छोट्या सभा राज ठाकरेंना अमान्य
- सकाळ वृत्तसेवा
Friday, February 10, 2012 AT 01:15 AM (IST)
मुंबई - मुंबईत ठिकठिकाणी सभा घेऊन
वातावरणनिर्मितीच्या प्रस्तावाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज
ठाकरे अनुकूल नसून घणाघाती हल्ल्याची जाहीर सभा हाच अजूनही त्यांचा
पसंतीक्रम असल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर
शिवाजी पार्कवरील सभेची उरलीसुरली शक्यताही संपुष्टात आल्याने राज ठाकरे
यांच्या वक्तृत्वाची आतषबाजी नेमकी कुठे होईल, याबद्दल मुंबईत प्रचंड
उत्सुकता निर्माण झाली आहे.मनसेच्या काही नेत्यांनी रोड शोपाठोपाठ मुंबईच्या वेगवेगळ्या भागात सभा घेत वातावरण निर्मितीचा प्रस्ताव राज यांच्यासमोर ठेवला होता. जांबोरी मैदानावर सभा घेण्यावर विचार सुरू असतानाच ते क्षेत्रही सायलेन्स झोनमध्ये येत असल्याचे मनसेतर्फे सांगण्यात आले. शिवसेना भवनासमोर वाहतुकीची कोंडी होईल, हे कारण पुढे करत पोलिस खात्याने परवानगी नाकारल्यानंतर दादरच्याच पोर्तुगीज चर्चसमोर सभा घ्यावी काय, असा विचारही पुढे आला आहे. या भागात सभा होऊ शकेल, असे पोलिस खात्याने स्पष्ट केले आहे.
सभेबाबत आपली कोंडी केल्याचे विधान राज यांनी केल्यानंतर "कृष्णकुंज'च्या गच्चीवरून भाषण करण्याचा थिंक टॅंकने पुढे केलेला प्रस्ताव ते कदाचित अमलात आणतील आणि होणाऱ्या सविनय कायदेभंगाचा मनसेला फायदा होऊ शकेल, असेही बोलले जात आहे. ही शक्यता प्रत्यक्षात आणली तर जनतेवर दृश्य परिणाम साधला जाईल काय, अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे. मनसेच्या प्रमुख नेत्यांशी संपर्क साधला असता सभेविषयीचा नेमका निर्णय काय आहे याची आपल्याला अद्याप माहिती नसल्याचे सांगण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्यास गेलेले मनसे आमदार नितीन सरदेसाई यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी रात्री उशिरा आपण दिल्लीहून मुंबईत परतू, असे सांगितले. विधानसभा निवडणुकीप्रमाणे राज ठाकरेंनी मुंबईच्या वेगवेगळ्या भागात सभा घ्याव्यात, असे काही नेत्यांनी सुचवले आहे. मात्र अपुरा वेळ लक्षात घेता, अशा सभा होऊ शकत नाहीत. शिवाय राज यांच्याविषयीचे वलय लक्षात घेता, त्यांचा भर मोठ्या सभेवरच असेल, असे सांगण्यात आले. रात्री उशिरा राज नाशिकचा दौरा करून मुंबईत परतले. सभेचा निर्णय ते उद्यापर्यंत घेतील, असे सांगण्यात आले.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें