गुरुवार, 15 मार्च 2012

नाशिकला उत्तम दर्जाचे शहर बनवू - राज ठाकरे

नाशिकला उत्तम दर्जाचे शहर बनवू - राज ठाकरे
- सकाळ वृत्तसेवा
Friday, March 16, 2012 AT 01:15 AM (IST)

नाशिक- नाशिक महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार, याचा मला ठाम विश्‍वास होता; तसे घडलेही. नाशिककरांनी मनसेच्या हाती सत्ता दिल्याने सत्तेतून नाशिकला उत्तम दर्जाचे शहर बनवू, असा शब्द मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिला.

महापालिकेत सत्ता स्थापन झाल्यानंतर मनसेच्या विजयात सहभागी होण्यासाठी राज ठाकरे खास विमानाने नाशिकला आले होते. प्रथम मनसे मुख्यालयात भेट दिल्यानंतर श्री. ठाकरे थेट महापौरांच्या "रामायण' निवासस्थानी आले. रामायण येथे पोचताच कार्यकर्त्यांच्या अंगात जोश संचारला. मनसेच्या विजयाच्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. रामायण बंगल्यावरून ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना अभिवादन केले. यानंतर ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. सर्वप्रथम त्यांनी भाजप नेत्यांचे आभार मानले. नाशिककरांनी टाकलेल्या विश्‍वासाला तडा जाऊ देणार नाही. शहरवासीयांनी दिलेली जबाबदारी समर्थपणे पेलू. नाशिकला उत्तम दर्जाचे शहर बनवून दाखवू. शिवसेनेच्या मनात काय आहे ते नाशिककरांनी पाहिले आहे. नागपूर महापालिकेत मुस्लिम लीगने भाजपला पाठिंबा दिल्यानंतर शिवसेनेने थयथयाट केला नाही; परंतु भाजपने मनसेला पाठिंबा दिल्यानंतर झालेल्या थयथयाटावरून मनसेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना कोणत्या थराला गेली आहे, हे समोर आले आहे, असे ते म्हणाले.

आधी किल्ले सुधारा!
अरबी समुद्रात शिवरायांचे स्मारक होणार नाही हा अंदाज मला यापूर्वीच होता. स्मारक बनविण्याआधी शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांचे जतन करणे गरजेचे आहे. किल्ल्यांची दुरवस्था झाली आहे. तेथील बिकट अवस्थेमुळे शिवप्रेमीसुद्धा जात नाहीत. त्यामुळे शिवस्मारक बनविण्याआधी शासनाने किल्ल्यांची दुरवस्था थांबवावी, असा सल्ला राज ठाकरे यांनी दिला.

जकात खासगीकरणाचा मुद्दा गुलदस्त्यात
महापालिका निवडणुकीत मनसेने सत्ता आल्यास सर्वप्रथम जकात खासगीकरण रद्द करण्याचे आश्‍वासन दिले होते. आज महापालिकेत मनसेचा महापौर झाल्यानंतर जकात खासगीकरण रद्द करणार का, या प्रश्‍नावर ठाकरे यांनी आजच माझ्या पोतडीतून सर्व काढून घेणार का, असा प्रतिप्रश्‍न करून जकात वसुलीच्या खासगीकरणाचा मुद्दा गुलदस्त्यात ठेवला आहे

मनसेने जिंकले नाशिक

मनसेने जिंकले नाशिक
- सकाळ वृत्तसेवा
Friday, March 16, 2012 AT 03:30 AM (IST)
  
मनसेने भुजबळांचा पाडाव करून नाशिक जिंकले हे खरे असले तरी नाशिककरांच्या या पक्षाकडून अपेक्षाही वाढल्या आहेत. टेंडरराज संपवण्यापासून ते शहराचा चौफेर विकास करण्यापर्यंत...

महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या नाशिकच्या महापौर निवडणुकीत अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) उमेदवार महापौरपदाच्या खुर्चीत विराजमान झाला. विधानसभा निवडणुकीत मनसेला तीन-तीन आमदार मिळवून देणाऱ्या नाशिकने सुवर्ण त्रिकोणात राहून प्रगतीची घोडदौड करणाऱ्या आपल्या शहराचे महापौरपदही देऊन टाकले. त्रिशंकू महापालिका अस्तित्वात आल्याने कोणत्याही एका पक्षाचा, महायुतीचा किंवा आघाडीचा महापौर स्वबळावर होणार नव्हता. आघाडीला महायुतीची किंवा महायुतीला आघाडीची मदत घ्यावी लागणार होती. अर्थात, ते घडणार नव्हते. त्यामुळे सर्वांत मोठा पक्ष असलेल्या मनसेनेही महापौरपद जिंकण्यासाठी व्यूहरचना आखली आणि तिची सुरवात ठाण्यातून झाली. शिवसेनेला तेथे मनसेने पाठिंबा दिला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदरासाठी जरी ही गोष्ट करण्यात असली, तरी या पाठिंब्याची वसुली नाशिकमध्ये होणार होती. सत्तेसाठी कशाही तडजोडी कराव्या लागतात. अलीकडच्या राजकारणात कोणतेही पक्ष अशा तडजोडी करतात. मनसे, शिवसेना आणि भाजपने नाशिकमध्येही तेच केले आहे. शिवसेनेने सभात्याग करून म्हणजेच अनुपस्थित राहून मनसेच्या इंजिनाचा मार्ग मोकळा केला. कॉंग्रेसने पराभवाची नाचक्की टाळण्यासाठी गैरहजर राहण्याचा, निष्क्रिय राहण्याचा मार्ग पत्कारला. भाजप आणि जनराज्यच्या मदतीने मनसेने महापौरपद पटकावले. यतीन वाघ हे मनसेचे पहिले महापौर ठरले आणि भाजपने महायुतीशी घटस्फोट घेऊन मनसेला दिलेल्या पाठिंब्याची किंमत उपमहापौर पदाच्या स्वरूपात वसूल केली. नियमाप्रमाणे महापौर होण्यासाठी एकशे बावीस सदस्यांच्या सभागृहात 62 सदस्यांची गरज असते; पण 63 सदस्यांनी मतदान केले नाही. त्यामुळे गरजेपेक्षा कमी म्हणजेच 56 मते मिळवून मनसेचा उमेदवार विजयी झाला. खरे म्हणजे शिवसेनेनेही एका अर्थाने गैरहजर राहून उपकाराची परतफेड केली, असेच म्हणावे लागेल. राजकारणात फेडाफेडीचे मार्ग मोठे विचित्र असतात. एखाद्याला पराभूत करून, विजयी करून, तोंड बंद करून, सभागृहात जाऊन अथवा बाहेर पडूनही उपकाराची परतफेड करता येते.

लोकशाहीचा व्यापक अर्थाने विचार केल्यास ज्यांना मतदारांनी महापौर निवडण्यासाठी विजयी केले होते, त्यांनी निवडीपासून दूर राहणे नैतिकदृष्ट्या योग्य आहे काय? अशा प्रकारे स्वार्थी वर्तन करून त्यांनी मतदारांचा विश्‍वासघात केला नाही काय? निवडून आलेल्यांपैकी निम्म्याहून अधिक म्हणजे 56 नगरसेवकांनीच 122 नगरसेवकांच्या शहरासाठी महापौर निवडला नाही काय? मतदान केलेल्या एकूण मतदारांपैकी (म्हणजेच जवळपास पन्नास-साठ टक्के) निम्म्याहून कमी मतदारांनी महापौर निवडला, असा याचा अर्थ होत नाही काय? मतदारांनी नगरसेवक निवडून दिले ते महापौर निवडण्यासाठी की निष्क्रिय भूमिका घेऊन बाहेर पडण्यासाठी, असे अनेक प्रश्‍न निर्माण होतात; पण सौदेबाजीच्या, विश्‍वासघाताच्या आणि स्वार्थी राजकारणात त्याची उत्तरे मिळत नसतात. सभागृहाला सामोरे न गेलेले पंतप्रधान आणि मुख्यमंत्रीही आपल्याकडे होऊन गेले. गणिताचा आधार घेऊन आपण लोकशाहीचा संकोच करतोय आणि मतदारांना कोलवून लावतोय याचा विचारही आता संपून गेला आहे. असो. मनसेने त्यांच्या अल्प राजकीय कारकीर्दीत सर्वांत मोठा मिळवलेला विजय म्हणजे नाशिकचे महापौरपद होय. त्याला राजकीयदृष्ट्याही महत्त्व आहे. कारण स्वतःला नाशिकच्या राजकारणात बाहुबली समजणाऱ्या छगन भुजबळ यांचा पाडाव त्यांनी केला आहे. नाशिक आपल्याच मुठीत आहे, असे समजणाऱ्या भुजबळांना मनसेचे इंजिन कुठे कुठे शिटी फुंकत फिरते याचा अंदाज आला नाही. मतदारांनी आघाडीला का नाकारले, हेही त्यांना कळले नसावे. महापौर निवडणुकीनंतर आता सत्तावाटपाच्या आणखी निवडणुका होणार आहेत. तिजोरीची चावी बाळगणाऱ्या स्थायी समितीचा सभापती निवडायचा आहे. आता जे घडले ते कायम राहिले, तर एका अर्थाने निवडणुका सुरळीत होतील; पण स्थायीसारखी काही पदे जिंकायचीच, अशी खुमखुमी साऱ्यांच्याच मनात आली, तर मात्र महापालिकेचा मासळी बाजार होईल. रेल्वेपासून कुंभमेळ्यापर्यंत विकास प्रकल्पांच्या अनेक संधी दारात उभ्या आहेत. ज्या टेंडरराजविरुद्ध राज ठाकरे सातत्याने बोलत आहेत, ते नाशिकमध्येही आहे. विशेष म्हणजे नाशिकमध्ये राज ठाकरे यांच्या काळात शिवसेनेची सत्ता असतानाही ते होते. कंत्राटदारांची सत्ता संपविण्याची व शहराचा कायापालट करण्याची संधी मनसेला नाशिकमध्ये मिळते आहे. मतदारांनी मनसेवर जो भरभरून विश्‍वास टाकला, त्याचे सोने करण्याची संधीही आहे. येणारा काळच ठरवेल की मनसे दिलसे चालतो, की सोयीच्या राजकारणातच रमतो



नाशिकच्या महापौरपदी मनसेचे 'वाघ'

नाशिकच्या महापौरपदी मनसेचे 'वाघ'
- सकाळ वृत्तसेवा
Thursday, March 15, 2012 AT 02:00 AM (IST)

मुंबई - नाशिकच्या इतिहासातील सर्वाधिक उत्कंठापूर्वक निवडणूक म्हणून पाहत असलेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बाजी मारली. मनसेचे यतीन वाघ यांनी ५८ मते मिळवून महापौर मिळविले आहे. त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार तानाजी जायभावे यांचा पराभव केला. जायभावे यांना फक्त तीन मते मिळाली. तर उपमहापौरपदी अपेक्षेप्रमाणे भाजपचे सतीश कुलकर्णी यांची निवड झाली. सतीश कुलकर्णी यांना ५६ मते मिळाली.

ऱाष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस तटस्थ राहिल्याने आणि शिवसेनेने सभात्याग केल्याने मनसेचा विजय नक्की होता. त्यापूर्वी आज (गुरुवार सकाळी) भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) पाठिंबा जाहीर केल्याने मनसेचा महापौरपदाचा मार्ग मोकळा झाला होता. भाजपचे आमदार गिरीश महाजन यांनी आपला मनसेला पाठिंबा असल्याचे सांगितले. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिकमध्ये येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

राजकारणाच्या सारीपाटात किमान साधर्म्य असलेले राजकारण करणारे पक्ष लवकर एकत्र येणे स्वाभाविक मानले जाते. त्याच अनुषंगाने निवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी एकमेकांच्या कितीही उण्यादुण्या काढल्या तरी ते स्वाभाविक मानले जाते. याच पद्धतीने मराठीच्या अस्मितेचे राजकारण करणारी मनसे ही मराठीसह हिंदूंचे राजकारण करणाऱ्या शिवसेनेच्या नेतृत्वाला आपलीशी वाटत नाही. त्याचवेळी भाजपच्या नेतृत्वाला मात्र मनसे जवळची वाटते. त्यामुळेच भाजपने मनसेला पाठिंबा जाहीर केला आहे. मनसे ४० जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता.

बुधवार, 14 मार्च 2012

नाशिकमध्ये मनसेचा महापौर?

नाशिकमध्ये मनसेचा महापौर?
- सकाळ वृत्तसेवा
Thursday, March 15, 2012 AT 12:45 AM (IST)
मुंबई - नाशिकच्या इतिहासातील सर्वाधिक उत्कंठापूर्वक निवडणूक म्हणून आजच्या (ता. 15) महापौरपदाच्या निवडणुकीकडे पाहिले जात आहे. या निवडणुकीत शिवसेनेचा पाठिंबा नाही तरी किमान शिवसेनेचे नगरसेवक मनसेच्या उमेदवाराच्या विरोधात तटस्थ तरी राहावेत, यासाठी भाजपच्या चाणक्‍यांनी थेट मातोश्रीवर संपर्क साधल्याचे कळते.

राजकारणाच्या सारीपाटात किमान साध्यर्म असलेले राजकारण करणारे पक्ष लवकर एकत्र येणे स्वाभाविक मानले जाते. त्याच अनुषंगाने निवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी एकमेकांच्या कितीही उण्यादुण्या काढल्या, तरी ते स्वाभाविक मानले जाते. याच पद्धतीने मराठीच्या अस्मितेचे राजकारण करणारी मनसे ही मराठीसह हिंदूंचे राजकारण करणाऱ्या शिवसेनेच्या नेतृत्वाला आपलीशी वाटत नाही. त्याच वेळी भाजपच्या नेतृत्वाला मात्र मनसे जवळची वाटते. अशा वेळी विरोधक असलेल्या राष्ट्रवादीच्या हाती नाशिकचे महापौरपद जाण्याऐवजी ते किमान आपल्याप्रमाणे अस्मितेचे राजकारण करणाऱ्या मनसेच्या हातात जाण्यासाठी भाजप प्रयत्नशील असल्याचे कळते. त्यासाठी त्यांनी नाशिक महापौरपदाचा विषय हा भाऊबंदकीच्या दृष्टिकोनातून पाहण्याऐवजी दोन्ही नेत्यांनी दोन प्रमुख पक्षांचे नेते म्हणून या विषयाकडे पाहण्यासाठी भाजपमधील काही नेते कार्यरत असल्याचे कळते. काही कारणांमुळे मनसेला थेट पाठिंबा देणे शक्‍य नसल्यास भाजपने मनसेला पाठिंबा दिल्यावर शिवसेनेने किमान तटस्थ राहावे, यासाठी काही भाजपचे नेते थेट उद्धव ठाकरे यांना साकडे घालत असल्याचे कळते