ठाण्याच्या निवडणुकीत दांडपट्टा चालवणार - राज
सकाळ वृत्तसेवा
Sunday, December 11, 2011 AT 01:45 AM (IST)
ठाणे - हे ठिकाण जाहीर सभेचे नाही तर
सांस्कृतिक मेळाव्याचे आहे, निवडणुकीचा हंगामही जानेवारीत सुरू होईल.
त्यामुळे मनसेचा दांडपट्टा त्यावेळीच चालेल, असे प्रतिपादन मनसेचे अध्यक्ष
राज ठाकरे यांनी ठाण्यात केले . उन्नती गार्डन येथे मनसेचे नेते सुधाकर
चव्हाण यांनी गेला आठवडाभर आयोजित केलेल्या महाराष्ट्र धर्म महोत्सवाचा
समारोप आज राज ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. त्यावेळी ते बोलत
होते.राज ठाकरे म्हणाले की, राजकारणात 50 टक्के आरक्षण महिलांसाठी लागू झाल्यापासून सभांना होणारी महिलांची गर्दीही वाढत चालली आहे. रस्त्यांवर लागणाऱ्या होर्डिंग्स आणि पोस्टरवर महिला इच्छुकही झळकू लागल्या आहेत, याकडे लक्ष वेधत ते म्हणाले, आता या साऱ्याचा फैसला परीक्षेनंतर लागणार आहे. परीक्षेमुळे उमेदवारी कोणाला मिळेल हे सांगता येणार नसले तरी त्यानिमित्ताने त्यांना महापालिका कशी चालते याचा अभ्यास करता आला, असे त्यांनी आवर्जून सांगितले. विजयराज बोधनकरांच्या व्यंगचित्रांचे कौतुक करताना राज ठाकरे म्हणाले, माझाही हात शिवशिवतो, मात्र व्यंगचित्रे आता काढायला वेळच मिळत नाही, असे सांगून आता हात शिवशिवले की खळ्ळ्य....खट्ट्याक सुरू होते, असा टोला त्यांनी लगावला. आवश्यक तेव्हा मराठी साहित्याचे वाचन करतो, असे सांगून संदर्भासाठी हे वाचन नेहमी कामाला येते, असे त्यांनी सांगितले. आपण काही येथे भाषण करायला आलेलो नाही. त्यामुळे निवडणुकांच्यावेळी आपला दांडपट्टा चालेल, असे सांगून त्यांनी भाषण आवरते घेतले. त्यामुळे राज ठाकरे यांचे भाषण ऐकण्यासाठी जमलेल्या शेकडो तरुणांची काहीशी निराशा झाली. यावेळी महाराष्ट्र महोत्सवाचे आयोजन करणाऱ्या सुधाकर चव्हाण यांचा राज ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शर्मिला ठाकरे, सरचिटणीस नितीन सरदेसाई, ठाणे जिल्हा संघटक मनोज चव्हाण, राजन गावंड आदी उपस्थित होते