सत्ताधाऱ्यांचा भ्रम घालवा -राज ठाकरे
- सकाळ वृत्तसेवा
Sunday, February 12, 2012 AT 01:30 AM (IST)
महापालिका निवडणूक प्रचारासाठी मुठा नदीपात्रात राज ठाकरे यांची सभा झाली. सभेला मोठी गर्दी होती, युवकांची संख्या त्यामध्ये लक्षणीय होती. राज्याचा विकास करण्याचे प्रशिक्षण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींकडून घ्यावे, असे सांगून ते म्हणाले, ""मोदींप्रमाणेच व्यावसायिक दृष्टिकोन ठेवणाऱ्या पक्षाला पाठिंबा देऊ. राज्यातील मंत्र्यांमध्ये जागा खरेदीची स्पर्धा लागली असून काहीही केले तरी मते मिळतात, हा सत्ताधाऱ्यांचा भ्रम घालविला तरच ते वळणावर येतील.'' निवडणूक स्वतंत्रपणे लढवायची आणि सत्तेसाठी पुन्हा एकत्र यायचे असा कॉंग्रेस, "राष्ट्रवादी'चा प्रकार आहे. मुंबईत त्यांची आघाडी आणि पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये नाही. शिवसेना-भाजप-आरपीआय यांची महायुती नसून अडीच युती आहे.
पुण्यात शिक्षण संस्थांनी धंदा मांडल्याने विद्येची नगरी "डोनेशन'नगरी झाली आहे, असे सांगत त्यांनी सिम्बायोसिसचे शां. ब. मुजुमदार यांच्यावर टीका केली. वाहन उद्योगपतींच्या फायद्यासाठी पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा खेळखंडोबा केला गेल्याचा आरोप करीत ठाकरे यांनी उद्योगपती राहुल बजाज यांचे नाव घेतले.
कलमाडी कसे सुटले?
तुरुंगातून सुटलेल्या खासदार सुरेश कलमाडी यांचे पुण्यात झालेल्या स्वागतावर ठाकरे यांनी टीका केली. चीनमध्ये पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत गैरव्यवहार करणाऱ्या बीजिंगच्या महापौराला झालेल्या शिक्षेचे उदाहरण देत ठाकरे म्हणाले, आपल्या देशात कलमाडी नऊ महिन्यांत बाहेर आले. प्रचारसभेकरिता जागा देण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी नाकारली; पण महापालिका निवडणुकीच्या वेळीच कलमाडी यांना जामीन कसा मिळाला? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें