शनिवार, 23 जुलाई 2011

भाजप-मनसे युतीचा शिवसेनेकडून स्वीकार

भाजप-मनसे युतीचा शिवसेनेकडून स्वीकार
राजेश मोरे
Sunday, July 24, 2011 AT 04:00 AM (IST)
 
मुंबई - मुख्यमंत्र्यांच्या विरोधातील कौल म्हणून भाजपने मनसेचा पाठिंबा घेतल्यामुळे शिवसेनेत कुजबुज सुरू झाली असली, तरी विधिमंडळात विरोधकांच्या एकीचे बळ बेकीत दिसू नये यासाठी या युतीचा शिवसेनेने स्वीकार केल्याचे बोलले जात आहे.
काही दिवसांपूर्वी भाजपने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना चहापानासाठी बोलाविल्यावर शिवसेनेत गहजब माजला होता. त्या वेळी भाजपमधील वरिष्ठ नेत्यांना शिष्टाई करावी लागली होती; पण या वेळी भाजपमधील अनेक तरुण नेत्यांना राज ठाकरे यांच्या प्रभावाची कल्पना असल्यानेच त्यांच्या जवळ जाण्याचा त्यांचा प्रयत्न होता. हा प्रयत्न शिवसेनेतील वरिष्ठांनाही खटकला होता; मात्र त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याचे मानले जात आहे. त्यामुळेच राज्यसभेच्या निवडणुकीत पराभव दिसत असतानाही मनसेचा भाजपने मिळविलेला पाठिंबा चर्चेचा विषय ठरला होता. अशा वेळी शिवसेनेतून तिखट प्रतिक्रियेची अपेक्षा व्यक्त केली जात होती; मात्र खुद्द शिवसेनेच्या कार्याध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात भाजपने मिळविलेल्या मनसेच्या पाठिंब्याला हरकत नसल्याचे स्पष्ट केल्याने या विषयावरील शिवसेनेची भूमिका स्पष्ट झाली आहे. विधिमंडळाच्या काळात विरोधकांची ताकद विभागलेली विरोधकांना परवडणारी नाही. अशा वेळी केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्थानिक पातळीवर मनसे आणि शिवसेनेचे नेते एकत्र आल्याचे पाहावयास मिळाले होते. आता मुख्यमंत्र्यांसह आघाडी शासनाच्या विरोधातही भाजपच्या साथीने मनसेच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना भिडत असल्याचे चित्र पाहावयास मिळणार आहे.

सोमवार, 18 जुलाई 2011

राज्यकर्ते साखरेतच गुंतल्याने परप्रांतीय गुन्हेगारांचे फावले

राज्यकर्ते साखरेतच गुंतल्याने परप्रांतीय गुन्हेगारांचे फावले
-
Tuesday, July 19, 2011 AT 03:00 AM (IST)


मुंबई - मराठी माणूस आणि परप्रांतीयांबाबतचा माझा मुद्दा आणि बिहार आणि उत्तर प्रदेशामार्गे येणारे बांगलादेशी आणि अन्य गुन्हेगारी लोंढे हे विषय वेगळे आहेत, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज स्पष्ट केले. सूतगिरणी आणि साखर कारखान्यांतच गुंतलेल्या राज्य सरकारला सर्वसामान्यांच्या सुरक्षेकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसल्यानेच परप्रांतीय गुन्हेगारांचे फावले आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी वार्ताहर परिषदेत केली.

मुंबईतील 13/7च्या बॉम्बस्फोट मालिकाप्रकरणी तपासाला चुकीची दिशा देण्यासाठीच अबू आझमी यांच्यासारखे लोक पोलिस आणि इतरांवर आरोप करीत आहेत, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. पोलिस चौकशीत अडथळा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या आझमींचीच आधी चौकशी केली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. यापूर्वीच्या बॉम्बस्फोट प्रकरणात आझमींचे नाव आल्याची आठवणही त्यांनी करून दिली.

परप्रांतांतून महाराष्ट्रात येणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोंढे येत असल्याचे वक्तव्य त्यांनी केल्यानंतर नवा वाद निर्माण झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर आज "कृष्णकुंज' या निवासस्थानी वार्ताहर परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. बिहार-यूपीमार्गे बांगलादेशातील गुन्हेगारी लोंढे महाराष्ट्रात येत आहेत. पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटात बेळगावच्या रियाझ भटकळचा सहभाग असल्याचा अपवाद वगळता बहुतेक घातपाती कारवायांचे धागेदोरे उत्तर प्रदेशातील आझमगढमध्येच आहेत. अशा ठिकाणांहून येणाऱ्या गुन्हेगारांना रोखून त्यांची चौकशी करणे गरजेचे असल्याची आपली भूमिका कायम आहे, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

फैज उस्मानीच्या मृत्यूनंतर पोलिसांवर आरोप केले जात आहेत. पण बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपी म्हणून अटकेत असलेल्या भावाला वारंवार भेटण्यासाठी जाणाऱ्या उस्मानीची साधी चौकशीही पोलिसांनी करायची नाही का, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. अबू आझमींनी या प्रकरणात पोलिसांवर आरोप केले आहेत. पण मुंबईवरील हल्ल्यातील दहशतवादी पकडण्यासाठी कोणीही चौकशीच्या आड येता कामा नये. चौकशीच्या आड येणाऱ्यांची चौकशी झाली तरच, खऱ्या आरोपींपर्यंत पोहोचता येईल, असेही ते म्हणाले.

नितीशकुमार यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकीर्दित कारखानदार बिहारमध्ये जाऊ लागले आहेत. पण मायावतींच्या उत्तर प्रदेशात जाण्यास कुणीही तयार नाही. मुंबईत येऊन यूपीतील लोकांना घरे देण्याची मागणी करण्याऐवजी त्यांना आपल्या राज्यातच घरे द्या, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला. नितीशकुमारांप्रमाणे हजारो गुन्हेगारांना गजाआड करण्याची धमक मायावतींमध्ये आहे का, असा प्रश्‍न त्यांनी विचारला.

पेडर रोड येथील उड्डाणपुलाच्या सुनावणीत मराठीला मज्जाव करून केवळ इंग्रजीचा हट्ट करण्यात आला. त्यांना निवेदनाची भाषा समजत नाही. अशा लोकांना फटकावलेच पाहिजे. हाच एकमेव उपाय आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

दहशतवादी कॉंग्रेसला घाबरले असते?राज्याचे गृहमंत्रिपद कॉंग्रेसकडे असते तर, दहशतवादी घाबरले असते का, असा प्रश्‍न ठाकरे यांनी उपस्थित केला. सरकारचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांकडेच सुरक्षेची जबाबदारी आहे. केंद्रीय मंत्रिपदाची खुर्ची गेल्यावरच गुरुदास कामत यांना राज्य सरकार गंभीर नसल्याचा साक्षात्कार झाला. राज्याचे गृहमंत्री असणारे आबा अंतर्गत राजकारणातच गुंतले आहेत, अशी टीका त्यांनी केली. पोलिसांना अद्ययावत साधनसामग्री दिल्याशिवाय त्यांच्यावर टीका करू नका, असे आवाहनही त्यांनी केले