्नसौरभ कुलश्रेष्ठ - सत्तेचे गणित जमवण्यासाठी कोणाशी युती-आघाडी करणार का?
राज ठाकरे- मला मिळालेली मतांची चढती कमान लक्षात घ्या. मला कोणाशी युती-आघाडी करायची नाही. अशी आघाडी करावी अशा लायकीचा एकही पक्ष नाही, त्यामुळे कोणाबरोबर जाण्याचा प्रश्नच येत नाही. हे सारे पक्ष बेभरवशाचे आहेत. साधी गोष्ट. सेना-भाजपमध्ये पाहू, बोलत नाही, रुसवे, फुगवे, या सीट शेअरिंगमध्ये जायचे मग कुठे कार्यक्रमालाच जायचे नाही, तर कुठे भाषणच करायचे नाही, असले उद्योग मला जमणार नाहीत.
सचिन रोहेकर- कंत्राटी कामगारांमध्ये बहुतेक अमराठी आहेत तसेच अनेक क्षेत्रात कुशल कामगार हे परप्रांतीय आहेत त्यांनाही तुमचा विरोध आहे का?
राज ठाकरे- माझी भूमिका समजून घ्या. बाहेरच्या राज्यातील लोकांनी येथे येऊच नये, त्यांना काम मिळूच नये अशी भूमिका एकदा तरी मांडली आहे का? काही विशिष्ट क्षेत्रात बाहेरचे लोक येणारच. काही पारंपरिक उद्योगांमध्ये बाहेरचे लोक येणारच. परंतु येथे आल्यानंतर ते किंवा त्यांना घेऊन जे राजकारण केले जाते, आपापले मतदारसंघ बनवले जातात, त्यातून जी दादागिरी निर्माण होते त्याला विरोध आहे. गरीब बिचारा म्हणून आपण सांभाळायचे आणि त्याने आपला मतदारसंघ बांधायचा असल्या गोष्टींना मी हाणतो. दीडदमडीचा आबू आझमी आझमगडहून येथे येतो आणि महाराष्ट्रात दोन मतदारसंघातून निवडणूक लढवून निवडून येतो. कोण करतो त्याला मतदान, उत्तर प्रदेशातून आलेले लोकच मतदान करतात ना? हा धोका आहे. याच मतदारांना भाळून इथले राजकीय पक्ष जातीवर उमेदवारी देतात त्यातून तुमचे अस्तित्व डावाला लागते. मुंबई स्वतंत्र करण्याचा हाच उद्योग आहे. पद्धतशीरपणे नगरसेवक, आमदार आणि खासदार निवडून आणायचे आणि मग तुम्हालाच हे विचारणार तुमचा काय संबंध मुंबईशी! यासाठी त्यांना बाहेरून लोक हवे आहेत. त्यासाठी पोलीस व पालिका यांना हाताशी धरून एका रात्रीत दोन एकरच्या जमिनीवर झोपडय़ा वसवल्या जातात. कालांतराने याच जमिनीवरील झोपडय़ांना मान्यता देऊन इमारती उभ्या केल्या जातात.
रोहन टिल्लू- मुंबईची माणसं सामावून घेण्याची क्षमता संपली आहे. तेव्हा परप्रांतीयांप्रमाणेच महाराष्ट्रातून येणाऱ्यांनाही तुमचा विरोध असेल का?
राज ठाकरे- मुंबईवर सर्वप्रथम महाराष्ट्रातील लोकांचाच अधिकार आहे. बाहेरून येणाऱ्यांना तुम्ही तीनशे चौरस फु टाची घरे देणार आणि इथल्या मग माणसाला काय? बाहेरचे लोक इथे येऊन अधिकार सांगतात पण मुंबईवर पहिला अधिकार हा महाराष्ट्रातील मराठी माणसाचाच आहे.
गिरीश कुबेर- झोपडय़ांची कालमर्यादा वाढवायला तुमची हरकत नव्हती, मग हा प्रश्न सोडवणार कसा?
राज ठाकरे- माझी हरकत असण्याचा प्रश्नच येत नाही. हे जे काही १९९५ की २०००च्या झोपडय़ांना मान्यता देण्याचा मुद्दा काढला जात आहे, हे सगळं झूट आहे. गेल्या काही दिवसात येथे अनेक लोक झोपडपट्टय़ांमध्ये राहण्यास आले असून त्यांनाही मतदानाचा अधिकार देण्यात आलेला आहे. अत्यंत पद्धतशीरपणे मुंबईची वाट लावण्याचे, येथे परप्रांतीय घुसवण्याचे काम सुरू आहे. फूटपाथवर राहणाऱ्या लोकांना मतदानाचा अधिकार दिला जातो. त्यालाही आधार कार्ड पोस्टाने पाठवले जाते हे कसे घडते? यामागे अनेक संस्था पद्धतशीरपणे काम करत आहेत. येथे मतदानाचा अधिकार मिळाला, रेशनकार्ड मिळाले की घर मिळेल आणि एकदा घर मिळाले की आपला मतदारसंघ तयार होईल असे हे मुंबई तोडण्याचे षड्यंत्र सुरू आहे. मराठी लोकांना राजकारणातून हद्दपार करण्याचे हे काम आहे. मी जे बोलतो ते भविष्यात खोटे ठरले तर राजकारण सोडून देईन.
रोहन टिल्लू - उत्तर प्रदेशातील लोकांप्रमाणेच जैन लॉबी येथे कार्यरत आहे, ते आपल्या सोसायटय़ांमध्ये मराठी माणसाला जागा देत नाहीत..
राज ठाकरे- त्यांनी जर उत्तर प्रदेशच्या नेत्यांप्रमाणे राजकारण सुरू केले तर मी त्यांच्या विरोधातही उभा राहीन. जैन लोकांच्या सोसायटय़ांमध्ये मराठी माणसाला घर नाकारले जाते याकडेही माझे लक्ष आहे. एके दिवशी माझ्या स्टाईलने तोही विषय हाताळीन.
कैलास कोरडे-  मुंबईसाठी स्वतंत्र सीईओ असावा, मुंबई महापालिकेचे विभाजन व्हावे असे मुद्दे वेळोवेळी येत असतात. आपले काय मत आहे?
राज ठाकरे- मुंबईसाठी स्वतंत्र सीईओची अथवा पालिकेच्या विभाजनाची कोणतीही आवश्यकता नाही. महापालिका व राज्य शासन यांच्यात चांगला समन्वय असले तर मुंबईचे प्रश्न सोडविण्यात कोणतीही अडचण येणार नाही. त्याचप्रमाणे दोन महापालिकांची कोणतीही गरज नाही.
गिरीश कुबेर- पश्चिम बंगालमध्ये ममता, दक्षिणेत करुणानिधी हेही टोकाचे प्रांतीयवाद जपतात मात्र त्यांना कोणी संकुचित म्हणत नाही आणि इथे मात्र तुम्हाला संकुचित म्हटले जाते, असे का होते?
राज ठाकरे- याचे कारण महाराष्ट्र आणि गुजरात हे दोनच प्रांत भौगोलिकदृष्टय़ा देशाच्या मध्ये लटकलेले आहेत. त्यामुळे ना आम्हाला उत्तरेतील आपले मानतात ना दक्षिणेतील विचारतात. साधी गोष्ट लक्षात घ्या, राजीव गांधी यांच्या मारेकऱ्याला फाशी न देण्याचा ठराव तामिळनाडू विधानसभेत मंजूर होतो आणि त्यांना कोणी बोलत नाही.. तेव्हा थोबाडे बंद होतात. तो ओमर अब्दुल्ला काश्मीरच्या विधानसभेत अफजल गुरूला फाशी देऊ नका असे सांगतो आणि कोणी आवाजही काढत नाही. अन्य लोकांनी त्यांच्या प्रांतिक गोष्टी मांडल्या तर त्यांना कोणी विचारत नाही. आम्ही महाराष्ट्रात या गोष्टी मांडल्या की दुर्दैवाने आमचेच लोक आम्हाला जाब विचारतात.
प्रशांत दीक्षित- जे प्रादेशिक पक्ष मग तो शिवसेनाही असेल राष्ट्रीय बनायला निघाले की संपू लागतात, असे का होते?
राज ठाकरे- प्रत्येकजण आपली प्रादेशिक भावना जपत आला आहे. महाराष्ट्र काही बोलला की त्याला टोचून बोलायचे हाच उद्योग दिल्लीसह सारे करतात. माझ्या आंदोलनानंतर देशातील अनेक राज्यातील लोकांनी माझ्या भूमिकेचे समर्थन केले आहे. बाहेरच्या राज्यातील लोक तुम्हाला हिंग लावून विचारत नाहीत, तेव्हा तुमचे तुम्हालाच ठाम उभे राहण्याची गरज आहे.
संदीप आचार्य- अण्णा हजारे यांच्या लोकपाल आंदोलनावरून बाळासाहेबांनी त्यांच्या बऱ्याच टोप्या उडवल्या. तुमचे अण्णांच्या आंदोलनाविषयी काम मत आहे?
राज ठाकरे- अण्णांच्या आजूबाजूची चौकडी ही माझ्यासाठी एक गूढच आहे. त्यांना नक्की काय करायचे आहे ते कळत नाही. त्यामुळेच पहिल्यांदा दिल्लीला जो प्रतिसाद त्यांना मिळाला तसा तो नंतर मिळाला नाही. मुळात लोकांचे प्रश्न आणि अण्णांच्या आंदोलनाचा काही संबंध नव्हता. सुरुवातीला लोकांना काही कळलेच नाही, आता अण्णा आले म्हणजे भ्रष्टाचार संपणार. नंतर अण्णांनाच कळेना काय संपणार! एखाद्या गोष्टीच्या किती अधीन व्हायचे हे समजले पाहिजे. भ्रष्टाचारावर नियंत्रण येणे गरजेचे आहे. मात्र लोकपाल ते किती यशस्वी करू शकेल हे मी आज सांगू शकत नाही.
गिरीश कुबेर- अण्णांचे आंदोलन हे मराठी माणसाचे प्रतीक वाटते की अमराठी माणसांच्या हातात गेलेले आंदोलन वाटते?
राज ठाकरे-  त्यांच्या आंदोलनाकडे मराठी-अमराठी असे पाहून चालणार नाही. अण्णा मराठी आणि बेदी अमराठी अशी वर्गवारी करता येणार नाही. काय आहे, लोकांचा मिळालेला प्रतिसाद आणि त्यानंतर तुम्ही कसे वागता याकडे लोक बारकाईने पाहत असतात. किरण बेदी व अन्य लोक ज्याप्रकारे नंतर वागत होते त्याला वाह्य़ातपणा म्हणतात. यश व प्रसिद्धी पचवायची ताकद लागते. नाहीतर आज जे अण्णांचे झाले ते होऊ शकते.
विनायक परब- तुम्ही ‘जे जे स्कूल’चे विद्यार्थी, आजची त्याची अवस्था अत्यंत खराब आहे. त्यासाठी तुम्ही काही करणार का?
राज ठाकरे- ‘जेजे रंजले गांजले’अशी म्हण आहे त्याऐवजी ‘जेजे स्कूल गंजले’ असे म्हणावे लागेल. सरकारने ‘जेजे’ची वाट लावली आहे. आज अशा अनेक चांगल्या संस्थांच्या जमिनीवर सरकारमधील लोकांचा डोळा आहे. जेजे स्कूलचे सरकारनियुक्त एक डीन होते. त्यांनी अनेक नामवंत कलावंतांनी काढलेली पेंटिंग अक्षरश: धुतली व वाळत घातली. हा डीन सरकारचा कर्मचारी. गायतोंडे यांच्यासारख्या विख्यात चित्रकाराचे पेंटिंग फ्रेममध्ये बसत नाही, म्हणून फाडले. अशा गोष्टी होणार असतील तर चांगल्या खाजगी लोकांच्या हाती ही संस्था गेली तर बिघडले कोठे?
स्वाती खेर- तुम्ही नेहमी म्हणता की, उमेदवारांवर तुमचा वचक असेल पण तुमच्या  नगरसेवकांची उपस्थिती सर्वात कमी होती. तुमचे नगरसेवक सभागृहातच येत नाहीत तर तुम्ही वचक कसा ठेवणार?
राज ठाकरे- मी ही गोष्ट लक्षात घेऊन आमदारांसाठी तीन वेळा सह्य़ा करणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे विधानसभेत माझे आमदार सही केली आणि गेले असे आता होत नाही. त्याचप्रमाणे पालिकेतील नगरसेवकांवरही योग्य वचक ठेवला जाईल. माझ्या नगरसेवकांकडून काही चुका झाल्या नाहीत असे मी म्हणणार नाही. पक्ष नवीन असतो अनेक गोष्टी नव्याने सामोऱ्या येतात. मात्र एक गोष्ट मी ठामपणे सांगतो यापुढे अशी गोष्ट होणार नाही, याची ठाम खात्री देतो. जशी आता परीक्षा घेतली तशीच निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचेही दर तीन महिन्यांनी प्रशिक्षण वर्ग घेतले जातील. यातून माझे लोकप्रतिनिधी अधिक कार्यक्षम होतील.
गिरीश कुबेर-  एम.एफ. हुसेन यांच्या मृत्यूनंतरही काही लोकांनी त्यांना विरोध केला.  त्याच वेळी पंढरपूर येथे सरकारी इतमामात हुसेन यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची भूमिका तुम्ही मांडलीत..?
राज ठाकरे- एम.एफ. हुसेन यांना माझा कधीच विरोध नव्हता. ते एक उत्तम चित्रकार होते. त्यांनी जी (हिंदू देवदेवतांची) चित्रे काढली ती काढली नसती तर बरे झाले असते. प्रत्येक देशाची एक संस्कृती असते. हुसेन हे मोठे चित्रकार होते त्यांनाही भारतीय संस्कृतीची कल्पना होती त्यामुळे त्यांनी असली चित्रे काढण्याचे टाळायला हवे होते. भारतात जिथे धार्मिक वातावरण आहे अशा ठिकाणी हिंदू देवदेवतांची विचित्र चित्रे काढली तर काय होईल, याची कल्पना हुसेन यांनी बाळगायला हवी होती. पण म्हणून त्यांचे अंत्यसंस्कारही भारतात होऊ देणार नाही असे म्हणणे सर्वस्वी गैर होते. म्हणून पंढरपूर येथे सरकारी इतमामात हुसेन यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची भूमिका मी मांडली


मोगलाई असल्याचा सत्ताधाऱ्यांचा भ्रम मोडून काढा- राज ठाकरे

मोगलाई असल्याचा सत्ताधाऱ्यांचा भ्रम मोडून काढा- राज ठाकरे



प्रतिनिधी, पुणे, रविवार, १२ फेब्रुवारी २०१२
altठराविक उद्योजकांना फायदा देण्यासाठी पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारली जात नाही. शहरात शिक्षणाचा धंदा सुरू असून, हे शहर विद्यानगरी नव्हे, तर डोनेशननगरी झाली आहे.
येथील सत्ताधारी मात्र केवळ जमिनी विकत घेणे व पैसे कमाविण्याचे काम करीत आहेत. काहीही केले तरी मतदान होते, येथे आमची मोगलाई आहे, हा सत्ताधाऱ्यांचा भ्रम मोडल्याशिवाय ते वठणीवर येणार नाहीत, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी व काँग्रेसवर तोफ डागली.
पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांची आज सभा झाली. शहरातील विविध प्रश्नांना हात घालत सत्ताधाऱ्यांवर प्रहार केला. उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुरेश कलमाडी यांचाही त्यांनी समाचार घेतला. त्याचप्रमाणे गुजरातमधील विकासकामांचे नेहमीप्रमाणे कौतुक करीत आपला महाराष्ट्र व शहरात तसा विकास का होऊ शकत नाही, असा प्रश्न करीत शहरे चांगली करणे ही माझी पॅशन असून, त्यासाठी महापालिकेत सत्ता द्या, असे आवाहन केले. अजित पवारांचा उल्लेख करून ठाकरे म्हणाले की, पवार म्हणतात आमच्या हातात सत्ता द्या, तरच कामे करू. त्यांच्या हातात राज्य आहे, तरी शहरांची वाताहात का झाली? पवार व पृथ्वीराज चव्हाण यांचे विमान २५ हजार फुटांवरून चालले आहे. राज्य हातात असताना त्यांना पालिका हवी आहे. कामे कशी केली जातात, यासाठी त्यांना नरेंद्र मोदींकडे शिकायला पाठविले पाहिजे. आमच्या सत्ताधाऱ्यांना केवळ त्यांच्या जमिनी वाढविण्यात रस आहे. पुण्यात अनेक प्रकल्प रखडले आहेत. ठराविक उद्योगपतींची वाहने विकण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. टेकडय़ांवर अतिक्रमणे होत आहेत. नदीच्या प्रदूषणात वाढ होते आहे. दादोजी कोंडदेव यांचा पुतळा उचलताना मोठा पोलीस बंदोबस्त घेतला जातो. असा बंदोबस्त घेऊन अनधिकृत बांधकामे का पाडली जात नाहीत? परदेशातून, बाहेरच्या राज्यातून येणाऱ्यांसाठी येथे कॉलेज निघते, पण तुमच्या-आमच्यासाठी नाही. हे सर्व सत्ताधारी केवळ पाहत बसतात.
‘निवडणुकीच्या तोंडावर कलमाडी सुटले कसे?’
मुंबईतील मैदानावर सभा घेण्यास न्यायालयाने परवानगी नाकारल्याचा विषय राज ठाकरे यांनी पुन्हा छेडला. ते म्हणाले,‘‘निवडणुकीच्या सभेसाठी परवानगी नाकारली जाते. पण, निवडणुकीच्या तोंडावर सुरेश कलमाडी सुटतात कसे? कसाब, अफजल गुरूचा निकाल लागत नाही, पण राज ठाकरेला परवानगी द्यायची की नाही, यावर तत्काळ निर्णय होतो.’’ कलमाडी पुण्यात आल्यानंतर झालेल्या स्वागताबाबत ते म्हणाले,‘‘स्वातंत्र्यवीर सावरकरच आले आहेत, असे त्यांचे स्वागत झाले. देशासाठी काही केले म्हणून नाही, तर गैरव्यवहार केला म्हणून ते तुरुंगात होते.’’  

राजची मोटार ‘नो पार्किंग’मध्ये
गुजरातमध्ये मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची मोटार बीआरटीमधून जात नसल्याचे जाहीर भाषणात सांगत त्यांचे कौतुक करणाऱ्या राज ठाकरे यांची मोटार मात्र शनिवारी बराच काळ वाहने उभी न करण्याच्या जागी उभी असल्याने वाहतुकीचा नियम मोडला गेला. त्यासाठी पोलिसांनी दंडही वसूल केला. फग्र्युसन रस्त्यावरील वैशाली हॉटेलसमोर ‘नो पार्किंग’मध्ये दुपारी हा प्रकार घडला. राज यांच्या मोटारचालकाकडून शंभर रुपये दंड जमा करण्यात आला

सत्ताधाऱ्यांचा भ्रम घालवा -राज ठाकरे

सत्ताधाऱ्यांचा भ्रम घालवा -राज ठाकरे
- सकाळ वृत्तसेवा
Sunday, February 12, 2012 AT 01:30 AM (IST)
 
पुणे - गेल्या पाच वर्षांत राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, शिवसेना-भाजप यांनी पुण्यात एकमेकांच्या साथीत सत्ता भोगत महापालिकेला पत्त्याचा क्‍लब केला आहे. काहीही केले तरी मते मिळतात, हा सत्ताधाऱ्यांचा भ्रम घालविला तरच ते वळणावर येतील, असे स्पष्ट मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे व्यक्त केले. माझ्या हातात सत्ता दिली तर "चांगल्या शहरात राहत आहोत', अशी भावना तुमच्या मनात निर्माण करून दाखवेन, अशी ग्वाही त्यांनी दिली.

महापालिका निवडणूक प्रचारासाठी मुठा नदीपात्रात राज ठाकरे यांची सभा झाली. सभेला मोठी गर्दी होती, युवकांची संख्या त्यामध्ये लक्षणीय होती. राज्याचा विकास करण्याचे प्रशिक्षण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींकडून घ्यावे, असे सांगून ते म्हणाले, ""मोदींप्रमाणेच व्यावसायिक दृष्टिकोन ठेवणाऱ्या पक्षाला पाठिंबा देऊ. राज्यातील मंत्र्यांमध्ये जागा खरेदीची स्पर्धा लागली असून काहीही केले तरी मते मिळतात, हा सत्ताधाऱ्यांचा भ्रम घालविला तरच ते वळणावर येतील.'' निवडणूक स्वतंत्रपणे लढवायची आणि सत्तेसाठी पुन्हा एकत्र यायचे असा कॉंग्रेस, "राष्ट्रवादी'चा प्रकार आहे. मुंबईत त्यांची आघाडी आणि पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये नाही. शिवसेना-भाजप-आरपीआय यांची महायुती नसून अडीच युती आहे.

राज्यात आघाडीची सत्ता असणाऱ्यांना शहराचा विकास का करता आला नाही? बीआरटी योजनेवर 982 कोटी रुपये खर्च करून पुणेकरांना काय मिळाले? महापालिकेची सत्ता माझ्या हातात दिली तर विकास काय असतो ते दाखवून देतो. पाच गोष्टींना मी प्राधान्य देणार आहे, त्या काय असतील ते लवकरच जाहीर करणार आहे. तो माझा वचकनामा असेल. टक्केवारीत नाही तर शहर चांगले करण्यात मला रस आहे. त्यामुळे मनसे हा नवीन पर्याय असून त्याचा विचार करा, असे आवाहन त्यांनी केले.

पुण्यात शिक्षण संस्थांनी धंदा मांडल्याने विद्येची नगरी "डोनेशन'नगरी झाली आहे, असे सांगत त्यांनी सिम्बायोसिसचे शां. ब. मुजुमदार यांच्यावर टीका केली. वाहन उद्योगपतींच्या फायद्यासाठी पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा खेळखंडोबा केला गेल्याचा आरोप करीत ठाकरे यांनी उद्योगपती राहुल बजाज यांचे नाव घेतले.

कलमाडी कसे सुटले?
तुरुंगातून सुटलेल्या खासदार सुरेश कलमाडी यांचे पुण्यात झालेल्या स्वागतावर ठाकरे यांनी टीका केली. चीनमध्ये पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत गैरव्यवहार करणाऱ्या बीजिंगच्या महापौराला झालेल्या शिक्षेचे उदाहरण देत ठाकरे म्हणाले, आपल्या देशात कलमाडी नऊ महिन्यांत बाहेर आले. प्रचारसभेकरिता जागा देण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी नाकारली; पण महापालिका निवडणुकीच्या वेळीच कलमाडी यांना जामीन कसा मिळाला? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला

शुक्रवार, 10 फ़रवरी 2012

अजितदादांनी केला पुण्याचा विचका - राज ठाकरे

अजितदादांनी केला पुण्याचा विचका - राज ठाकरे
- सकाळ वृत्तसेवा
Saturday, February 11, 2012 AT 02:00 AM (IST)
  
पुणे - भाजप-शिवसेना आणि नंतर कॉंग्रेस अशी सर्व प्रकारच्या पक्षांशी आघाडी करणाऱ्या अजितदादांनी शहराचा विचका केला असल्याची टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी "सकाळ'ला खास मुलाखत देताना केली.

"राज्यातील सर्व शहरांचे मूलभूत प्रश्‍न उग्र बनले असून, त्याकडे राज्यकर्त्यांना लक्ष देण्यास वेळ नाही. त्यामुळे शहरे वाढली म्हणजे त्यांना सूज आलेली आहे. वाहतूकयंत्रणा आणि अन्य सुविधांमध्ये वाढ न होता केवळ इमारतीच वाढल्या आहेत. अशा विकासाला परवानगी दिलीच कशी जाते,' असा सवाल ठाकरे यांनी केला.

""शहरातील पंधरा टक्के जागा रस्त्यांसाठी असली पाहिजे; मात्र प्रत्यक्षात केवळ सहाच टक्के जागा रस्त्यांसाठी मिळाली आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होणारच. सार्वजनिक वाहतूक यंत्रणा सुधारली पाहिजे; मात्र वाहन उत्पादक कंपन्या हे होऊच देत नाहीत. पैसे पेरून सार्वजनिक वाहतूक यंत्रणा दुबळी कशी राहील, ते पाहिले जाते,'' असा आरोपही ठाकरे यांनी केला. "बीआरटीसारखी योजना गुजरातमध्ये कशा प्रकारे राबविली जात आहे ते पाहा,' असे आवाहनही त्यांनी केले.
""पुणे हे विद्येचे माहेरघर आहे; पण ही विद्या इथल्याच विद्यार्थ्यांना द्या, बाहेरून विद्यार्थ्यांना बोलावून त्यांना विद्या देऊ नका,'' असे मत ठाकरे यांनी व्यक्त केले. अशा गोष्टींमुळे पुण्याची लोकसंख्या वाढत असून, पाण्यासारख्या नागरी सुविधा अपुऱ्या पडत आहेत. "एसटी ही आपल्या राज्यासाठी असेल तर मग पुणे-उदयपूर बस का सुरू केली जाते,' असा सवालही त्यांनी केला.

पुण्याकडे अजित पवारांचे लक्ष नसल्याचा आरोप करून ठाकरे म्हणाले, की त्यांचे लक्ष दुसरीकडेच कुठेतरी असते. मुळा-मुठा नदीचे घाणेरडे स्वरूप कसे बदलणार, याचा आराखडा राज्यकर्त्यांनी केला आहे; मात्र तो लोकांना कधी दाखवणार ? त्यांचे म्हणणे कधी ऐकणार? केवळ पैसे मंजूर केले जातात; प्रत्यक्ष काय होणार, ते कोणाला माहीत नसते. कचरा डेपोचा प्रश्‍न आपल्याकडेच का निर्माण होतो ? परदेशात दुर्गंधी न पसरता कचरा डेपो उभारला जातो. असे असेल तर मग आपणच काय घोडे मारले आहे ? आपल्याकडे असे तंत्रज्ञान आणले पाहिजे.

गुजरातप्रमाणे आपल्या राज्याचा विकास करायचा असेल तर मनसेकडे राज्याची आणि महापालिकांची एकहाती सत्ता सोपवा असे आवाहन करून ठाकरे म्हणाले, की गुजरातमध्ये राज्य आणि महापालिका यांच्यात उत्तम समन्वय आहे. सातत्याने हे पक्ष निवडून येत असल्याने ते मतदारांना गृहीत धरतात. तेच तेच राजकारणी मतदारांनी आता नाकारावेत. मनसेला संधी दिल्यास आतापर्यंत रखडलेली कामे किमान सुरू केली जातील, असे आश्‍वासन आपण देतो, असेही ठाकरे यांनी सांगितले

गुरुवार, 9 फ़रवरी 2012

छोट्या सभा राज ठाकरेंना अमान्य

छोट्या सभा राज ठाकरेंना अमान्य
- सकाळ वृत्तसेवा
Friday, February 10, 2012 AT 01:15 AM (IST)
  
मुंबई - मुंबईत ठिकठिकाणी सभा घेऊन वातावरणनिर्मितीच्या प्रस्तावाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे अनुकूल नसून घणाघाती हल्ल्याची जाहीर सभा हाच अजूनही त्यांचा पसंतीक्रम असल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिवाजी पार्कवरील सभेची उरलीसुरली शक्‍यताही संपुष्टात आल्याने राज ठाकरे यांच्या वक्‍तृत्वाची आतषबाजी नेमकी कुठे होईल, याबद्दल मुंबईत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

मनसेच्या काही नेत्यांनी रोड शोपाठोपाठ मुंबईच्या वेगवेगळ्या भागात सभा घेत वातावरण निर्मितीचा प्रस्ताव राज यांच्यासमोर ठेवला होता. जांबोरी मैदानावर सभा घेण्यावर विचार सुरू असतानाच ते क्षेत्रही सायलेन्स झोनमध्ये येत असल्याचे मनसेतर्फे सांगण्यात आले. शिवसेना भवनासमोर वाहतुकीची कोंडी होईल, हे कारण पुढे करत पोलिस खात्याने परवानगी नाकारल्यानंतर दादरच्याच पोर्तुगीज चर्चसमोर सभा घ्यावी काय, असा विचारही पुढे आला आहे. या भागात सभा होऊ शकेल, असे पोलिस खात्याने स्पष्ट केले आहे.

सभेबाबत आपली कोंडी केल्याचे विधान राज यांनी केल्यानंतर "कृष्णकुंज'च्या गच्चीवरून भाषण करण्याचा थिंक टॅंकने पुढे केलेला प्रस्ताव ते कदाचित अमलात आणतील आणि होणाऱ्या सविनय कायदेभंगाचा मनसेला फायदा होऊ शकेल, असेही बोलले जात आहे. ही शक्‍यता प्रत्यक्षात आणली तर जनतेवर दृश्‍य परिणाम साधला जाईल काय, अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे. मनसेच्या प्रमुख नेत्यांशी संपर्क साधला असता सभेविषयीचा नेमका निर्णय काय आहे याची आपल्याला अद्याप माहिती नसल्याचे सांगण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्यास गेलेले मनसे आमदार नितीन सरदेसाई यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी रात्री उशिरा आपण दिल्लीहून मुंबईत परतू, असे सांगितले. विधानसभा निवडणुकीप्रमाणे राज ठाकरेंनी मुंबईच्या वेगवेगळ्या भागात सभा घ्याव्यात, असे काही नेत्यांनी सुचवले आहे. मात्र अपुरा वेळ लक्षात घेता, अशा सभा होऊ शकत नाहीत. शिवाय राज यांच्याविषयीचे वलय लक्षात घेता, त्यांचा भर मोठ्या सभेवरच असेल, असे सांगण्यात आले. रात्री उशिरा राज नाशिकचा दौरा करून मुंबईत परतले. सभेचा निर्णय ते उद्यापर्यंत घेतील, असे सांगण्यात आले.

आता जनतेच्या न्यायालयात मागणार न्याय- राज ठाकरे -

आता जनतेच्या न्यायालयात मागणार न्याय- राज ठाकरे
- सकाळ वृत्तसेवा
Friday, February 10, 2012 AT 01:30 AM (IST)
  
नाशिक - सर्वोच्च न्यायालयात कायद्याबाबत न्याय मिळेल, अशी अपेक्षा होती. पण तसे झाले नाही. त्यामुळे आता निवडणुकीच्या माध्यमातून जनतेच्या न्यायालयात न्याय मागणार आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.

नाशिक महापालिका निवडणुकीसाठी मनसेतर्फे आज राज ठाकरे यांच्या रोड शोद्वारे श्रीगणेशा झाला. श्री. ठाकरे यांनी "रोड शो'दरम्यान मनसेच्या उमेदवारांच्या प्रचार कार्यालयांना भेटी देत, मतदारांना आवाहन केले. महात्मानगर, रामवाडी, मेन रोड, पंचवटीसह विविध भागांत जोरदार स्वागत झाले. सकाळी अकरापासून सुरू असलेल्या या "रोड शो'दरम्यान दुपारी ते पत्रकारांशी बोलले.

महापालिका निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी मुंबई उच्च न्यायालयाने शिवाजी पार्क मैदानास परवानगी नाकारल्याने मनसने उच्च न्यायालयाच्या निर्णयास सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तेथेही निर्णय कायम राहिल्याने नाशिकला "रोड शो'दरम्यान श्री. ठाकरे म्हणाले, की उच्च न्यायालयात नाही तर सर्वोच्च न्यायालयात दाद मिळेल या आशेने सर्वोच्च न्यायालयात परवानगी मागितली होती. निदान तेथे तरी न्याय मिळेल, अशी अपेक्षा होती. पण सगळीकडून कोंडी सुरू आहे. न्यायालयाच्या निर्णयाबाबत काही म्हणायचे नाही. आता जनतेच्या न्यायालयातच न्याय मागू.

दिवसभराच्या दौऱ्यात श्री. ठाकरे यांनी शहरातील सर्व प्रभागांतील मनसे उमेदवारांच्या कार्यालयाला भेटी दिल्या. रोड शोदरम्यान ठिकठिकाणी जमलेली गर्दी पाहता लोकांना आकर्षित करण्याचा राज करिश्‍मा दिसला. रामवाडी, मेन रोड भागात शिवसेनेच्या नेत्यांच्या कार्यालयासमोर रोड शो सुरू असताना चुरसही होती

मनसेला सभेसाठी शिवाजी पार्कचे दार बंद

मनसेला सभेसाठी शिवाजी पार्कचे दार बंद
- सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, February 10, 2012 AT 01:45 AM (IST)
मुंबई - उच्च न्यायालयाने ध्वनिप्रदूषणाच्या मुद्यावरून मनसेला शिवाजी पार्कमध्ये सभा घेण्यास मनाई केली आहे. त्याबाबत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात मनसेने केलेले अपील सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळले. त्यामुळे मनसेसाठी शिवाजी पार्कचे दरवाजे बंद झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिवाजी पार्कवर 13 फेब्रुवारीला जाहीर सभा घेण्यासाठी मनसेने मोर्चेबांधणी करून महापालिकेकडून परवानगी मिळवण्यासाठी 35 अर्ज दाखल केले होते. महापालिका निवडणुकीसाठी शिवाजी पार्क मिळण्याची शक्‍यता कमी असल्याने शिवसेनेने आधीच वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानाची निवड केली होती.

मनसेला शिवाजी पार्कवर सभा घेण्यास नकार देत महापालिकेने त्यासाठी ध्वनिप्रदूषणाबाबतच्या नियमांचा आधार घेतला होता. त्याविरोधात मनसेने उच्च न्यायालयात धाव घेतली; पण तेथेही नकारच मिळाला. त्याबद्दल राज यांनी जाहीरपणे नाराजी प्रकट केली होती. सभा मैदानात घ्यायच्या नाहीत, तर कुठे घ्यायच्या, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला होता. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला एक न्याय; आणि मनसेच्या सभेला दुसरा न्याय लावला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला होता. राज्य सरकारही शिवसेनेला साथ देत असल्याने रस्त्यावरच सभा घेऊ, असा इशारा त्यांनी दिला आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानात जाहीर सभा घेण्याची शक्‍यता त्यांनी फेटाळली होती.

शिवाजी पार्कवर जाहीर सभेची अनुमती द्यावी, अशी मागणी मनसेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिकेद्वारे केली होती. त्यासाठी आमदार नितीन सरदेसाई यांनी प्रयत्न चालवले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केल्याने मनसेची पंचाईत झाली आहे.

पर्याय शोधण्याकडे दुर्लक्ष?
राज ठाकरे यांच्या सभेच्या ठिकाणाबाबत गेले काही दिवस केवळ मनसेतच नाही, तर सर्व पक्षांमध्ये तर्कवितर्क लढवले जात आहेत. कृष्णकुंजनजीक, पोर्तुगीज चर्चसमोर, जांबोरी मैदानात अशा पर्यायांवर चर्चा सुरू आहेत. मात्र, "मी बोलेन तेथे लोक जमा होतील', असा आत्मविश्‍वास राज यांनी व्यक्त केला असून सभेचे स्थळ अद्याप गुलदस्त्यातच आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अवलंबून राहिल्याने शिवाजी पार्कला पर्याय शोधण्याकडे मनसेचे दुर्लक्ष झाले, असे बोलले जात आहे. आता महापालिकेचे मैदान मारण्यासाठी राज ठाकरे कोणत्या मैदानाची निवड करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

सर्वोच्च न्यायालयाने मनसेची याचिका फेटाळली

सर्वोच्च न्यायालयाने मनसेची याचिका फेटाळली
- वृत्तसंस्था
Thursday, February 09, 2012 AT 05:51 PM (IST)

नवी दिल्ली - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) शिवाजी पार्कच्या मैदानावर सभा घेण्यासाठी मागितलेली परवानगी सर्वोच्च न्यायालयाने आज (गुरुवार) फेटाळून लावली.

उच्च न्यायालयाने परवानगी नाकारल्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

16 एप्रिल रोजी होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी ठाकरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात परवानगी मागणारी याचिका दाखल केली होती. मात्र, उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली होती. त्यामुळे ठाकरे यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. याचिका फेटाळून लावताना सर्वोच्च न्यायालय म्हणाले, की ही प्रशासकीय पातळीवर घेतला जात असल्याने न्यायालय याबाबत कोणताही निर्णय देऊ शकत नाही

सुप्रीम कोर्टात जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न - राज

सुप्रीम कोर्टात जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न - राज
- सकाळ वृत्तसेवा
Thursday, February 09, 2012 AT 02:00 AM (IST)

पुणे - ""सभेसाठी शिवाजी पार्कचे मैदान मिळू शकणार नाही, या उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाची प्रत पाच दिवसानंतरही मिळालेली नाही.
यातून, सर्वोच्च न्यायालयात जाण्यास रोखण्याचा प्रयत्न दिसतो,'' असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
"रोड शो'मुळे आचारसंहितेचा भंग झाल्याच्या प्रश्नावर त्यांनी "निवडणूक आयोगाने 1995 पासून काय "शूटिंग' केले आहे, ते मला पाहायचेय. त्यात, किती जणांना शिक्षा झाली. अन्य कोणी निवडणुकीचे कायदे मोडले नाही का,' असे उत्तर दिले.

पुणे महापालिका निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ठाकरे यांचा "रोड शो' झाला. त्यानंतर, त्यांनी ही भूमिका मांडली. ते म्हणाले, ""आज गल्ली बोळात रुग्णालये झाली आहेत. प्रत्येक ठिकाणी "सायलेन्स झोन' केला, तर सभा, कार्यक्रम घ्यायचे कोठे? निवडणुकीच्या कालावधीत तरी जाहीर सभांना परवानगी मिळायला हवी. मैदान उपलब्ध करून द्यायचे नाही आणि रस्त्यावर सभा घेणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणे म्हणजे विचारस्वातंत्र्य व्यक्त करण्यावरच मर्यादा घालण्याचा प्रकार आहे. शिवाजी पार्क संदर्भात न्यायालयाने दिलेला निर्णय पटण्यासारखा नाही. कायद्याचा आणि या निर्णयाचा संबंध नाही. तसेच, राज्य सरकारने या संदर्भात न्यायालयात मांडलेली बाजू दुजाभाव करणारी आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर अद्यापही सही झालेली नाही. याबाबत काय बोलायचे?''

कोणाला परप्रांतीयांच्या मागे जायचे असेल तर त्यांनी जावे, मी मात्र मराठी माणसाच्या मागेच जाणार, असे ठाकरे यांनी एका प्रश्‍नाला उत्तर दिले. ते म्हणाले, ""महाराष्ट्रातील शहरातील मराठीचा टक्का कमी करण्याचे षड्‌यंत्र सुरू आहे. उत्तर प्रदेशातील निवडणुकीसाठी सध्या मुंबईतून रेल्वे भर भरून जात आहेत. ही लोक तिकडे जाऊन मतदान करणार आणि पुन्हा इकडे येऊन मतदान करणार आहेत. त्यांच्यावर कोणतेच बंधन नाही.''

माझे थोबाड पुरेसे आहे
पुण्यातील प्रचारासाठी माझे थोबाड पुरेसे आहे, असे राज ठाकरे यांनी एका प्रश्नावर सांगितले. "पुण्यात एकहाती सत्ता द्या,' या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मागणीवर त्यांनी "राज्य सरकारमध्ये असताना विकासकामे करण्यासाठी त्यांना बहुमताची गरज काय,' असा सवाल केला. मुंबई, ठाणे, नाशिक व पुणे या शहरांचे काही मूळ प्रश्न आहेत. त्यात, मी हात घालणार आहे, असे ते म्हणाले.

रविवार, 5 फ़रवरी 2012

सेनेने फक्त ओरबाडण्याचा कार्यक्रम केला -राज ठाकरे

सेनेने फक्त ओरबाडण्याचा कार्यक्रम केला -राज ठाकरे
संजीव साबडे ः सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, February 06, 2012 AT 02:45 AM (IST)

मुंबई - शिवसेनेने मुंबईची अवस्था कशी करून टाकलीय हे सर्वच जण बघत आहेत. या मंडळींनी शहराला काहीच दिले नाही; मात्र ओरबाडले भरपूर. त्यांच्याकडे प्रचंड कल्पनादारिद्य्र आहे. आता बघा येणाऱ्या निवडणुकीत मनसेची सत्ता या शहरात येईल आणि कायापालट करून दाखवू आम्ही, अशा शब्दांत शिवसेनेचा समाचार घेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी निवडणुकीत आपणच विजयी होणार, असा विश्‍वास व्यक्त केला. "सकाळ'ला दिलेल्या मुलाखतीत अनेक प्रश्‍नांना त्यांनी ठाकरी शैलीत उत्तरे दिली.


----------------------------------------------------------------
जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, दै. सकाळने विविध राजकीय पक्षांतील नेत्यांच्या मुलाखती घेतल्या आहेत. या मुलाखतींमध्ये नेत्यांनी आपले परखड विचार व्यक्त केले आहेत. या मुलाखती ई सकाळ विशेष या सेक्शनमध्ये सलगपणे कधीही वाचता येतील.
----------------------------------------------------------------

प्रश्‍न : चार महापालिकांमध्ये सत्ता येईल, असे तुम्ही कशाच्या आधारे सांगता?
राज : मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक या चार महापालिकांवर आम्ही सुरवातीपासूनच लक्ष केंद्रित केले होते. गेल्या वेळीही तिथे आमचे नगरसेवक होते. पाच वर्षांच्या काळात त्या-त्या ठिकाणच्या सत्ताधाऱ्यांनी घातलेला गोंधळ मतदारांनी पाहिला आहे. शिवसेना, भाजप, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी त्या महापालिकांमध्ये काय केले, त्या शहरांची कशी वाट लावली, हेही मतदारांना माहीत आहे. मुळात जनतेचा मनसेवर निश्‍चित विश्‍वास
आहे. आम्ही सत्तेत आल्यावर शहरांना नवा आकार देऊ, शहरांमध्ये चांगले रस्ते, चांगली इस्पितळे, बागा, मैदाने, बस वाहतूक देणे यावर आम्ही भर देऊ. चारही महापालिकांत सत्ता मिळेल, असा माझा दावा आहे. चारही शहरांत सध्या बजबजपुरी माजली आहे. ती मनसेच दूर करू शकतो.

प्रश्‍न : तुमच्या पक्षाला मुंबईत किती जागा मिळतील?
राज : आम्ही सत्तेवरच येणार. त्यामुळे सत्ता मिळविण्यासाठी लागणाऱ्या जागा आम्हालाच मिळणार.

प्रश्‍न ः गेली अनेक वर्षे मुंबई महापालिकेत शिवसेना-भाजप युतीची सत्ता आहे? ती तुम्ही कशी मोडून काढणार?
राज ः अहो, त्यांनी गेल्या पंधरा वर्षांत शहराची बजबजपुरी केली आहे. रस्त्यांवर खड्डे, पिण्यासाठी स्वच्छ पाणी नाही, आरोग्य व्यवस्था कोलमडलेली, पुरेशी स्वच्छतागृहे नाहीत. यामुळे लोक कंटाळले आहेत. ते पर्यटकांना काय दाखवतात? राणीची बाग, गेट वे ऑफ इंडिया, मस्त्यालय आणि समुद्र. मुंबई वसलेलीच आहे आणि बाकी साऱ्या वास्तू ब्रिटिशकालीन आहेत. युतीने गेल्या पंधरा वर्षांत कोणती नवी वास्तू उभारली, ते सांगा. त्यांनी शहर ओरबाडून खाल्ले. करून दाखवले, करून दाखवले, अशा जाहिराती कसल्या करता?

प्रश्‍न : निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरचे मनसे अध्यक्ष व बऱ्याच पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.
राज : मला तेथील नेमकी माहिती नाही. पक्षात नाराजी असते. सर्वांना उमेदवारी देणे कोणालाच शक्‍य नसते. पण बंडखोरी असता कामा नये. तसे कोणी करीत असेल, तर मला त्यांची पर्वा नाही. त्यांनी खुशाल बाहेर जावे. निवडणुकीच्या तोंडावरच कशी नाराजी येते? पदे मिळाली तेही नाराज आणि न मिळाली, तेही नाराज? अर्थात या सर्वांतून मलाही कोण सच्चा, कोण कसा ते कळते आहे. बंडखोरी खपवून घेणार नाही.

प्रश्‍न : निवडणुका जाहीर झाल्यानंतर तुम्ही निवडणूक आयोग आणि आता मुंबई उच्च न्यायालयावरही टीका केली?
राज : अखेर निवडणूक आयोगाला एकाच दिवशी मतमोजणीचा निर्णय घ्यावाच लागला ना? खरे तर तो सुरवातीलाच घेतला असता, तर मला बोलायची वेळच आली नसती. हायकोर्टाने आम्हाला शिवाजी पार्कवर सभा घ्यायला परवानगी नाकारली. मग शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला परवानगी कशी मिळते? ती मिळावी, म्हणून आर. आर. पाटील आणि नोकरशाही का धावपळ करते?

प्रश्‍न : पण तो सांस्कृतिक कार्यक्रम असतो?
राज : ते काय मेळाव्यात सांस्कृतिक भाषणे करतात? त्या वेळी आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन केले तरी चालते? शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला म्हणे परंपरा आहे. अहो, पण शिवाजी पार्कलाही जाहीर सभांची परंपरा आहेच की. ती कशी विसरून चालेल? मुळात ते सार्वजनिक मैदान आहे की मनोरंजन उद्यान आहे, याचाच निर्णय हाय कोर्टाने दिलेला नाही. सायलेन्स झोन आहे, असे सांगतात. पण गल्लीऐवजी मैदानात फटाके उडवायला का संमती मिळते. जाणता राजा हा कार्यक्रमही तिथे झाला. सायलेन्स झोनमध्ये हे सारे कसे होऊ शकते? या साऱ्यांची उत्तरे न देता केवळ मनसेला स्वतःची ताकद दाखवता येऊ नये, म्हणून बंदी घालता की काय? तिथे राष्ट्रवादी वा कॉंग्रेस सभा घेऊ शकतच नाहीत. एक मी घेऊ शकतो आणि शिवसेना घेऊ शकते. अर्थात आमची सभा तिथे झाली नाही तर रस्त्यावरच होईल. मग लाखो लोकांना करा अटक हिंमत असेल तर.

प्रश्‍न : पण तुम्ही किती सभा घेणार आणि कुठे घेणार?
राज : माझे उद्यापासून रोड शो आहेत. चारही महापालिकांच्या शहरांत. नंतर 10 फेब्रुवारीला ठाणे, 11 ला पुणे,
12 तारखेला नाशिक आणि 13 फेब्रुवारीला मुंबईत सभा घेणार आहे. वेळही फार कमी आहे आणि मुंबईतील अन्य नेत्यांवर उमेदवार निवडून आणण्यासाठीची जबाबदारी टाकली आहे.

प्रश्‍न : उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे नेते आहेत आणि तुमचे चुलत बंधूही?
राज : एक मिनीट...! जो स्वत:च्या जिवावर, शब्दांवर लोकांना निवडून आणू शकतो, तोच खरा नेता. यांना तर आताही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याच सभा घ्याव्या लागतात. लोक निवडून येतात, ते बाळासाहेबांमुळे. ते महाराष्ट्राचे नेते आहेत. ते आणि शरद पवार. पण शरद पवारही निवडून आलेल्यांची मोळी बांधून त्याची दोरी स्वतःच्या हातात ठेवतात. सतत इतर पक्षांतील लोकांना फोडणे हा राष्ट्रवादीचा जणू कार्यक्रमच आहे. लोक फोडून पक्षाची ताकद वाढत नसते.

प्रश्‍न : पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, गोपीनाथ मुंडे यांच्याविषयी काय सांगाल?
राज : पृथ्वीराज चव्हाण सज्जन आहेत. पण त्यांचा महाराष्ट्राशी काही संबंध नाही. वरून आणून बसवलेले ते नेते. कामे होतच नाही त्यामुळे. अजित पवार यांना खळखळून किंवा नुसते हसतानाचा एकही फोटो मी पाहिलेला नाही. एककल्ली आहेत ते. त्यांच्यात धमक असू शकेल. पण आपल्या पक्षात आपण एकटेच आहोत आणि इतर कोणीच नाही, असे त्यांना वाटते. गोपीनाथ मुंडेंविषयी मी म्हणेन की चक्रव्यूहात असताना प्रत्येकाने स्वतःला "बर्ड आय व्ह्यू'मधून पाहणे गरजेचे असते. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी वेळ येते. लेझीम खेळताना दोन पाय पुढे, दोन पाय मागे टाकले जातात. त्यांना कोणी मागे येणे म्हणत नाही. कारण मिरवणूक पुढे जात असते.