शुक्रवार, 7 जून 2013

युतीतील नाट्याचा फिरता रंगमंच!

युतीतील नाट्याचा फिरता रंगमंच!
- पद्मभूषण देशपांडे
शनिवार, 8 जून 2013 - 12:45 AM IST



युतीच्या राजकीय नाट्याचे कथानक अनपेक्षित वळणे घेत आहे. अद्याप लोकसभा निवडणुकाही जाहीर झालेल्या नाहीत, तोवर युतीने विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि भाजप व रिपब्लिकन पक्षाचा प्रत्येकी एक असे दोन उपमुख्यमंत्री, असे वाटप करून टाकलेले दिसते!

"निवडणूक येईल तेव्हा तुम्ही मागाल तेवढ्या जागा देऊ. वाटलं तर दोन-चार जास्त देऊ; पण तोवर गप्प बसायचं काय घ्याल,' असे युतीतल्या कोणा तरी नेत्याने म्हणण्याची वाट रामदास आठवले पाहतायत की काय कोणास ठाऊक! जेव्हा उद्धव ठाकरेंनी टाळीसाठी हात पहिल्यांदा पुढे केला, तेव्हा राज ठाकरे यांनी तो ठोकरला. एकीकडे मुंबईत असा प्रस्ताव नाकारत असताना अमरावतीला सभेसाठी गेले असता राज यांना अचानक उपरती झाली आणि तिथूनच त्यांनी नाशिक, ठाणे, कल्याण आणि भिवंडीत शिवसेनेला महापालिकेत मदत करण्याची तयारी दाखवली. तटस्थ राहून अप्रत्यक्ष मदत करण्यापेक्षा थेट मतदान करूनच शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सत्तेत भागीदारी केली पाहिजे, असा नवा विचार त्यांनी स्वतःहून मांडल्याचे सांगितले जाते. ठाण्याच्या स्थायी समितीच्या अध्याक्षांची निवड अद्याप न्यायालयात अडकली आहे. त्यामुळे तिथली भागीदारी राहिली. मात्र, अन्य तीनही ठिकाणी शिवसेना आणि मनसे यांनी एकत्र येऊन सत्तेची पदे मटकावली. हे सगळे घडले तेव्हा आठवले युतीतच होते अन्‌ राज यांच्या युतीतल्या सहभागाला विरोध करत होते! आठवले आणि उद्धव ठाकरे एका व्यासपीठावर येत होते, युतीच्या गर्जना करत होते. त्याच वेळी दुसऱ्या बाजूला आठवले राज यांच्या म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीतल्या प्रवेशाला विरोध करत होते. शिवसेना आणि मनसे त्याच वेळी सत्तेत भागीदारी करत होते. आठवले यांना हे कळत नव्हते की समजत नव्हते?

आठवले यांना रिपब्लिकन पक्षासाठी लोकसभेच्या चार आणि विधानसभेच्या 35 जागांचा वाटा युतीत हवा आहे. गेले तीन-चार महिने ते याच आकड्याचा जप करताहेत. गोपीनाथ मुंडे, देवेंद्र फडणवीस या सगळ्यांबरोबर झालेल्या भेटींमध्ये आठवलेंनी आपला हा आकडा काही सोडला नाही. अगदी सुरवातीला उद्धव यांच्याकडेही त्यांनी तीच मागणी केली होती. मनसे युतीमध्ये आली तर त्यांनाही त्यांचा वाटा द्यावा लागणार. त्यातून आपल्या वाट्यावर अतिक्रमण होणार. शिवसेना आणि भाजप आधीच आपल्या वाट्याविषयी काही बोलत नाहीत; त्यात मनसेने उडी घेतली तर आपला दावा आणखी कमजोर होईल, या विचाराने आठवले मनसेला युतीत येण्याला विरोध करत होते. पण दरम्यानच्या काळात काय जादूची कांडी फिरली कळेना. आठवलेंनी राज ठाकरे यांना युतीत येण्याचे आमंत्रण द्यायला अचानक सुरवात केली. शिवसेना आणि आठवले यांच्यात काही ठरले असावे आणि त्यातूनच आठवलेंचे आमंत्रण आले असावे, असे वाटत असतानाच शिवसेनेच्या "सामना'तून आठवलेंची झाडाझडती घेण्यात आली. "चौथा कशाला?' असे विचारता विचारताच या अग्रलेखाने भाजपचे दिल्लीतील नेते "तिसरा तरी कशाला?' असा प्रश्‍न विचारत असल्याचे उघड केले. भाजपचे महाराष्ट्रातले नेते मनसेच्या मतांच्या बेरजेसाठी गळ टाकून बसले आहेत; पण दिल्लीतल्या नेत्यांना मात्र मनसेच्या महाराष्ट्रातील बेरजेने महाराष्ट्राबाहेर वजाबाकी घडेल, अशी भीती वाटते आहे. रिपब्लिकन पक्षाला बरोबर घेऊन असा काय फायदा होणार आहे, आपल्या मतदाराला अशी युती पचनी पडेल काय, असे प्रश्‍न भाजपच्या नेत्यांना अजूनही आहेत. "तिसरा तरी कशाला' हा प्रश्‍न त्यातूनच येत असावा. आठवलेंनी स्वतःचा जागांचा धोशा कमी करावा यासाठी शिवसेनेने पद्धतशीरपणे भाजपचा प्रश्‍न पुढे टाकून आठवलेंना "बॅकफूट'वर ढकलण्याचा प्रयत्न केला.
-->

आता आठवले पुन्हा एकदा "मनसे नकोच' असे म्हणू लागले आहेत. भाजपच्या नेत्यांनीही राज यांना भेटू नये, त्यातून भांडणे वाढतात, असा आठवले यांचा सल्ला आहे. आठवले यांच्या या नव्या साक्षात्काराने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा काही तरंग उठले आहेत. आठवले "पोटात एक आणि ओठात एक' असे करू शकत नाहीत, हे राजकारणात सगळ्यांनाच माहीत आहे. आठवले यांच्या प्रामाणिक सरळपणाबद्दलही कुणाला शंका नाही. त्यामुळे आठवले जे बोलतात त्यातून युतीमध्ये नक्की काय चालले आहे याचा थोडा फार अंदाज येतो. मध्यंतरी अहल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त नगर जिल्ह्यात चौंडी येथे बोलताना आठवले यांनी मुंडे यांच्या उपस्थितीत "मी उपमुख्यमंत्री होणार' अशी घोषणाच करून टाकली. याचा अर्थ आठवले यांना युतीमध्ये उपमुख्यमंत्रिपद देऊ केले असणार. शिवसेना किंवा भाजपला रिपब्लिकन मते हवी आहेत. आठवले यांच्या युतीत असण्याने त्यातला काही तरी वाटा निश्‍चित मिळेल, असा युतीच्या नेत्यांचा अंदाज आहे. त्यामुळे "नसण्यापेक्षा असलेले काय वाईट?' या न्यायाने युतीचे नेते आठवले यांना झुलवताहेत.

रिपब्लिकन उमेदवारांनी युतीचे उमेदवार म्हणून युतीतून निवडणूक लढवली तरी युतीची मते त्यांना मिळणार नाहीत याबाबत उद्धव, मुंडे आणि आठवले या तिघांमध्येही एकमत आहे. मग आठवले यांना काही जागा देऊन त्या गमावण्यापेक्षा लोकसभा आणि विधानसभेच्या प्रत्यक्ष रणमैदानात शिवसेना आणि भाजपचे उमेदवार लढले, त्यांना रिपब्लिकन मते मिळाली तर युतीच्या एकूण जागा वाढतील. त्या वाढीव जागांच्या बळावर आठवलेही उपमुख्यमंत्री होऊ शकतील, असे हे गृहीतक असणार. युतीने घालून दिलेल्या पायंड्यानुसार लोकशाही आघाडीने उपमुख्यमंत्री कायम करून टाकला. आता पुन्हा सत्ता मिळालीच तर दोन उपमुख्यमंत्री करून टाकू, असे युतीच्या नेत्यांनी ठरवले असावे. आठवले त्याशिवाय उपमुख्यमंत्रिपदाची भाषा जाहीरपणे बोलणार नाहीत. म्हणजे अद्याप लोकसभा निवडणुकाही जाहीर झालेल्या नाहीत, तोवर युतीने विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि भाजप व रिपब्लिकन पक्षाचा प्रत्येकी एक असे दोन उपमुख्यमंत्री, असे वाटप करून टाकलेले दिसते!!

आठवले यांच्या जाहीर वक्तव्यांनी अनेकदा करमणूक होते. आताही ते ज्या वेगाने भूमिका बदलताहेत त्यामुळे युतीच्या राजकीय नाट्याचे कथानक जी अनपेक्षित वळणे घेत आहे, त्यामुळे हमखास करमणूक होते आहे. उद्धव ठाकरे 18 जूनपर्यंत परदेशात आहेत. ते येईपर्यंत आठवले युती नाट्याला आणखी एखादे वळण तर देणार नाहीत ना? शिवसेनेतले नेते मात्र त्यांची "18 जूनपर्यंत तरी काही बोलू नका', अशी मनधरणी करत असतील

राजसाहेबांसोबतचा एक अपुरा वार्तालाप

भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची परवा भेट घेतल्याने चर्चेला पुन्हा उधाण आलं. रतन टाटांपासून ते फडणविसांपर्यंत जो उठतो तो राजसाहेबांची भेट घेतो आहे, हे पाहोन आम्हीही "कृष्णकुंज' गाठलं. सोबत बिस्किटांचे पुडे घेतले. "कृष्णकुंजवर फक्त चहाच मिळेल, बिस्किटे ज्याची त्याने आणावीत,' असा फतवा राजसाहेबांनी काढलेला नव्हता. गैरसमज नको !

आम्ही बिस्किटे घेतली ती त्यांच्या श्‍वानासाठी. आम्ही कधी कोणाकडे रिकाम्या हाताने जात नाही. राणेदादांकडे गेलो तर कोळंबीचा डबा घेऊन जातो. आर. आर. आबांकडं गेलो तर खिसा भरून इलायची आणि वेलदोडे घेऊन जातो. फक्त एकदाच घोळ झाला होता. ऊर्जामंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाला जाताना आम्ही त्यांना फुंकण्यासाठी मेणबत्त्या घेऊन गेलो होतो. पण "सारखी वीज जाते, म्हणून मला डिवचण्यासाठी मुद्दाम मेणबत्या घेऊन आलात,' असं म्हणून दादा आमच्यावर खवळले होते. असो !

राजसाहेबांच्या श्‍वानाला बिस्किटे खायला घालून आम्ही थेट दिवाणखान्याकडे गेलो, तर राजसाहेब फोनवरून कोणाची तरी झाडाझडती घेत होते. ""हे मला चालणार नाही. मराठी माणसाच्या विकासासाठी तुम्हाला निवडून दिलंय का स्वतःच्या विकासासाठी? आधीच सांगून ठेवतो, मला कामात बदल हवाय....''
""साहेब, नमस्कार!'' आम्ही म्हणालो.""हे पहा, मला महायुतीत यायचं नाही. तुम्ही कोणाचेही दूत म्हणून आला असाल तर लगेच फुटायचं. काय!'' राजसाहेबांनी असं म्हटल्यावर आमची टरकलीच. पण नंतर राजसाहेबांनी आम्हास ओळखलं.
""देवेंद्र फडणवीस तुम्हाला भेटले....''
""मग? तुमच्या का पोटात दुखतंय ? भेटू द्या की!'' राजसाहेबांची गाडी अजून त्यांच्याच रूळावर होती. मग आम्हीच ट्रॅक बदलायचं ठरवलं.
""ते आठवलेसाहेब, रोज कोलांटउड्या मारून स्वतःचं हसं करून इतरांची करमणूक करतायत. महायुतीची सत्ता आल्यानंतर करमणूक खातं नव्यानं तयार करून त्यांच्याकडं द्यावं म्हणजे झालं ! ''
आमच्या या विनोदावर आम्ही बेहद्द खुश झालो आणि त्यामुळे जोरात हसत टाळीसाठी त्यांच्यापुढं हात धरला.
-->
""हे पहा, मी कोणालाही टाळी देणार नाही. मागे घ्या तो हात. जो उठतो तो टाळीसाठी हात पुढं करतो.'' असं म्हणून त्यांनी हाताची घडी घातली. ""गुजरातमध्ये काल झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये नरेंद्र मोदींनी शंभर टक्के जागा मिळवल्यात...'' आम्ही पुन्हा ट्रॅक बदलला. "नरेंद्र मोदी' हे नाव ऐकताच त्यांचा चेहरा फुलला.
""विकास कसा करायचा असतो, ते तुम्ही गुजरातमध्ये जाऊन बघा. मोदींनी गुजरातचा अक्षरशः स्वर्ग केलाय. महाराष्ट्राची एकहाती सत्ता आल्यानंतर मीपण तेच करणार आहे. ''
""हल्ली, तुम्ही नगरसेवक व आमदारांची झाडाझडती घेताय..''
""मग नको घ्यायला? निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्यात. झाडाझडती घेतली नाही तर आमचा पक्ष इतरांपेक्षा वेगळा आहे, हे कसं कळणार आणि लोकं तरी आम्हाला मतं कशी देणार? गेल्या वेळी तेरा होते आता तेवढा आकडा तरी गाठला पाहिजे. नाहीतर पक्षाचे तीनतेरा वाजायचे. कळलं ? फुटा आता! ''
""बरेच जण तुम्हाला "आत' घ्यायचं म्हणून मागे लागलेत.''
""मला "आत' घेणारा अजून जन्माला यायचाय,'' राज कडाडले.
""तुमचा गैरसमज होतोय. आत म्हणजे महायुतीत. तीन तिघाडा काम बिघाडाची भीती वाटत असावी, त्यामुळे चौथ्यासाठी....''
आमचे वाक्‍य पूर्ण व्हायच्या आतच राज यांनी सुरक्षारक्षकाला नजरेने इशारा केल्याचा भास आम्हाला झाला, त्यामुळे निरोपाच्या शब्दाची जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न सोडून देत तिथून काढता पाय घेतला.
- तडकामास्टर
राजसाहेबांसोबतचा एक अपुरा वार्तालाप (तडकामास्टर)
- -
शुक्रवार, 7 जून 2013 - 03:45 AM IST

बुधवार, 5 जून 2013

राज व उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊ नये

राज व उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊ नये
गुरुवार, 6 जून 2013 - 03:30 AM IST



मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महायुतीमध्ये येण्याचे निमंत्रण देणारे रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी आज घूमजाव करत मनसेने महायुतीमध्ये येऊ नये, अशी भूमिका मांडली. मनसे महायुतीमध्ये आल्यास महायुतीला फटका बसेल असे ते म्हणाले. उद्धव व राज ठाकरे एकत्र येतील असे वाटत नाही व त्यांनी एकत्र यावे असेही वाटत नाही. उद्धव ठाकरे परदेश दौऱ्यावरून आल्यानंतर गोपीनाथ मुंडे, उद्धव ठाकरे व आपली बैठक होईल व त्यामध्ये मनसेच्या महायुतीमधील प्रवेशाबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती आठवले यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मनसे नेतृत्वाची वारंवार भेट घेऊ नये अन्यथा महायुतीमध्ये मतभेद निर्माण होईल, असा थेट इशारा त्यांनी भाजपला दिला. मनसेला निमंत्रण देणाऱ्या रिपब्लिकन पक्षाच्या भूमिकेवर "सामना'ने खरमरीत शब्दांत टीका केली होती. आता शिवसेना नेते रामदास कदम यांच्या राज व उद्धव यांनी एकत्र यावे, या आवाहनाचा व भाजप नेत्यांच्या राज भेटीचा "सामना'ने समाचार घ्यावा, असे त्यांनी शिवसेनेला सुनावले. मनसेला सोबत घेण्याविषयी भाजप आग्रही आहे, मात्र राज ठाकरेंच्या परप्रांतीय विरोधी भूमिकेमुळे भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांचा या निर्णयाला पाठिंबा मिळण्याची शक्‍यता कमी आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचा निर्णय त्यांचा असून हा अधिकार इतरांना नाही. रेसकोर्सच्या जागेचा भाडेकरार राज्य सरकारने वाढवून देऊ नये व त्या जागेवर थीम पार्क उभारावे, अशी मागणी त्यांनी केली. याबाबत मुख्यमंत्र्यांनी राजकारण करू नये, असे आवाहन त्यांनी केले. महायुतीच्या जागावाटपाचा निर्णय महिनाभरात व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

नवाब मलिक  यांनी नाक खुपसू नये आमच्या पक्षाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आमचा आहे, त्यामुळे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आमच्यात नाक खुपसू नये. त्यांनी आपले प्रवक्तेपद सांभाळावे, असा सल्लाही आठवले यांनी दिला. पूर्व मुक्त मार्गाला बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याची मागणी रिपब्लिकन पक्षाने आधी केली आहे. सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने केवळ मागणी करण्याऐवजी नाव देण्याचा निर्णय घ्यावा, असे ते म्हणाले.

आठवलेंचा इशारा इंदू मिलच्या जागेवर स्मारकाच्या कामाला 15 ऑगस्टपर्यंत सुरुवात झाली नाही तर पक्षातर्फे राज्यभरात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आठवलेंनी दिला. इंदू मिलसंदर्भात राज्य सरकारने त्वरित समिती नेमण्याची मागणी त्यांनी केली

मंगलवार, 4 जून 2013

देवेंद्र फडणवीस गेले राज ठाकरेंच्या भेटीला


आज सकाळी (दि.5 जून 2013)
फडणवीस यांनी राज ठाकरेंचे निवासस्थान असलेल्या 'कृष्णकुंज' येथे जाऊन त्यांची भेट घेतली. या बैठकीतून कोणताही राजकीय निष्कर्ष काढू नका, असे फडणवीस यांनी सांगितले. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्यावर मी सर्वच पक्षाच्या नेत्यांची भेट घेणार, असे सांगितले होते. त्यानुसार आज राज ठाकरे यांची भेट घेतल्याचे, फडणवीस यांनी पत्रकारांना सांगितले. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 'महाराष्ट्र लोकशाही आघाडी' स्थापनेसंदर्भात ही भेट असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. 

रविवार, 2 जून 2013

Uddhav Thackeray's Interview