शुक्रवार, 7 जून 2013

राजसाहेबांसोबतचा एक अपुरा वार्तालाप

भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची परवा भेट घेतल्याने चर्चेला पुन्हा उधाण आलं. रतन टाटांपासून ते फडणविसांपर्यंत जो उठतो तो राजसाहेबांची भेट घेतो आहे, हे पाहोन आम्हीही "कृष्णकुंज' गाठलं. सोबत बिस्किटांचे पुडे घेतले. "कृष्णकुंजवर फक्त चहाच मिळेल, बिस्किटे ज्याची त्याने आणावीत,' असा फतवा राजसाहेबांनी काढलेला नव्हता. गैरसमज नको !

आम्ही बिस्किटे घेतली ती त्यांच्या श्‍वानासाठी. आम्ही कधी कोणाकडे रिकाम्या हाताने जात नाही. राणेदादांकडे गेलो तर कोळंबीचा डबा घेऊन जातो. आर. आर. आबांकडं गेलो तर खिसा भरून इलायची आणि वेलदोडे घेऊन जातो. फक्त एकदाच घोळ झाला होता. ऊर्जामंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाला जाताना आम्ही त्यांना फुंकण्यासाठी मेणबत्त्या घेऊन गेलो होतो. पण "सारखी वीज जाते, म्हणून मला डिवचण्यासाठी मुद्दाम मेणबत्या घेऊन आलात,' असं म्हणून दादा आमच्यावर खवळले होते. असो !

राजसाहेबांच्या श्‍वानाला बिस्किटे खायला घालून आम्ही थेट दिवाणखान्याकडे गेलो, तर राजसाहेब फोनवरून कोणाची तरी झाडाझडती घेत होते. ""हे मला चालणार नाही. मराठी माणसाच्या विकासासाठी तुम्हाला निवडून दिलंय का स्वतःच्या विकासासाठी? आधीच सांगून ठेवतो, मला कामात बदल हवाय....''
""साहेब, नमस्कार!'' आम्ही म्हणालो.""हे पहा, मला महायुतीत यायचं नाही. तुम्ही कोणाचेही दूत म्हणून आला असाल तर लगेच फुटायचं. काय!'' राजसाहेबांनी असं म्हटल्यावर आमची टरकलीच. पण नंतर राजसाहेबांनी आम्हास ओळखलं.
""देवेंद्र फडणवीस तुम्हाला भेटले....''
""मग? तुमच्या का पोटात दुखतंय ? भेटू द्या की!'' राजसाहेबांची गाडी अजून त्यांच्याच रूळावर होती. मग आम्हीच ट्रॅक बदलायचं ठरवलं.
""ते आठवलेसाहेब, रोज कोलांटउड्या मारून स्वतःचं हसं करून इतरांची करमणूक करतायत. महायुतीची सत्ता आल्यानंतर करमणूक खातं नव्यानं तयार करून त्यांच्याकडं द्यावं म्हणजे झालं ! ''
आमच्या या विनोदावर आम्ही बेहद्द खुश झालो आणि त्यामुळे जोरात हसत टाळीसाठी त्यांच्यापुढं हात धरला.
-->
""हे पहा, मी कोणालाही टाळी देणार नाही. मागे घ्या तो हात. जो उठतो तो टाळीसाठी हात पुढं करतो.'' असं म्हणून त्यांनी हाताची घडी घातली. ""गुजरातमध्ये काल झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये नरेंद्र मोदींनी शंभर टक्के जागा मिळवल्यात...'' आम्ही पुन्हा ट्रॅक बदलला. "नरेंद्र मोदी' हे नाव ऐकताच त्यांचा चेहरा फुलला.
""विकास कसा करायचा असतो, ते तुम्ही गुजरातमध्ये जाऊन बघा. मोदींनी गुजरातचा अक्षरशः स्वर्ग केलाय. महाराष्ट्राची एकहाती सत्ता आल्यानंतर मीपण तेच करणार आहे. ''
""हल्ली, तुम्ही नगरसेवक व आमदारांची झाडाझडती घेताय..''
""मग नको घ्यायला? निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्यात. झाडाझडती घेतली नाही तर आमचा पक्ष इतरांपेक्षा वेगळा आहे, हे कसं कळणार आणि लोकं तरी आम्हाला मतं कशी देणार? गेल्या वेळी तेरा होते आता तेवढा आकडा तरी गाठला पाहिजे. नाहीतर पक्षाचे तीनतेरा वाजायचे. कळलं ? फुटा आता! ''
""बरेच जण तुम्हाला "आत' घ्यायचं म्हणून मागे लागलेत.''
""मला "आत' घेणारा अजून जन्माला यायचाय,'' राज कडाडले.
""तुमचा गैरसमज होतोय. आत म्हणजे महायुतीत. तीन तिघाडा काम बिघाडाची भीती वाटत असावी, त्यामुळे चौथ्यासाठी....''
आमचे वाक्‍य पूर्ण व्हायच्या आतच राज यांनी सुरक्षारक्षकाला नजरेने इशारा केल्याचा भास आम्हाला झाला, त्यामुळे निरोपाच्या शब्दाची जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न सोडून देत तिथून काढता पाय घेतला.
- तडकामास्टर
राजसाहेबांसोबतचा एक अपुरा वार्तालाप (तडकामास्टर)
- -
शुक्रवार, 7 जून 2013 - 03:45 AM IST

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें