शनिवार, 12 मार्च 2011

आयटम गर्ल राखी सावंत मनसेच्या चित्रपट सेनेत

आयटम गर्ल राखी सावंत मनसेच्या चित्रपट सेनेत
सकाळ वृत्तसेवा
Sunday, March 13, 2011 AT 12:00 AM (IST)
 

मुंबई - छोट्या पडद्यावरील वादग्रस्त अभिनेत्री व आयटम गर्ल राखी सावंत हिने महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे सभासदत्व स्वीकारले आहे. पुढील आठवड्यात याबाबतची रीतसर घोषणा करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या सभासदांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. काही कलाकारांनी अर्ज भरून सभासदत्व स्वीकारले आहे. त्यामध्ये विक्रम गोखले, इरफान खान, आविष्कार दारव्हेकर, हर्षदा खानविलकर आदींचा समावेश आहे. आता त्यांच्यापाठोपाठ राखी सावंतनेही आपला अर्ज भरून पाठविला आहे.

बुधवार, 9 मार्च 2011

मनसे सर्व महानगरपालिका स्वबळावर लढणार

मनसे सर्व महानगरपालिका स्वबळावर लढणार
सकाळ वृत्तसेवा
Thursday, March 10, 2011 AT 12:45 AM (IST)
 
मुंबई - आगामी काळात येणाऱ्या मुंबई, ठाणे, पुणे आदी सर्व महानगरपालिकेच्या निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कोणाशीही युती करणार नाही. या सर्व निवडणुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावरच लढवेल, अशी घोषणा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केली. राज ठाकरे यांच्या "एकला चलो रे'च्या घोषणेला सभागृहात उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला.

मनसेचा पाचवा वर्धापनदिन सोहळा आज षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी बोलताना राज ठाकरे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या मनसेला सोबत घेण्याच्या प्रस्तावाची खिल्ली उडविली. "पुण्यामध्ये त्यांना थोडा काय झंडूबाम लावला तर यांना आता झंडूबामची बाटलीच हवी झाली,' अशी टीकाही त्यांनी केली. युतीमधील यांची ओझी वहायची आम्हाला गरज नाही. युतीमध्ये आधीच हे एकमेकांचे वाभाडे काढत आहेत. त्यामुळे यांच्याबरोबर जाण्याची गरज आम्हाला वाटत नाही. त्यामुळे आम्ही सर्व निवडणुका स्वतःच्या हिमतीवरच लढवू, असे ते म्हणाले. राज ठाकरे यांच्या घोषणेला सर्व कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. त्यावर ते म्हणाले, ""तुमच्या मनात काय चालले आहे, तुमची जी धाकधूक आहे, ती मला माहीत आहे. म्हणूनच मी हा निर्णय घेतला आहे.''

सध्या गाजत असलेल्या जैतापूर प्रकल्पाबद्दल बोलताना ते म्हणाले, की मनसे कधीही कोणत्याही प्रगतीच्या आड येणार नाही; परंतु स्थानिक जनतेवर अत्याचार करून वा त्यांना जेलमध्ये टाकून हे प्रश्‍न सुटणार नाहीत. त्यामुळे सरकारने दडपशाही करण्यापेक्षा स्थानिकांना विश्‍वासात घ्यावे. कोकणातच सर्व ऊर्जा प्रकल्पांची गरज काय, असा सवाल करून ते म्हणाले, की राज्यात अन्य ठिकाणीही असे प्रकल्प राबविता येऊ शकतात. पण हे सर्व एक षड्‌यंत्र आहे. कोकणी माणसाने या षडयंत्राला बळी पडू नये. कोकणात सत्ताधारी पुढाऱ्यांनी हजारो एकर जमीन घेतली आहे. या जमिनीची दलाली करणारेही दुर्दैवाने मराठी आहेत. त्यामुळे कोकणवासीयांची ही सुपीक जमीन आज घेतली, तर नंतर कोकणाचा उत्कर्ष बघण्यासाठी कोकणी माणूस शिल्लक राहणार आहे का, याचा विचारही कोकणवासीयांनी करावा.

वांद्रे येथील गरीबनगरच्या झोपड्या जळाल्या, हे एक षड्‌यंत्र आहे. प्रथम तेथे अनधिकृतपणे झोपड्या उभारायच्या, सरकारने त्याकडे दुर्लक्ष करायचे, मग या झोपड्यांना आगी लावायच्या आणि नंतर त्यांना पक्की घरे बांधून द्यायची. हेच कारस्थान या मागे आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना बाहेर काढायचे, पोलिसांना हक्काची घरे द्यायची नाहीत आणि बांगलादेशातून येणाऱ्या मुस्लिमांना मात्र पक्की घरे द्यायची असा हा डाव आहे, असा आरोप राज यांनी केला.
याप्रसंगी मनसे आमदार प्रवीण दरेकर, आमदार शिशिर शिंदे यांची भाषणे झाली. व्यासपीठावर आमदार नितीन सरदेसाई, मंगेश सांगळे, शिरीष पारकर, मनोज चव्हाण, अविनाश अभ्यंकर, अतुल सरपोतदार आदी उपस्थित होते.

नारायणराव, तुम्ही शांत बसा!जैतापूरच्या प्रकल्पावरून जो वाद चिघळला जातो आहे, तो थांबविण्यासाठी नारायणराव राणे यांनी कृपया शांत बसावे, असे आवाहन राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात केले. ते म्हणाले, ""जैतापूरमध्ये चिडाचिडी करून काही होणार नाही. उगाचंच कोकणी माणसांची माथी भडकतील आणि मूळ प्रकल्प मात्र बाजूला राहील.''