मुंबई सर्वांचीच; मनसेला "सुबोध' सल्ला
सकाळ वृत्तसेवा
Friday, January 28, 2011 AT 12:15 AM (IST)
मुंबई - गेली चार वर्षे "मराठी'चे राजकारण पेटविणाऱ्या "मनसे'ला पालिका आयुक्तांनी आज "मुंबई सर्वांची'चा "सुबोध' सल्ला दिला. आयुक्तांच्या या सल्ल्यामुळे संतापलेल्या राज ठाकरे यांनी पालिकेतून काढता पाय घेतला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने "मुंबई सर्वांची'चा नारा दिल्यानंतर शिवसेनेने रान पेटविले होते. आयुक्तांविरुद्ध मनसे कोणती भूमिका घेणार, असा सवाल केला जात आहे.
पालिका आयुक्तपदी सुबोधकुमार यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज प्रथमच महापालिका मुख्यालयात आले होते. सायंकाळी साडेचारच्या सुमारास राज ठाकरे आयुक्तांच्या दालनाशेजारच्या बैठक कक्षात आले. आयुक्तांसह अतिरिक्त आयुक्त राजीव जलोटा व असिम गुप्ता यांना त्यांनी पुष्पगुच्छ दिला. मनसेचे पालिकेतील गटनेते आमदार मंगेश सांगळे यांच्यासह पक्षाचे निवडक नगरसेवक व पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना तेथे प्रवेश नाकारण्यात आला.
राज यांनी पालिका आयुक्तांना उद्देशून "तुम्ही कडक आणि शिस्तप्रिय अधिकारी आहात. तुमचा कारभार चांगला चालला आहे,' अशा शब्दांत त्यांचे कौतुक करीत "मीही अशाच शिस्तीने काम करतो,' असे सांगितले. त्यावर आयुक्तांनी "महापालिकेच्या कामासंबंधी आपल्या काही सूचना असल्यास मला जरूर सांगा, "मुंबई सर्वांची'च आहे. सगळ्यांनीच शिस्तीने काम करूया,' असे राज यांना सांगितले. आयुक्तांचे "मुंबई सर्वांचीच' हे वाक्य कानी पडताच राज ठाकरे चमकले. त्यांनी आयुक्तांकडे एक कटाक्ष टाकला व आयुक्तांना नमस्कार करीत थेट कक्षाबाहेर पडले. ही भेट फक्त दोन मिनिटांची झाली. अशी माहिती मनसेच्या नगरसेवकांनी दिली. बाहेर जमलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशीही बोलण्याचे त्यांनी टाळले. दरम्यान, आयुक्तांच्या या विधानावर त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी पत्रकारांनी आयुक्त कार्यालयात निरोप पाठविला असता आयुक्तांनी भेटण्यास नकार दर्शविला.
पत्रकार परिषद घेण्यासही मज्जाव?
राज ठाकरे व आयुक्तांच्या भेटीचा तपशील पत्रकारांनाही कळावा म्हणून आयुक्तांच्या दालनाशेजारील बैठक कक्षात किंवा स्थायी समिती सभागृहात ही भेट व्हावी, अशी विनंती मनसेने केली होती; मात्र आयुक्त कार्यालयाने येथे पत्रकारांसह भेटता येणार नाही. पत्रकार परिषद घ्यायची असल्यास वार्ताहर कक्षात घ्या, असे मनसेला कळविले. यापूर्वी डॉ. जयराज फाटक, स्वाधीन क्षत्रिय हे आयुक्त असताना राज ठाकरे तसेच इतर पक्षांच्या नेत्यांना असा अटकाव कधीच करण्यात आलेला नाही, याकडे मनसेने लक्ष वेधले आहे.