सोमवार, 23 अगस्त 2010

राज ठाकरेंपेक्षा चांगली समाजसेवा करीन

राज ठाकरेंपेक्षा चांगली समाजसेवा करीन
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, August 24, 2010 AT 12:30 AM (IST)

मुंबई - मुंबईतील वाढते लोंढे कसे थांबवायचे यावर राज ठाकरे यांच्यापेक्षा आपल्याकडे चांगला उपाय आहे. मी राज ठाकरे यांच्यापेक्षा चांगली समाजसेवा करू शकते, असा दावा राखी सावंतने केला आहे.

'इमॅजिन' या वाहिनीवर "राखी का इन्साफ' हा एक आगळावेगळा कार्यक्रम येत आहे. त्याचे सूत्रसंचालन राखी सावंतच करीत आहे. समाजातील विविध वाद आणि समस्या सोडविण्यासाठी हे एक व्यासपीठ आहे. यामध्ये विविध विषय हाताळले जाणार आहेत. या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आज अंधेरी येथे एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राखी सावंतला "मुंबईतील वाढते लोंढे...' या विषयाला तू या कार्यक्रमात प्राधान्य देणार का, असा प्रश्‍न केला असता क्षणाचाही विलंब न लावता तिने आमचे मित्र राज ठाकरे यांच्यापेक्षा आपल्याकडे या समस्येवर चांगला उपाय आहे, असे सांगितले. ती पुढे म्हणाली, 'आपण या कार्यक्रमात सहभागी झालो आहोत ती कुणाचे मन तोडण्यासाठी नाही तर तुटलेली मने जोडण्यासाठी येथे आलो आहोत. यामध्ये विविध समस्या सोडविल्या जाणार आहेत किंवा त्यावर उपाययोजना सांगितली जाणार आहे. आपण याकरिता कोणत्याही प्रकारचा अभ्यास केलेला नाही किंवा करण्याची आपणास गरज भासत नाही. सर्व काही समोर आले की आपण त्यावर तोडगा सुचवू, असेही ती म्हणाली. आपल्या आयुष्यातदेखील बऱ्याच समस्या आल्या होत्या. त्याला आपण सामोरे गेलो आहोत. परंतु या कार्यक्रमात आपण इतरांच्या समस्या सोडविण्यासाठी आलो आहोत, असे तिने सांगितले.

छोट्या पडद्यावर अमिताभ बच्चन, प्रियांका चोप्रा आणि सलमान खान यांचे कार्यक्रम सुरू होत आहेत. त्यामुळे त्यांच्यासमोर तुझा निभाव कसा लागेल, या प्रश्‍नावर तिने "ते वाघ आहेत. त्यामुळे आपली काही त्यांच्याशी स्पर्धा नाही. आपण आपल्या पद्धतीने काम करणार आहोत,' असे उत्तर तिने दिले.
 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें