शुक्रवार, 4 मई 2018

भाजपमधील एक व्यक्ती सर्वाधिक धोकादायक ; राज यांची मोदींवर अप्रत्यक्ष टीका


उल्हासनगर : ''व्यक्ती बदलला की भूमिका बदलते. भाजपमध्ये एक व्यक्ती सर्वाधिक धोकादायक व्यक्तिमत्त्व असून, त्यांच्याकडून आज आणि भविष्यात धोके दिसत आहेत'', अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता केली. भाजपशी हातमिळवणी करणार का, या प्रश्नावर प्रथम भाजपला तर मोदीमुक्त होऊ द्या, असे राज ठाकरे म्हणाले.
उल्हासनगर येथील टाऊन हॉलमध्ये आज कार्यकर्ता मेळाव्यापूर्वी पत्रकार परिषदेत राज ठाकरे हे बोलत होते. ते म्हणाले, ''नरेंद्र मोदी यांची राजकीय भूमिका ही गरीब, मध्यमवर्गीय आणि शेतकऱ्यांना नष्ट करण्याची आहे. विशेषतः शेतकऱ्यांबाबत बुलेट ट्रेनच्या नावावर बनावट सात बारा बनवून त्यांच्या जमिनी हडपल्या जात आहेत. नाणार प्रकल्प कोकणात येणार याबाबत स्थानिक अनभिज्ञ राहतात. पण परप्रांतीय व्यापाऱ्यांना अगोदरच कसे ठाऊक होते ? ते जमिनी विकत घेऊन मोकळे होतातच कसे? असा सवालही त्यांनी यावेळी केला. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी सरकार आणि परप्रांतीय व्यापारी एकत्र आले आहेत, असा आरोप त्यांनी केला.

उल्हासनगर शहरात मनसेच्या नेत्यांनी एकही नगरसेवक नसताना विद्यमान शहर जिल्हा अध्यक्ष बंडू देशमुख यांच्या पाठपुराव्यामुळे भव्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका तयार होत असल्याचे राज ठाकरे यांच्या निदर्शनास येताच त्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. याशिवाय मनसे कामगार युनिटचे अध्यक्ष दिलीप थोरात यांच्या युनिटचे काम, कब्रस्तानचा पाठपुरावा, एल बी टी गैरव्यवहार उघडकीस आणल्याबद्दल मनसेच्या कार्यकर्त्यांची त्यांनी स्तुती केली. यापुढे सातत्याने सर्व शहरांना भेट देऊन लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी कार्यकर्ता मेळाव्यात दिले.
यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, राजू पाटील, संदीप देशपांडे, सचिव सचिन मोरे, ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव उपस्थित होते.
दरम्यान, राज ठाकरे यांनी बंडू देशमुख, सचिन कदम, प्रदीप गोडसे, संजय घुगे, शैलेश पांडव, मनोज शेलार, शालिग्राम सोनवणे या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना स्टेजवर बोलावून लवकरच 'कृष्णकुंज'वर बोलवून पक्ष संघटनेचे धडे देणार असे सांगितले.

बुधवार, 2 मई 2018

राज ठाकरेंनी केले कार्यकर्त्याच्या घरी जेवण

आज दुपारी पालघर जिल्ह्यातील, वाडा तालुक्यातील माझा महाराष्ट्र सैनिक, वाडा विभाग अध्यक्ष आणि कुंतल ग्रामपंचायत सदस्य रवी जाधव याच्या आदिवासी पाड्यावरच्या घरी जेवायला गेलो होतो.