गुरुवार, 13 जून 2013

'स्वतःच्या स्वार्थासाठी तरुणांचे आयुष्य उदधवस्त करणे हेच ठाकरे कुटुंबीयांचे काम' -नवाब मलिक

तरुणांना कायदा मोडायला लावण्यास उद्युक्त केल्याबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी राज ठाकरे यांच्यावर गुरुवारी टीका केली. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी तरुणांचे आयुष्य उदधवस्त करणे, हेच काम ठाकरे कुटुंबीयांनी आतापर्यंत केल्याचा आरोप मलिक यांनी यावेळी केला.
रेल्वे भरती मंडळाच्या परीक्षा केंद्रावर हल्लाबोल करून परीक्षार्थीना मारहाण केल्याप्रकरणी पाच वर्षांपूर्वी दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्याची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या मागणीवर गुरुवारी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने हल्ला चढवला. हा हिंसाचार झाला तेव्हा आपण तेथे हजर नव्हतो आणि आपला या हिंसाचारामागे हात नसल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला आहे.
तरुणांना भडकावून त्यांना तोडफोड करण्यास प्रवृत्त करायचे आणि नंतर आपला त्यात काही संबंध नाही, असे सांगून खटल्यातून बाहेर पडायचे, हे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांचे पहिल्यापासून धोरण असल्याची टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केली. कार्यकर्त्यांना कायदा हातात घ्यायला लावायचा आणि नंतर त्यांना एकटे सोडून आपण बाहेर पडायचे, हेच या पक्षांच्या नेत्यांचे काम असल्याचे माणिकराव ठाकरे म्हणाले

बुधवार, 12 जून 2013

वाढदिवस साजरा न करण्याचे राज ठाकरे यांचे आवाहन

गुरुवार, 13 जून 2013 - 12:30 AM  
मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन होऊन अद्याप एक वर्ष न झाल्याने यंदा आपला वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांपर्यंत हा आदेश पोहोचविला असून वाढदिवसानिमित्त कोणत्याही जाहिरातबाजीस मनाई करण्यात आली आहे.

राज यांचा शुक्रवारी (ता.14) वाढदिवस आहे. या दिवशी मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात होर्डिंगबाजी केली जाते; तसेच विविध कार्यक्रमही होतात; परंतु बाळासाहेबांच्या निधनाच्या धक्‍क्‍यातून सावरलेलो नसल्याने वाढदिवस साजरा करणार नसल्याचे राज यांनी स्पष्ट केले. दरम्यान, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनीही वाढदिवस साजरा करणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यांचा 13 जून रोजी वाढदिवस आहे. या दिवशी वाढदिवस साजरा करण्याऐवजी सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देण्याचे आवाहन त्यांनी युवासैनिकांना केले आहे

रविवार, 9 जून 2013

नरेंद्र मोदी यांचे गोवा येथील भाषण


नरेंद्र मोदी भाजपच्या निवडणूक प्रचार समितीच्या अध्यक्षपदी

रविवार, 9 जून 2013 - 02:12 PM IST

पणजी - गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) निवडणूक प्रचार समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

पणजीत सुरू असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांनी मोदींच्या नावाची औपचारिक घोषणा केली. मोदींच्या नावाच्या घोषणेमुळे भाजप २०१४ मध्ये लोकसभा निवडणुका त्यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपचे दोन दिवसांच्या बैठकीचा आज समारोप झाला. या बैठकीला लालकृष्ण अडवानींसह पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते गैरहजर होते. या नेत्यांच्या अनुपस्थितीतच मोदींच्या नावाची घोषणा करण्यात आल्याने, राजकीय तर्कवितर्कांना सुरवात झाली आहे.

आम्हाला नरेंद्र मोदी यांच्याकडून मोठ्या अपेक्षा असून, त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढविल्या जाणार आहेत, असे राजनाथसिंह यांनी सांगितले. नरेंद्र मोदींना देशात मोठी जबाबदारी देण्यावरून गेल्या अनेक वर्षांपासून भाजपमध्ये प्रयत्न सुरू होते. अखेर आज त्यांना राष्ट्रीय जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील प्रचार समितीमध्ये २४ सदस्य असण्याची शक्यता आहे. या सदस्यांत अमित शहा आणि स्मृती इराणींचा समावेश असल्याची शक्यता आहे. या बैठकीदरम्यान बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी मोदींना प्रचारासाठी ऑक्टोंबरमध्ये बिहारमध्ये येण्याचे आमंत्रण दिले आहे