सभा घ्यायची कुठे ते सांगा - राज
- सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, February 04, 2012 AT 12:47 PM (IST)
मुंबई
- "गिरगाव चौपाटी, आझाद मैदान आणि आता शिवाजी पार्कवरही जाहीर सभा घ्यायची
नाही, तर सभा नक्की घ्यायची कुठे, हे एकदाचे सांगा,'' असा त्रागा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी व्यक्त
केला. शिवाजी पार्कवरील मनसेच्या सभेला उच्च न्यायालयाने मनाई केल्यानंतर, "मैदान मिळत नसल्याने रस्त्यावरच सभा घेऊ,'' असा इशारा राज यांनी दिला.
""शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याला मैदान देताना झुकते माप दिले जाते; मात्र मनसेवर अन्याय केला जात आहे,'' असा आरोप करून राज म्हणाले, ""रस्त्यावर सभा घेतल्यास काय गुन्हे दाखल करायचेत ते करा.''
उच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर राज यांनी "कृष्णकुंज'वर पत्रकार परिषद घेतली व उच्च न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. मात्र, त्याच वेळी "मी न्यायालयाचा कोणताही अपमान करीत नाही,' असे सांगितले.
राज म्हणाले, "या देशात मतस्वातंत्र्य असून सार्वभौम देशातील नागरिक म्हणून मला माझे मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे.'' राज यांनी थेट उच्च न्यायालयाच्या आदेशावर व्यक्त केलेली नाराजी चर्चेचा विषय ठरली आहे. राज म्हणाले, ""एक परंपरा म्हणून शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला परवानगी दिली जाते. पण त्याच वेळी आम्ही निवडणुकीच्या काळात पहिल्यांदाच "शिवाजी पार्क' मागितल्यावर त्याला मनाई करण्यात येत असल्याबद्दल मला आश्चर्य वाटते. हाच प्रकार रस्त्यावरील सभांनाही येत असतो. कुठे रुग्णालयाच्या नावाखाली; तर कुठे शाळांच्या नावाखाली सभांना परवानगी नाकारली जात आहे. शाळा सायंकाळी सुटल्यावरही रात्रीच्या सभांना परवानगी नाकारली जाते. या शाळा काय रात्रशाळा आहेत का?''
"जर निवडणुकीतच आपले मत व्यक्त करण्यासाठी संधी मिळत नसेल तर निवडणुका घेता कशाला,'' असा प्रश्न उपस्थित करून निवडणुकाच रद्द करण्याची मागणी राज यांनी या वेळी केली.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज यांनी "लक्ष्य' केल्याने भविष्यात दसरा मेळाव्यासाठी परवानगीतील शिवसेनेच्या अडचणी वाढणार असल्याचे मानले जात आहे