मनसेशी युतीबाबत भाजपची चाचपणी
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, December 21, 2010 AT 12:34 AM (IST)
उमाकांत देशपांडे
मुंबई - शिवसेनेशी ताणले गेलेले संबंध आणि आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेऊन शिवसेनेला इशारा देण्यासाठी राज ठाकरे यांची भाजप प्रदेश कार्यालय भेट घडवून आणली गेली. युतीबाबत चर्चा झाली नसली तरी, आगामी काळात तशी चाचपणी होणार असल्याचे वरिष्ठ भाजप नेत्यांनी सूचित केले.
मनसेशी युती करावी, असा भाजपमध्ये जोरदार मतप्रवाह असून, मनसेशी सलगी करण्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानेही प्रदेश नेत्यांना हिरवा कंदील दाखविला असल्याचे समजते.
मुंबई - शिवसेनेशी ताणले गेलेले संबंध आणि आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेऊन शिवसेनेला इशारा देण्यासाठी राज ठाकरे यांची भाजप प्रदेश कार्यालय भेट घडवून आणली गेली. युतीबाबत चर्चा झाली नसली तरी, आगामी काळात तशी चाचपणी होणार असल्याचे वरिष्ठ भाजप नेत्यांनी सूचित केले.
मनसेशी युती करावी, असा भाजपमध्ये जोरदार मतप्रवाह असून, मनसेशी सलगी करण्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानेही प्रदेश नेत्यांना हिरवा कंदील दाखविला असल्याचे समजते.
राज ठाकरे अचानकपणे भाजप प्रदेश कार्यालयात गेले आणि राजकीय चर्चेला सुरवात झाली आहे. ही राजकीय भेट नव्हती, असे स्पष्टीकरण भाजप प्रदेशाध्यक्षांनी केले असले, तरी राजकारणात सहज किंवा योगायोगाने असे काही घडत नाही. त्यामुळे अशा भेटीत राजकीय चर्चा किंवा समीकरणे जुळत नसली तरी त्यासाठी पोषक वातावरण तयार करणे किंवा शिवसेनेला इशारा देण्यासाठी या भेटीचे नियोजन झाले. भाजपचे महाराष्ट्राचे प्रभारी व्यंकय्या नायडू यांच्या उपस्थितीत पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक काल पार पडली. त्यामध्ये एकनाथ खडसेंसह अन्य वरिष्ठ नेत्यांनी शिवसेनेविरुद्ध नाराजी व्यक्त केली. खडसेंनी तर विधान परिषद निवडणुकीआधी शिवसेनेला उघडपणेच मुंबई महापालिका निवडणुकीत युती तोडण्याचा इशारा दिला होता. खडसेंच्या मुलाचा विधान परिषद निवडणुकीत पराभव करण्यासाठी शिवसेना नेत्यांनी मदत केली. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या बंडखोरांना थंड करण्यात आले नाही व भाजपला त्याची किंमत चुकवावी लागली. केंद्रीय अध्यक्ष नितीन गडकरी राज्यात प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी मनसेशी युती करण्यासाठी काही पावलेही टाकली होती; पण ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी व अन्य नेत्यांनी शिवसेनेशी युती तोडू नये, अशी भूमिका घेतल्याने मनसेशी युती साध्य होऊ शकली नव्हती.
मुंबई महापालिका निवडणुकीतही शिवसेनेचेच वर्चस्व राहणार असून, त्यामागे भाजपची फरपट होऊ नये, असे भाजप नेत्यांचे मत आहे. शिवसेना पदरात टाकतील, तेवढ्या जागा भाजपने लढवायच्या, हे आता मान्य करू नये. एवढे वर्ष युती असली, तरी कधी ना कधी त्याचा विचार भाजपला करावाच लागेल. त्यामुळे महापालिका निवडणुकीआधी युतीबाबत भाजप निर्णय घेण्याच्या मनःस्थितीत आहे. व्यंकय्या नायडू यांच्या उपस्थितीत वरिष्ठ भाजप नेत्यांनी आपली भूमिका पक्षपातळीवर काल मांडली होती. त्याच वेळी राज ठाकरे प्रदेश कार्यालयासमोरील "एलआयसी'च्या योगक्षेम इमारतीत येणार असल्याचे भाजप नेत्यांना समजल्यावर हा योगायोग साधण्याचे भाजप नेत्यांनी ठरविले. त्यामुळे राज ठाकरे यांना चहापानाचे निमंत्रण देण्यात आले व त्यांनी स्वीकारले. त्यामुळे मनसेशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी भाजपने एक पाऊल पुढे टाकले आहे. त्याचे युतीमध्ये रूपांतर कधी होणार, याबाबत राजकीय क्षेत्रात तर्कवितर्क लढविण्यास सुरवात झाली आहे.