...तर बिहारींना हाकलून लावू : राज
- सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, September 01, 2012 AT 03:30 AM (IST)
मुंबई - महाराष्ट्रातील दंगल, खून, अपहरणाच्या गुन्ह्यातील गुन्हेगार बिहार आदी परराज्यांत सापडत असूनही विनापरवाना या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्यास महाराष्ट्रातील पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याच्या इशाऱ्याचा समाचार घेत बिहारने अशी कारवाई केल्यास महाराष्ट्रातील "बिहारीं'ना घुसखोर ठरवून हाकलून लावू, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी दिला. बिहारचे मुख्य सचिव देशात फुटीरतेची बीजे रोवत असताना दिल्लीसह राज्यातील नेते गप्प का, असा सवालही राज यांनी केला.
मनसेची सभासद नोंदणी 5 सप्टेंबरला सुरू होत असल्याच्या निमित्ताने पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. आशा भोसले यांना देशहितापेक्षा पैसा मोठा झाल्याची टीका त्यांनी केली.
बिहारचे मुख्य सचिव नवीन कुमार यांनी राज्याचे मुख्य सचिव आणि मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र लिहून, बिहारमधील गुन्हेगारांना अटक करताना त्या सरकारची परवानगी न घेतल्यास संबंधित पोलिसांवरच गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. एकाच देशात राहताना बिहारचे मुख्य सचिव फुटीची बीजे पेरत असताना राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय नेते गप्प का, अशी विचारणा त्यांनी केली.
महाराष्ट्रातील बहुतांश गुन्ह्यांत परराज्यातील गुन्हेगारांचा व बांगलादेशींचा हात असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पोलिसांवर कारवाईचा प्रयत्न झाल्यास येथील बिहारींना घुसखोर ठरवून त्यांना हाकलून लावू, असा इशारा देत, मला एकसंधतेच्या उपदेशाचे डोस पाजणारे विचारवंत आणि नितीशकुमार आता कुठे गेले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. परप्रांतीयांच्या माध्यमातून घडविलेली मुंबईतील दंगल म्हणजे केवळ "झलक' असल्याचा आरोप राज यांनी केला. खंबीर नेतृत्व नसल्यानेच ही वेळ आली असून गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
कलर वाहिनीवर सुरू होणाऱ्या "सूरक्षेत्र' कार्यक्रमातील पाकिस्तानी गायकांविषयी आशा भोसले यांनी "अतिथी देवो भव' म्हटल्याबद्दल त्यांच्यावर राज यांनी सडकून टीका केली. आशाताईंना अतिथी नव्हे, तर "पैसा देवो भव' झाल्याची टीका त्यांनी केली.
राष्ट्रीय नेता व्हायचे नाही माझ्या पक्षासाठी महाराष्ट्र हीच सीमा आहे. आझाद मैदानातील मनसेच्या मोर्चानंतर मनसे राष्ट्रीय स्तरावर पोचल्याची मते मांडली गेली. पण आपण महाराष्ट्राबाहेर जाण्यात उत्सुक नसून, आपणास राष्ट्रीय नेता व्हायचे नाही. राज्यातून दिल्लीत जाऊन राष्ट्रीय नेते झालेल्यांचे हाल आपण पाहिले आहेत, असे ते म्हणाले.