बेस्टचे खासगीकरण होऊ देणार नाही - राज ठाकरे
सकाळ वृत्तसेवा
Sunday, August 29, 2010 AT 12:30 AM (IST)
मुंबई - आजकाल उठसूट सर्व सार्वजनिक उपक्रमांच्या खासगीकरणाचे षड्यंत्र रचले जात असल्याची टीका करतानाच कोणत्याही परिस्थितीत बेस्टचे खासगीकरण होऊ देणार नाही, अशी ग्वाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे दिली. "महाराष्ट्राच्या, मराठी माणसाच्या हिताचे जे आहे ते मी बोलतच राहणार. काय कारवाई करायची ते करा,' असे आव्हानही त्यांनी राज्य सरकारला दिले.
महाराष्ट्र नवनिर्माण बेस्ट कामगार कर्मचारी सेनेची स्थापना आज राज ठाकरे यांच्या उपस्थितीत झाली. बेस्ट कामगार कर्मचारी सेनेच्या अध्यक्षपदी अविनाश अभ्यंकर यांची, तर बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचारी सेनेच्या अध्यक्षपदी दिलीप नाईक यांच्या नियुक्तीची घोषणा राज ठाकरे यांनी या वेळी केली. दोन्ही संघटनांच्या कार्यकारिणीची घोषणा आठडाभरात केली जाईल, असे त्यांनी जाहीर केले.
देशात बेस्टसारखी दुसरी कोणतीही सेवा नाही. ती कर्मचारी-कामगारांमुळे सुरू आहे. या कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे, असे सांगतानाच, त्यांचे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी ही संघटना काम करील, अशी ग्वाही राज ठाकरे यांनी दिली. आता बेस्टचा प्रश्न हाती घेतला आहे. आगामी काळात एअर इंडियामधील कर्मचाऱ्यांचा प्रश्नही हाती घेऊ, असे त्यांनी जाहीर केले.
राज्य सरकारने भाषणांसंदर्भात बजावलेल्या नोटिशींचीही राज ठाकरे यांनी खिल्ली उडविली. ""माझ्या घराच्या भिंतीवर सध्या नोटिशींची चित्रं तयार झाली आहेत'', असे सांगून नोटिशीतील उतारे वाचत त्यातील "सरकारी भाषे'ची राज यांनी चेष्टा केली. ""सामान्य माणसाला जे प्रश्न भेडसावत आहेत, त्यांच्या मनात ज्याबद्दल राग खदखदत आहे तेच मी बोलतो. लोकांचा राग व्यक्त करत असतो. अशा कितीही नोटिसा बजावल्या तरीही मी महाराष्ट्राच्या, मराठी माणसाच्या हिताचे जे आहे ते बोलतच राहणार. काय कारवाई करायची ती करा,'' असे आव्हान राज यांनी राज्य सरकारला दिले.
""बहुसंख्य टॅक्सी-रिक्षावाले लोकांशी उर्मटपणे वागतात, कमी अंतराचे भाडे घेत नाहीत, मी त्याबाबतच बोलतो. कोण माणसे गाड्या चालवत आहेत, हेही सरकारला माहिती नाही. अनेक टॅक्सी बेकायदा आहेत. अशा परिस्थितीत बॉम्बस्फोट होणार नाही तर काय,'' असा सवालही राज ठाकरे यांनी केला.
मल्टिप्लेक्सच्या विषयावर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी श्रेय घेण्याचा कथितरीत्या प्रयत्न केला. त्याबद्दल राज ठाकरे यांनी त्यांची खिल्ली उडवली. ""काहीही झाले तरी यांना फक्त हे आमच्यामुळेच झाले एवढेच म्हणता येते,'' असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. या वेळी मनसेचे आमदार बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आदी उपस्थित होते.
"राज बोले, सरकार हाले'
बेस्ट कामगारांना आता फक्त राज ठाकरे यांचाच आधार वाटत आहे. कारण राज यांनी बोलायचे आणि सरकारने हलायचे, असा प्रकार आता राज्यात सुरू झाला आहे, असे उद्गार मनसेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी या वेळी बोलताना काढले.