मुंबई
- हिंदूंच्या सणात सर्वोच्च न्यायालय कायम हस्तक्षेप करत असते, अशी
टिप्पणी करत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोहरमचा सण कसा साजरा करावा हे
सांगण्याची प्राज्ञा दाखवाल का, असा प्रश्न आज केला. सर्वोच्च
न्यायालयाच्या निर्णयानंतर आज राज ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना मशिदीवर
ध्वनिक्षेपक चालतात, पण दहीहंडीचा सण साजरा करत येत नाही, अशी टीका केली.
राज्य सरकारने हिंदूंचा हा सण साजरा करण्यासाठी रीट याचिका दाखल करावी, अशी
मागणीही त्यांनी केली.
न्यायालयाने प्रत्येक गोष्टीत
हस्तक्षेप करायचा असेल, तर निवडणुका घेताच कशाला असा प्रश्न करीत त्यांनी
देश चालवायला घ्या, अशी टीकाही त्यांनी केली. दहीहंडीत काही गैरप्रकार आहेत
हे मान्य, पण ते दूर सारून सण साजरा व्हायलाच हवा, असेही त्यांनी नमूद
केले. दुपारी बोलावलेल्या पत्रपरिषदेत मराठी माणसाला नोकरीत प्राधान्य
द्या, या मुद्यापाठोपाठ त्यांनी हिंदुत्ववादाची भूमिका अत्यंत आक्रमकपणे
मांडली. न्यायालयाने डोके ठिकाणावर ठेवून निर्णय घ्यायला हवेत, अशी अपेक्षा
व्यक्त करून ते म्हणाले, की हिंदूधर्मीयांच्या सणात कायम काही आक्षेप
नोंदवायचे आणि मोहरमसारख्या सणांच्या मिरवणुका मात्र शांतपणे होऊ द्यायच्या
यात अर्थ नाही. दहीहंडीत तीन-चार वर्षांच्या मुलांना सहभागी करून घेणे
योग्य नाहीच; मात्र थर किती असावेत, त्यांनी काय करावे, आवाजाने
ध्वनिप्रदूषण कसे होते अशा विषयांवर बोलणे न्यायालयाच्या कार्यकक्षेत बसत
नाही याचे स्मरण ठेवणे उचित ठरेल. दहीहंडी मंडळांची कोणतीही भूमिका लक्षात न
घेता न्यायालयाने परस्पर निर्णय देणे हा तर आक्षेपार्ह प्रकार असल्याचेही
त्यांनी नमूद केले. आज दुपारी भूमिका स्पष्ट केल्यानंतर माजी आमदार बाळा
नांदगावकर यांच्या नेतृत्वात आलेल्या गोविंदा मंडळांचीही त्यांनी भेट
घेतली. दहीहंडी उत्सव मागील वर्षाप्रमाणेच व्हावा, त्यासाठी पुढाकार घेईन,
असे आश्वासन राज ठाकरे यांनी दिले.
राज ठाकरे उवाच
कानठळ्या बसवणारे संगीत नको
ढोलच्या गजरात सण साजरा करा
सुरक्षा उपाययोजना अंमलात आणा
सराव नसेल, तर थराचा अतिरेक नको
मंडळात सुसूत्रता आणण्यासाठी पुढाकार
राज ठाकरे उवाच
कानठळ्या बसवणारे संगीत नको
ढोलच्या गजरात सण साजरा करा
सुरक्षा उपाययोजना अंमलात आणा
सराव नसेल, तर थराचा अतिरेक नको
मंडळात सुसूत्रता आणण्यासाठी पुढाकार